scorecardresearch

विश्लेषण : तुनिषा शर्माच्या बॉयफ्रेंडविरोधात दाखल झालेले कलम ३०६ नेमकं काय आहे? आरोप सिद्ध झाल्यास किती वर्षांची होते शिक्षा? जाणून घ्या

आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कोणत्या कलमाखाली दाखल करतात? त्यासाठी शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.

विश्लेषण : तुनिषा शर्माच्या बॉयफ्रेंडविरोधात दाखल झालेले कलम ३०६ नेमकं काय आहे? आरोप सिद्ध झाल्यास किती वर्षांची होते शिक्षा? जाणून घ्या
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर आणि मालिकेतील सहकलाकार मोहम्मद झिशान याला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाच्या ज्या कलमाखाली दाखल करतात ते कलम ३०६ नेमकं काय आहे? जर आरोप सिद्ध झाला तर शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : मालिकेच्या सेटवर आत्महत्या अन् बॉयफ्रेंडला अटक; अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरण नेमकं काय?

तुनिषाच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वाळीव पोलिसांनी झिशानविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तुनिषा शर्मा आणि झिशान खान नात्यात होते. १५ दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेक-अप झालं होतं. यानंतर तुनिषा शर्मा तणावात होती. या तणावातूनच तिने आत्महत्या केली, असेही एफआयआरमध्ये सांगण्यात आले आहे.

कलम ३०६ नेमकं काय आहे?

भारतीय दंड विधानाच्या प्रकरण १६ मध्ये मानवास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात कलम ३०५ आणि ३०६ चा समावेश आहे. हे दोन्ही कलम आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात आहे. तसेच या प्रकरणात शिक्षेचेही तरतूदही करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यास किंवा आत्महत्येसाठी त्याच्यावर दबाव आणल्यास, अशा व्यक्तीवर या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

कमल ३०५ आणि ३०६ नेमका काय फरक आहे?

भारतीय दंड विधानातील कलम ३०५ आणि ३०६ हे दोन्ही कलम आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात आहेत. मात्र, या दोन्ही कमलांमध्ये फरक आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती जर १८ वर्षांखाली असेल किंवा नशेत असेल किंवा मानसिक रोगी असेल, अशा व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरोधात भांदविच्या कमल ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. या अंतर्गत दाखल झालेला गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा असतो. तर १८ वर्षावरील सज्ञान व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. कलम ३०६ अंतर्गत दाखल झालेला गुन्हाही दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा असतो.

हेही वाचा – विश्लेषण : सुशांत सिंह राजपूत ते तुनिषा शर्मा; यशस्वी लोक आत्महत्या का करतात?

शिक्षेची तरतूद काय?

भारतीय दंड विधानाच्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास अशा व्यक्तीला मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास किंवा आर्थिक दंड अशा स्वरुपाची शिक्षा होऊ शकते. तर कमल ३०६ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला, तर अशा व्यक्तीला दहावर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही अशा स्वरुपाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 17:23 IST

संबंधित बातम्या