त्रिपुराच्या निवडणूक आयोगाने मदत शिबिरात राहणाऱ्या ब्रू निर्वासितांना आव्हान केले आहे की, त्यांनी पुनर्वसीत गावांमध्ये जावे आणि मतदान यादीत सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षणादरम्यान ८ डिसेंबर पर्यंत आपली नावे नोंदवावीत.
ब्रू निर्वासितांना २०२३ च्या त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासाठी, या उपक्रमाद्वारे सुमारे ६ हजार ३०० कुटुंबातील २० हजार ब्रू मतदरांची नोंदणी करण्याचे निवडणूक आयोगाचे लक्ष्य आहे.एकूण ७ हजार १६५ ब्रू नावे त्रिपुरामध्ये आधीच नोंदली गेली आहेत, तर उर्वरितांची नावे विशेष मोहिमेच्या अंतर्गत राज्याच्या मतदार यादीत नोंदवली जाण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, सुभाशीष बंडोपाध्याय यांनी दिली आहे.
त्रिपुरा उच्च न्यायालयाने मागील महिन्यात दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हे समोर आले आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री माणिक शाह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला त्यांच्या २५ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर राज्यातील ब्रू निर्वासितांना मतदानाचा अधिकार देण्याचे निर्देश दिले होते. यापार्श्वभूमीवर ब्रू निर्वासितांबद्दल जाणून घेऊयात.
ब्रू निर्वासित कोण आहेत? –
ब्रू समुदाय हा मिझोरममधील सर्वात मोठा अल्पसंख्याक आदिवासी समूह आहे. या आदिवासी गटाचे लोक म्यानमारच्या शान प्रांतातील डोंगराळ भागातील रहिवासी आहेत, जे काही शतकांपूर्वी म्यानमारमधून स्थलांतरित होऊन मिझोरममध्ये स्थायिक झाले. मिझोराममधील बहुसंख्य जमाती त्यांना बाहरेच म्हणून संबोधतात.
१९९६ मध्ये ब्रू समुदाय आणि बहुसंख्य मिझो समुदाय यांच्यात स्वायत्त जिल्हा परिषदेच्या मुद्य्यावरून रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर ऑक्टोबर १९९७ मध्ये ब्रू जमातीच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येने (जवळपास ५ हजार कुटुंब) स्थलांतर करून त्रिपुरामध्ये आश्रय घेतला होता. त्रिपुरामध्ये हे छावण्यांमध्ये राहत आहेत. तर की ब्रू परत जावेत यासाठी त्रिपुराकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्रिपुराने केंद्र सरकारच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले . यानंतर काही ब्रू कुटंब परतही गेले, त्यांना शासकीय मदतही देण्यात आली.
ब्रू जमातींना रेयांग असेही संबोधले जाते. चेंचू, बोडो, गरबा, असुर, कोतवाल, बैगा, बोंडो, मरम नागा, सौरा यांसारख्या गृह मंत्रालयाने विशेषत: असुरक्षित आदिवासी गट म्हणून वर्गीकृत केलेल्या ७५ आदिवासी गटांपैकी रेयांग एक आहे. हे ७५ आदिवासी समूह देशातील १८ राज्ये आणि अंदमान-नकोबार बेटांवर राहतात.
त्रिपुरा आणि मिझोरम शिवाय या जमातीचे लोक आसाम आणि मणिपूरमध्येही राहतात. त्यांची बोली रियांग आहे, जी तिबेट, म्यानमारच्या कोकबोरोक भाषा परिवाराचा अंग आहे. रियांग भाषेत ब्रू चा अर्थ मानव होतो.