दररोज टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांना ‘डेली सोप’ म्हटलं जातं. हा शब्दप्रयोग आपल्या इतक्या अंगवळणी पडला आहे, की टीव्ही मालिकांना समानार्थी शब्द म्हणजे ‘डेली सोप’ असाच आपला समज झाला आहे. त्यामुळे या दररोज पाहण्यात येणाऱ्या मालिकांसाठी या शब्दाचा उच्चार करताना आता आपल्याला काहीच नवल वाटत नाही. पण हा शब्द कुठून आणि कसा आला?

या संकल्पनेचा संबंध हा युरोपशी आहे. १९व्या शतकात कामच्या शोधात युरोपीय लोक अमेरिकेमध्ये येऊ लागले. युरोपातील वातावरण सर्वात थंड मानले जाते. त्यामुळे अमेरिकेत दाखल झालेल्या युरोपातील नागरिकांना अंघोळीची सवय ही कमी प्रमाणात होती. ही गोष्ट अमेरिकेतील नागरिकांना आवडत नव्हती. इथूनच डेली सोप या शब्दाचा उगम झाला. पण टिव्हीवर मालिकांसोबत हा शब्द कसा जोडला गेला?

युरोपातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजवण्यासाठी अमेरिकेतील लोकांना मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागले. अमेरिकेत या लोकांसाठी स्वच्छता अभियान चालवण्यात येऊ लागले. न्यूयॉर्क शहरामध्ये सार्वजनिक स्वरुपाचे स्नानगृह तयार करण्यात आले. अनेक कंपन्यांना एकत्र करत हे अभियान चालवण्यात येऊ लागले. यासाठी रेडिओचाही वापर केला गेला.

२०व्या शतकात रेडिओची लोकप्रियता पाहता त्यावरुन एक योजना चालवण्यात आली. त्यामध्ये स्वच्छते संदर्भातील नियमांची माहिती देण्यात आली होती. या योजनेमध्ये साबणाचा वापर करण्यावर भर दिला होता. आपला फायदा पाहून या योजनेसोबत साबणाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही यामध्ये रस घेतला आणि यासाठी निधी देण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीचाही समावेश होता.

१९३३ साली प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीकडे प्रतिस्पर्धी लिव्हर ब्रदर्स या कंपनीला व्यवसायात मागे टाकण्याची एक सुवर्ण संधी चालून आली. त्यावेळी त्यांनी एन. बी. सी. रेडिओ नेटवर्क या वाहिनीवर ‘मा पर्किन्स’ नावाच्या एका शोला मोठी स्पॉन्सरशीप दिली. या आर्थिक मदतीच्या बदल्यात त्यांनी ऑक्सिडॉल नामक साबणाची जाहिरात केली.

या मालिकेच्या निर्मात्यांनी ऑक्सिडॉल साबणाच्या जाहिरातीत डेली सोप हा शब्द पहिल्यांदा वापरला. जसजशी ही मालिका लोकप्रिय झाली, तसतसा डेली सोप हा शब्द देखील लोकांच्या अंगवळणी पडू लागला. पुढे हीच कल्पना एन. बी. सी. रेडिओ नेटवर्कच्या इतर स्पर्धक वाहिन्यांनी वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी जाहिरात मिळालेल्या प्रत्येक मालिका चक्क डेली सोप या नावानेच ब्रॉडकास्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर हीच प्रक्रिया टीव्ही मालिकांच्या बाबतीतही सुरु राहिली. आणि पाहता पाहता दररोज प्रदर्शित होणाऱ्या टीव्ही मालिकेला डेली सोप असे म्हणण्याची प्रथा रुढ झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारतात डेली सोप ही टर्म भारतात खूप लोकप्रिय आहे. भारतात बालाजी टेलीफिल्मच्या मालिका मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. दिग्दर्शिका एकता कपूर यांच्या या मालिका पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.