पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेच्या मृत्यूमुळे वाद निर्माण झाला आहे. ३५ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर देशभरात रोष व्यक्त होत असून, आरोग्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पोर्तुगाल सरकारने आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना आपण त्या पदावर राहू शकत नाही याची जाणीव झाली असल्याचं सांगितलं आहे. पण भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर इतका वाद का निर्माण झाला आहे? आरोग्यमंत्र्यांना राजीनामा का द्यावा लागला, इथपर्यंत हा वाद का गेला? याबद्दल जाणून घेऊयात…

गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू

३५ वर्षीय गर्भवती भारतीय महिला पोर्तुगालमध्ये फिरण्यासाठी आली होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिला राजधानी लिस्बनमध्ये असणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या सँटा मारिया रुग्णालयात दाखल झाली असता, प्रसूती कक्षात जागा नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. पण, महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना, हृदयक्रिया बंद पडली आणि तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – विश्लेषण : स्पेनमध्ये का सुरू आहे बलात्कार कायद्यासंदर्भात चर्चा ?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता महिलेचं सिझरिन करण्यात आलं असून बाळ चांगल्या स्थितीत आहे. पण महिलेचा जीव वाचू शकला नाही. महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

महिलेच्या मृत्यूनंतर काही तासातच पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तात्काळ सेवा बंद असल्याने, रुग्णालयांमधील डॉक्टरांचा तुटवडा आणि गर्भवती महिलांना योग्य सेवा मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्र्यांवर टीका केली जात होती. भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर ही टीका आणखीन तीव्र झाली आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

हेही वाचा – विश्लेषण : ‘नासा’ पुन्हा चांद्र मोहिम का करत आहे?

मार्टा टेमिडो २०१८ पासून आरोग्यमंत्री असून, करोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं होतं. मंगळवारी पंतप्रधान अँटिनियो कोस्टा यांनी निवेदन प्रसिद्ध करत, मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आला असल्याची माहिती दिली.

नागरिकांचा संताप का होतोय?

प्रसूती कक्षांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असताना सरकार ज्या प्रकारे हा प्रश्न हाताळत आहे त्यावरुन सर्वसामान्य टीका करत आहेत. सरकारने काही विभाग तात्पुरत्या पद्धतीने बंद केले असून, गर्भवती महिलांचा जीव धोक्यात घालत त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता आणि खासकरुन स्त्रीरोगतज्ज्ञांची उणीव आहे. यामुळे सरकार परदेशातून डॉक्टरांना नोकरी देण्याचा विचार करत आहे. काही ठिकाणी प्रसूती कक्ष बंद करण्यामुळे, इतर ठिकाणी गर्दी होत आहे. या ठिकाणी महिलांना दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे. याचं खापर विरोधी पक्ष, डॉक्टर आणि परिचारिका माजी आरोग्यमंत्र्यांवर फोडत आहेत.

पोर्तुगीज डॉक्टर असोसिएशनचे मिगेल यांनी आरोग्यमंत्र्यांकडे ही समस्या सोडवण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळेच राजीनामा दिल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. दुसरीकडे, पोर्तुगालच्या सार्वजनिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टॅटो बोर्गेस यांनी, मार्टा टेमिडो यांनी राजीनामा देणं आपल्यासाठी आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. आरोग्य क्षेत्रातील समस्यांची योग्य जाणीव असताना त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित नव्हतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोर्तुगालमध्ये याआधी अशा घटना

पोर्तुगालमध्ये गेल्या काही महिन्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्भवती महिलांना अशाच प्रकारे दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.