‘अ ब’ रक्तगट (A B Blood Group) आणि ‘ब’ रक्तगट असलेल्या लोकांना इतर रक्तगटांपेक्षा करोना संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर)ने दिली आहे. सीएसआयआरने केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. जाणून घ्या ‘अ ब’ रक्तगट (A B Blood Group) आणि ‘ब’ रक्तगट असलेल्यांना करोना होण्याचा धोका अधिक का असतो?
अ ब आणि ब रक्तगट असलेल्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते तर, ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींमध्ये ही शक्यता कमी असल्याचे सीएसआयआरने केलेल्या संशोधनात म्हंटले आहे. ओ रक्तगट असलेल्या करोनाचा संसर्ग असल्यास त्याची लक्षणे सौम्य असतात असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.
रोगप्रतिकार शक्ती परिणामकारक
प्रत्येक गोष्ट व्यक्तीच्या अनुवांशिक संरचनेवर अवलंबून असते. ओ रक्तगट (O Blood Group) असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ‘अ ब’ आणि ‘ब’ रक्तगट असणाऱ्या लोकांपेक्षा चांगली असते असे अनुवांशिक संरचनेतून दिसते. असे असले तरी ‘ओ’ रक्तगट असणाऱ्यांनी करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले तरी चालेल असे होत नाही. कारण ओ रक्तगट असणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही करोनापासून संपूर्णपणे संरक्षण करत नाही. त्यामुळे अ ब’ आणि ‘ब’ रक्तगट असणाऱ्या लोकांना करोना होण्याचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे.
१० हजार लोकांवर केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष
सीएसआयआरने दिलेल्या माहितीनुसार, मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोकांमध्ये करोनाचे संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. देशातील १४० डॉक्टरांच्या टीमने १० हजार लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या अभ्यासानुसार, ‘अ ब’ रक्तगट असणाऱ्यांना सर्वात जास्त करोनाचा धोका असल्याचे म्हंटले आहे, त्यानंतर ‘ब’ रक्तगट असलेल्या लोकांचा क्रमांक लागतो.
दरम्यान, एप्रिल महिन्यात करोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. करोनाच्या सुरुवातीपासूनचा २ वर्षाचा आलेख पाहता एप्रिल महिन्यात दररोज नवीन रुग्णांची संख्या ही ८० हजारांवरून ४ लाखांवर गेली आहे. जी पाच पटीने जास्त आहे. तर मृत्यूंची संख्या ही १० पटींनी वाढली आहे. याआधी २४ तासांमध्ये ४०० मृत्यूंची नोंद होत होती तिथे एप्रिल महिन्यात सध्या दिवसाला ४००० मृत्यूंची नोंद होत आहे. देशात कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांमध्ये करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कर्नाटकात ४०० तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ३०० करोनाबाधितांचे मृत्यू दिवसभरात होत आहेत. तर उत्तराखंड, हरियाणा,झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात ही संख्या १०० आहे.