भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळा हा इतर ऋतूंच्या तुलनेत अनेक अर्थानी आरोग्यदायी ठरतो. पण तरीही ऋतुबदलामुळे या काळात होणारे आजार बहुतेकांना चुकत नाहीत. म्हणून, हिवाळा आरोग्यदायी कसा राखावा, हे जाणून घेणे गरजेचे ठरते.

हिवाळय़ातील आजार कोणते?

हेही वाचा >>>विश्लेषण: ओझोनच्या थराची छिद्रं दुरूस्त होऊ लागल्याचा अर्थ काय?

तापमानाचा पारा घसरताच हवामानातील बदलांमुळे होणारे नेहमीचे विषाणूजन्य आजार आणि त्याबरोबरीने सांधेदुखी, दमा, श्वसनविकार तसेच त्वचेच्या आणि अस्थिरोगांच्या विविध तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते. सर्दी, पडसे, खोकला, दमा इत्यादी आजार हिवाळय़ात बळावतात. कफ प्रकृती असलेल्या रुग्णांना याचा अधिक त्रास होतो. शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे, धाप लागणे अशी लक्षणे रुग्णांना हैराण करून सोडतात. हिवाळय़ात हृदयरोग आणि अर्धागवायू या आजारांचे प्रमाणही काहीसे वाढलेले आढळते. थंडीमुळे हृदयाच्या आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तदाब, मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळय़ात जास्त काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित चाचण्या करून औषधे घ्यावीत. जुना मधुमेह असणाऱ्या रुग्णांना विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा संसर्गाना ‘सायलेंट इन्फेक्शन’ म्हटले जाते.

त्वचेचे आरोग्य कसे जपावे?

हिवाळय़ात त्वचा कोरडी होते. ओठ फाटतात. पायांना भेगा पडतात. सोरायसिसच्या रुग्णांसाठी हिवाळा जास्त त्रासदायक ठरतो. अंगाला खाज येणे, पुरळ उठणे, त्वचा खरखरीत होणे या लक्षणांमध्ये हिवाळय़ात वाढ होते. हे टाळण्यासाठी आंघोळीपूर्वी अंगाला तेल लावावे, आंघोळीसाठी कडकडीत गरम पाण्याचा वापर टाळून कोमट पाणीच वापरावे. ओठांना दुधाची साय किंवा तूप लावावे. चेहरा आणि हातापायांसाठी मॉइश्चरायजर्सचा वापर करावा. बाजारातील क्रीम्स वापरूनही उपयोग होत नसल्यास त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने क्रीम निवडावे. हिवाळय़ात सकाळी कोवळय़ा उन्हात चालण्याचा व्यायाम केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते. स्निग्ध पदार्थ, दूध, तूप, मांसाहार, उडीद, ऊस, रवा, गहू, बाजरी यांचा आहारात अंतर्भाव केल्यास त्वचेच्या आरोग्यास लाभ होतो.

हेही वाचा >>>विश्लेषण: बाबरी मशिदीचं कुलूप राजीव गांधींनी उघडलं; तरीही राम मंदिरामुळे काँग्रेसची राजकीय कोंडी कशी झाली?

श्वसनाचे त्रास कसे टाळावेत?

मुळातच ज्यांना श्वसनविकारांची पार्श्वभूमी आहे, अशा रुग्णांनी हिवाळय़ात अधिक खबरदारी घेणे आवश्यक ठरते. या काळात या विकारांची तीव्रता वाढते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार करणे उपयुक्त ठरते. योगासने, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम श्वसनविकारांची तीव्रता कमी करण्यासाठी होतो. दम्याच्या रुग्णांनी या काळात विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते.

सांधेदुखी, अस्थिरोग असणाऱ्यांसाठी..

हिवाळय़ात, मर्यादित प्रमाणात सूर्यप्रकाश असतो. शरीराच्या काही भागांना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे सांधे आखडतात आणि दुखू लागतात. थंड हवामानामुळे स्नायूंवर ताण येऊन सांधे दुखतात. हिवाळय़ात व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते आणि त्यामुळे सांधे कमकुवत होतात. सांधेदुखी सामान्यत: ६० वर्षांवरील प्रौढांमध्ये दिसते. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीच संधिवात आहे, त्यांनी हिवाळय़ात अधिक काळजी घेणे गरजेचे असते. सांधेदुखीपासून दूर राहण्यासाठी भाज्या, तृणधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये आणि हंगामी फळे यांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घेतल्यास फायदा होतो. पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांचा आहारात समावेश करावा. स्ट्रेचिंग आणि हलके वजन उचलण्याचे व्यायाम सांधेदुखी कमी करण्यास मदत करू शकतात. सांध्यांची लवचीकता वाढविण्यासाठी व सांधेदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी सायकिलग, चालणे, एरोबिक्स आणि पोहणे या व्यायामांचा फायदा होतो. उबदार कपडे, कोमट पाण्याने आंघोळ, गरम पाण्याने किंवा हीटिंग बॅगने सांधे शेकणे या गोष्टींनीही हिवाळय़ातील सांधेदुखी कमी ठेवणे शक्य आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: अमेरिकेची विमानसेवा ठप्प का झाली? NOTAM प्रणाली कशी काम करते?

हिवाळय़ातील आहार कसा असावा?

या दिवसांत चांगली लाल गाजरे, बीट, ओली हळद, लसूण पात, रताळे, बोरे, ताजे मटार मिळतात. त्यांचा आहारात समावेश करायला हवा. अक्रोड, बदाम, पिस्ता अशा सुक्यामेव्याचे तसेच तिळासारख्या तेलबियांचे आहारातील प्रमाण वाढवावे. भोगीला केली जाणारी विशेष भाजी, उंधीयू, तिळगूळ असे पदार्थ हिवाळय़ातील सणांच्या निमित्ताने केले आणि खाल्ले जातात, त्यामागे हेच कारण आहे. मांसाहार करणाऱ्यांनी अंडी, मटण, चिकन यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. गोड, आंबट आणि खारट चवीच्या पदार्थाचा आहारात समावेश करावा. उडीद, मेथी, खजूर, शेंगदाणे, खोबरे, गूळ, गाजर, आवळा यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सेवन वाढवल्यास त्याचे चांगले परिणाम आरोग्यावर दिसणे शक्य आहे.
bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what do you do to stay cool in winter amy
First published on: 12-01-2023 at 01:52 IST