वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केल्याचेही उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी आफताबला अटकही केली. मात्र, तपासादरम्यान तो वारंवार खोटे बोलत असून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याची नार्को चाचणी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील साकेत न्यायालयात केली. न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याची नार्को चाचणी होणारही होती. मात्र, त्यापूर्वी केल्या जाणाऱ्या पॉलिग्राफ चाचणीची परवानगी अद्याप न मिळाल्याने ही नार्को चाचणी स्थगित करण्यात आली. दरम्यान, आता नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका काय फरक आहे? आणि दोन्ही चाचण्या नेमक्या कशा केल्या जातात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल सविस्तर जाऊन घेऊया.

हेही वाचा – विश्लषण : इस्लाममध्ये मद्यप्राशन ‘हराम’, मुस्लीम राष्ट्रांमध्ये मद्यासंंबंधीचे नियम काय?

नार्को चाचणी म्हणजे काय?

नार्को चाचणी करताना ‘सोडियम पेंटोथल’ म्हणजेच ‘ट्रुथ सिरम’ या औषधाचा वापर केला जातो. या औषधाच्या परिणामामुळे त्या व्यक्तीला आत्मभान राहत नाही. त्यामुळे ही व्यक्ती कुठल्याही प्रभावाशिवाय बोलू लागते. या औषधीमुळे संबंधित व्यक्ती संमोहन स्थितीत पोहोचते. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना आरोपीने केलेल्या गुन्ह्याबाबत खरी माहिती मिळण्याची शक्यता असते. ही चाचणी करताना केवळ मानसशास्त्रज्ञ, तपास अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्या शिवाय इतर कोणालाही उपस्थित राहण्याची परवानगी नसते.

हेही वाचा – विश्लेषण: मुंबई अमली पदार्थांची ‘बाजारपेठ’ ठरतेय? येतात कुठून हे अमली पदार्थ?

पॉलिग्राफ चाचणी म्हणजे काय?

एखादा आरोपी खरं बोलतो आहे, की खोटं हे शारीरिक क्रियांमधून तपासण्यासाठी पॉलिग्राफी चाचणी केली जाते. यालाच लाय डिक्टेटर चाचणी असेही म्हणातात. एखादी व्यक्ती जेव्हा खोटं बोलते, तेव्हा तिचा रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास आणि शरीराच्या तापमानात बदल होतात. हे बदल तांत्रिक उपकरणांद्वारे तपासले जातात. १९२४ पासून पोलीस तपासात या चाचणीचा वापर केला जातो. नार्को चाचणी प्रमाणेच ही पॉलिग्राफ चाचणीही तेवढीच वादग्रस्त आहे. महत्त्वाचे म्हणजे नार्को चाचणी असेल किंवा पॉलिग्राफ चाचणी, दोन्हीही चाचण्या १०० टक्के अचूक आहेत, हे वैज्ञानिकदृष्टी सिद्ध झालेले नाही.

हेही वाचा – विश्लेषण: भारताच्या परराष्ट्र खात्यापर्यंत पोहोचलं ‘हनीट्रॅप’चं जाळं; लोकांना कसं केलं जातं हनीट्रॅप? हेरगिरीसाठी कसा होतो वापर?

कशा होतात दोन्ही चाचण्या?

नार्को चाचणी दरम्यान संबंधित व्यक्तीच्या शरीरात ‘सोडियम पेंटोथल’ हे औषध इंजेक्शनद्वारे सोडले जाते. तसेच या औषधाचा डोस त्या व्यक्तीचे वय, लिंग आणि इतर वैद्यकीय परिस्थितीवर अवलंबून असतो. हा डोस अचूक असणे आवश्यक असते, अन्यथा त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा ती कोमामध्ये जाण्याची भीती असते. हे इंजेक्शन दिल्यानंतर ती व्यक्ती संमोहन स्थितीत पोहोचते. त्यानंतर डॉक्टर त्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची परवानगी देतात. तर पॉलिग्राफ चाचणी करताना आरोपीच्या शरिरावर सेंसर लावल्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नांची उत्तरं देताना पॉलिग्राफ मशीनीद्वारे आरोपीचा रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवासा दर आणि शरीराच्या तापमानात बदल तपासले जातात. त्यावरून ती व्यक्की खरं बोलते आहे, की खोटं, हे तपासले जाते.

हेही वाचा – विश्लेषण: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे नार्को चाचणीची चर्चा; देशातील परवानगीपूर्व पहिला प्रयोग कुठे, केव्हा आणि कसा झाला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाचण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिले?

आरोपीच्या संमतीशिवाय कोणतीही लाय-डिटेक्टर चाचणी करण्यात येऊ नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य आणि एएनआर प्रकरणादरम्यान दिला होता. तसेच चाचण्यांचे अहवाल हे कबुलीजबाब म्हणून वापरता येणार नाही. मात्र, यादरम्यान मिळालेली माहिती पुरावा म्हणून स्वीकारली जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. तर डीके बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी ही क्रूर आणि अमानुष असल्याचे म्हटले होते. तसेच या चाचणीद्वारे गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघनही होऊ शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.