Amitabh Bachchans Son In Law Talk About Bachchan family: कलाकारांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता असते. त्यांच्या खासगी आयुष्यापासून ते त्यांची घरे कशी असतील, ते कसे राहत असतील, त्यांच्या कुटुंबात कसे वातावरण असेल, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत असतात.
अमिताच बच्चन हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ व लोकप्रिय कलाकार आहेत. अँग्री यंग मॅन ही ओळख निर्माण करीत, अमिताभ बच्चन यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेक चाहते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गर्दी करीत असतात. त्यांच्याविषयी आजही चाहत्यांच्या मनात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते.
कुणाल कपूर बच्चन कुटुंबाबद्दल काय म्हणाला?
आता अभिनेता कुणाल कपूरने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांचे कुटुंब कसे आहे, याबद्दल वक्तव्य केले आहे. कुणाल कपूरने अजिताभ बच्चन यांच्या मुलीशी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या पुतणीशी लग्न केले आहे.
कुणाल कपूरने नुकताच ‘न्यूज १८’बरोबर संवाद साधला. बच्चन कुटुंबाबाबत कुणाल म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं, तर अमिताभ बच्चन यांचं कुटुंब इतर सामान्य कुटुंबांसारखंच आहे. इतर सामान्य घरात जसं वातावरण असतं, तसेच वातावरण बच्चन कुटुंबातही आहे. अमिताभ बच्चन यांचं कुटुंब इतर कोणत्याही कुटुंबापेक्षा फारसं वेगळं नाही.”
कुणाल आणि नैनाने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी ते अनेक वर्षे डेट करीत होते. या जोडप्याने ३१ जानेवारी २०२२ ला एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर केली होती.
कुणाल कपूर नुकताच नेटफ्लिक्सवरील ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सैफ अली खान आणि जयदीप अहलावत हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते.
दरम्यान, अमिताभ बच्चन आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रभास व दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटात बिग बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. आता तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.