भारतासमोर सध्या एक नवं संकट उभं राहिलं आहे. हे संकट म्हणजे भारतातील गाढवांची संख्या कमी झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गेल्या नऊ वर्षांत देशातील गाढवांची संख्या ६१.२३ टक्क्यांनी कमी झाल्याचं समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे यामागे चीनच्या कुरापतती आहे. जाणून घेऊयात नेमकी ही गाढवटंचाई की निर्माण झाली आहे आणि याचा चीनशी काय संबंध आहे ते…
गाढवांची संख्या म्हणजे ६१.२३ टक्क्यांनी कमी
ब्रुक इंडियाने नुकताच हा अहवाल केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे दिला आहे. २०१२च्या पशुधन गणनेच्या तुलनेत २०१९च्या नवीन पशुधन गणनेनुसार गाढवांची संख्या तीव्र गतीने म्हणजे ६१.२३ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०१२च्या पशुधन गणनेत भारतात गाढवांची संख्या ०.३२ दशलक्ष होती, जी २०१९च्या पशुधन गणनेत केवळ ०.१२ इतकी आढळली. ब्रुक इंडियाच्या चमूने महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये सर्वेक्षण केले.
गाढवांच्या कातडीची तस्करी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात होत असली तरी इतरही अनेक देशात कमीअधिक प्रमाणात ती होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ब्रुक इंडियाचे शरत के. वर्मा महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेजुरी यात्रेत गेले होते. या यात्रेत गाढवे मोठ्या संख्येने असतात. गेल्या काही वर्षात ही संख्या कमी झाल्याचे यात्रेकरूंनी सांगितल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अभ्यासात केला आहे. राजस्थानमध्ये गाढवांचा मेळावा आयोजित केला जातो, तिथेही घट झाली आहे. आंध्रप्रदेश व तेलंगणात गाढवांची हत्या केली जात असल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त गाढवांची संख्या कमी होण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. फार पूर्वी सामान वाहून देण्यासाठी गाढवांचा उपयोग केला जात होता. दळणवळणाची अत्याधुनिक साधने आल्यामुळे ही उपयुक्तता आता कमी झाली आहे. गाढव पाळणारा समुदाय आता इतर रोजगाराकडे, नोकरीकडे वळला आहे. मात्र, संख्या कमी होण्याचे मूळ कारण हे चीनमध्ये होणारी तस्करी असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.
चीनच्या कुरापती –
सीमेलगतच्या भागांत नेहमी कुरापती काढणाऱ्या चीनने आपल्या देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवे पळविण्याचा उद्योग सुरू केला आहे. देशातील बहुतांश राज्यांतून तस्करीद्वारे ही गाढवे चीनमध्ये पोहोचत आहेत.
झाले काय?
भारतातून आतापर्यंत वाघांच्या अवयवांची तस्करी चीनमध्ये केली जात होती. मात्र, आता कातडीसाठी गाढवांची देखील तस्करी चीनमध्ये केली जात असल्याचे ब्रुक इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले.याच तस्करीच्या कारणांमुळे देशातील गाढवांच्या संख्येत ६१.२३ टक्क्यांनी तर महाराष्ट्रात ३९.६९ टक्क्यांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कशासाठी खटाटोप?
गाढवांच्या कातडीचा वापर रक्तस्त्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला यासाठी तयार करण्यात येत असलेल्या औषधांमध्ये केला जातो. ‘इजियाओ’ हे पारंपरिक चिनी औषध तयार करण्यासाठी देखील गाढवांच्या कातडीचा वापर केला जातो. इतर आजारावरील उपचारासोबतच आयुष्य वाढवण्यासाठीही ते उपयोगी ठरते, असे मानले जाते.
महाराष्ट्रात काय स्थिती?
पाहणीनुसार उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून ७१ टक्क्यांहून अधिक गाढवांची घट झाली आहे. यानंतर राजस्थान आणि गुजरातचा क्रमांक असून ७१ आणि ७० टक्के गाढवं कमी झाले आहेत. बिहारामध्ये ही घट जेमतेम ४७ टक्के आहे. या गाढवगळती मापनात दक्षिणेतील एकमेव राज्य दिसते, ते म्हणजे आंध्र प्रदेश. त्या राज्यातून ५३ टक्के गाढवे कमी झाली. महत्वाचं म्हणजे गाढवसंख्येतील घट सर्वात कमी आहे ती आपल्या या महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील गाढवगळती फक्त ३९ टक्के इतकीच आहे.
चिनी कुरापतींमुळे भारतात गाढवटंचाई; औषध निर्मितीसाठी तस्करी; सर्वेक्षणातून उघड
थोडी माहिती –
अश्मयुगात म्हणजेच १२,००० वर्षांपूर्वी गाढव माणसाळविले गेले. भारतात वैदिक साहित्यात गर्दभ, रासभ, खर वगैरे नावांनी गाढवांचा उल्लेख आहे. उज्जैन येथे भरणारा गाढवांचा बाजार राजा विक्रमादित्यच्या काळापासून (सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी) भरत असावा असा अंदाज आहे. गाढवाचा शिक्का असलेली नाणी उत्खननातून उपलब्ध झाली आहेत.