Fact Check: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि खोट्या दाव्यांचा वर्षाव होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषा आणि पंजाब, जम्मू आणि राजस्थानमधील पाकिस्तानच्या गोळीबार आणि हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या भागातून अधिकृत माहिती येतच आहे. मात्र, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्यादेखील ऑनलाइन शेअर केल्या जात आहेत.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या फॅक्ट चेक टीमने सोशल आणि मुख्य प्रवाहातील प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेली दिशाभूल करणारी माहिती व दावे ओळखण्यासाठी आणि पडताळण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सरकारने जनतेला फक्त अधिकृत सूचना, हेल्पलाइन नंबर व खात्रीशीर मदतीवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला आहे. खोट्या दाव्यांचा सोशल मीडियावर पूर येत असल्याने लोकांना खोट्या पोस्ट किंवा सैन्याच्या हालचालींबद्दलची माहिती फॉरवर्ड करू नका, असेदेखील सांगण्यात आले आहे. या बातमीत आम्ही ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या काही दाव्यांवर प्रकाश टाकत त्यांचे स्पष्टीकरण या विश्लेषणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहोत… या खोट्या दाव्यांचे व माहितीचे पीआयबीने खंडन करीत त्याबाबतचे पुरावेदेखील दिले आहेत.
१. फॅक्ट चेक : काश्मीरमध्ये ३ भारतीय विमानांच्या अपघाताबाबत चायना डेलीचा अहवाल
चायना डेलीच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, काश्मीरमध्ये तीन भारतीय विमाने कोसळली. मात्र, पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये पथकाने या दाव्याची तपासणी करीत स्पष्ट केले की, या पोस्टसाठी वापरलेला फोटो २०१९ मधील एका मागील घटनेचा आहे. पीआयबीने २०१९ मध्ये अल जझीराने या संबंधित फोटोसह एक्सवर लिहिलेल्या एका पोस्टची लिंक शेअर केली.
२. फॅक्ट चेक : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल फेसबुकवर आहेत का?
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विधान केल्याचा दावा करणारी एक पोस्ट ऑनलाइन व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे सूचित केले जात आहे की, पाकिस्तान सायबर हल्ल्याची तयारी करीत आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने पोस्ट बनावट असल्याचे सांगत म्हटले आहे की, अजित डोवाल यांच्या नावे असणारे ते अकाउंट बनावट आहे. त्यात असेही म्हटले आहे की, अजित डोवाल यांचे फेसबुकवर अधिकृत अकाउंट नाही.
“नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही ढोंगी किंवा बनावट प्रोफाइलशी संबंध ठेवू नका,” असे एजन्सीने म्हटले आहे.
३. फॅक्ट चेक: पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये भारतीय सुखोई एसयू-३० एमकेआय पाडण्यात आले का?
काही पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्सनी पोस्ट केले आहे की, पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-३०एमकेआय पाडण्यात आले आणि वैमानिकाला ताब्यात घेण्यात आले.
पीआयबीने हा दावा फेटाळून लावला आहे आणि शेअर केलेला फोटो प्रत्यक्षात १४ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रातील पुणे-अहमदनगर महामार्गालगत असलेल्या कुलवाडी गावातील उंड्रे वस्ती येथे झालेल्या अपघाताचा आहे, असे स्पष्ट केले आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी त्याच फोटोचा वापर करणारा एक लेखदेखील शेअर करण्यात आला होता.
४. फॅक्ट चेक : भारतावर पाकिस्तानने केलेल्या एमएलआरएस (मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टम्स) बॅरेजबाबतचे दावे
मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम्स (एमएलआरएस)कडून मोठ्या बॅरेज दाखवणारी व्हिडीओ क्लिप भारतावर पाकिस्तानी हल्ल्याचे फुटेज असल्याचे सांगत खोटा दावा केला जात आहे, असे एजन्सीने म्हटले आहे. पीआयबीने खात्री केली आहे की, ही क्लिप एका व्हिडीओ गेममधील आहे आणि तीन वर्षांहून अधिक काळ ती ऑनलाइन उपलब्ध आहे. सध्याच्या भारत-पाकिस्तान परिस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही.
एजन्सीने संदर्भासाठी व्हिडीओ गेमची लिंकदेखील पोस्ट केली आहे.
५. फॅक्ट चेक: एटीएम २-३ दिवसांसाठी बंद आहेत का?
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे एटीएम दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहतील. सरकारच्या तथ्य तपासणी पथकाने हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले की, सर्व बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत आणि लोकांमध्ये असे संदेश पसरवू नका जे पडताळलेले किंवा खात्रीशीर नाहीत.
६. फॅक्ट चेक : जम्मू हवाई दल तळावर स्फोट?
ऑनलाइन शेअर केल्या जात असलेल्या फोटोमध्ये जम्मू हवाई दल तळावर अनेक स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या प्रतिमांचे पुनरावलोकन केले आणि त्यातून असे समोर आले की, ते आताचे नाहीत. ते फोटो प्रत्यक्षात ऑगस्ट २०२१ मध्ये काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटातील आहेत. काबूल स्फोटावरील एका बातमीची लिंकदेखील एजन्सीने शेअर केली होती.
७. फॅक्ट चेक : गुजरातच्या हजिरा बंदरावर पाकिस्तानने हल्ला केला होता का?
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानने गुजरातमधील हजिरा बंदरावर हल्ला केला होता. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा फेटाळून लावला आहे आणि स्पष्ट केले आहे की, व्हिडीओमध्ये एक वेगळी घटना दाखवलेली आहे. त्यात ७ जुलै २०२१ रोजीचा तेल टँकरचा स्फोट दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ दुबईतील जेबेल अली बंदरातील आहे. एजन्सीने त्याबाबत एका बातमीची लिंक शेअर केली आहे.
८. फॅक्ट चेक : पंजाबमधील जालंधरमध्ये ड्रोन हल्ला?
ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये जालंधर इथे ड्रोन हल्ल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले की, तो कोणत्याही ड्रोन हालचालीशी संबंधित नाही. व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात एका शेतात आग लागल्याचे दाखवले आहे. एजन्सीने असेही म्हटले आहे की, व्हिडीओतील वेळ संध्याकाळी ७:३९ वाजताची आहे. ही ८ मे रोजी ड्रोन हल्ला सुरू होण्यापूर्वीची आहे.
९. फॅक्ट चेक : पाकिस्तानी हँडलर भारतीय लष्कराची चौकी उद्ध्वस्त झाल्याचा दावा करतात
पाकिस्तानातील अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौकी उद्ध्वस्त केली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या प्रकरणाची चौकशी केली आणि पोस्टमध्ये वापरलेला व्हिडीओ बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय सैन्यात २० राज बटालियन नावाचे कोणतेही युनिट नाही. “हा एका प्रचार मोहिमेचा भाग आहे, ज्याचा उद्देश दहशत निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करणे आहे,” असे एजन्सीने म्हटले आहे.
१०. फॅक्ट चेक: पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्रे डागली का?
ऑनलाइन शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केला. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, या व्हिडीओचा भारताशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ २०२० मध्ये लेबनॉनमधील बैरूत येथे झालेल्या स्फोटाचा आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी एजन्सीने चार वर्षांपूर्वीची एक व्हिडीओ लिंकदेखील शेअर केली आहे. त्यामध्ये तोच स्फोट दाखवला गेला आहे.
११. फॅक्ट चेक : भारतातील विमानतळांवर बंदी आहे का?
सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यात म्हटले आहे की, लोकांना आता देशभरातील विमानतळांवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, हे खरे नाही. सरकारने असे कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. हा दावा खोटा आहे.
१२. फॅक्ट चेक: राजौरी येथे लष्करी ब्रिगेडवर फिदायीन हल्ल्याबाबतचे दावे
सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे लष्करी ब्रिगेडवर फिदायीन हल्ला झाला. पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याची तपासणी केली आणि कोणत्याही लष्करी छावणीत असा कोणताही आत्मघाती हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यात म्हटले आहे की, हा दावा गोंधळ पसरवण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता.
१३. फॅक्ट चेक : लष्करप्रमुखांचे लष्करी तयारीवरील ‘पत्र’
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका पत्रात दावा करण्यात आला आहे की, लष्करप्रमुख जनरल व्ही. के. नारायण यांनी नॉर्दर्न कमांडमधील एका अधिकाऱ्याला लष्करी तयारीबद्दल एक गोपनीय पत्र पाठविले होते. पीआयबी फॅक्ट चेकने पोस्टची पडताळणी केली आणि म्हटले की जनरल नारायण हे सध्याचे लष्करप्रमुख नाहीत. हे पत्र पूर्णपणे खोटे आहे. “अचूक माहितीसाठी फक्त भारत सरकारच्या अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहा”, असा सल्ला एजन्सीने दिला आहे.
१४. फॅक्ट चेक : अमृतसरवर हल्ला करण्यासाठी भारतीय सैन्याने अंबाला एअरबेसचा वापर केल्याचे दावे
सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय सैन्याने अमृतसर शहरावर आणि भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यासाठी अंबाला एअरबेसचा वापर केला. पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले की, हे दावे पूर्णपणे निराधार आहेत आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर आणखी स्पष्टता देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून एक सविस्तर प्रेस रिलीजदेखील एजन्सीने जारी केली.
१५. फॅक्ट चेक: भारताने पाकिस्तानमधील नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पाला लक्ष्य केले होते का?
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, भारताने पाकिस्तानमधील नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पाला लक्ष्य केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा निराधार असल्याचे सांगितले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, भारताने फक्त दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते.
१६. फॅक्ट चेक : पाकिस्तानी क्षेपणास्त्राने भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीला धडक दिली का?
पाकिस्तानमधील अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी असे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दावा केला गेला आहे की, पाकिस्तानी क्षेपणास्त्राने भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली, सुदर्शन चक्रवर धडक दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले की, हा व्हायरल होणारा फोटो २०२३चा आहे आणि त्यात मॉस्कोमधील एका लष्करी तळावर आग लागल्याचे दाखवले आहे. एजन्सीने दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील प्रतिमेची लिंक दिली.
१७. फॅक्ट चेक: पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बट्टल सेक्टरमधील चौक्यांवर हल्ला केला का?
पाकिस्तानस्थित अकाउंट्सनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या बट्टल सेक्टरमधील चौक्यांवर हल्ला केला होता. त्यामध्ये किमान १२ भारतीय सैनिक ठार झाले होते.
पीआयबी फॅक्ट चेकने पुष्टी केली की, हा व्हिडीओ जुना आहे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरच्या कोणत्याही कारवायांशी संबंधित नाही. ही प्रतिमा ऑगस्ट २०११ मधील आहे आणि २०१६ च्या एका बातमीतदेखील वापरली गेली होती.
१८. फॅक्ट चेक : पाकिस्तानने भारतीय लष्करी वसाहतीवर हल्ला केला होता का?
सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानी हल्ल्यात भारतीय लष्करी वसाहतीला लक्ष्य करण्यात आले होते. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोडून काढत स्पष्ट केले की, हा व्हिडीओ प्रत्यक्षात इंडोनेशियातील असून, तो ६ मे २०२५ रोजीचा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आधी तो चित्रित करण्यात आला होता.
१९. फॅक्ट चेक : पाकिस्तानने भारतीय राफेल विमाने पाडली का?
पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, व्हिडीओमध्ये पाकिस्तान भारतीय राफेल विमाने पाडत असल्याचे दाखवले गेले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने हा व्हिडीओ २०१९ चा असल्याचे उघड केले आहे. त्यात जम्मू-काश्मीरमधील बडगामजवळ कोसळलेल्या भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
२०. फॅक्ट चेक : पाकिस्तानने गुजरानवाला येथे भारतीय ड्रोन अडवला का?
पाकिस्तानस्थित अकाउंट्सनी असे फोटो प्रसारित केले आहेत की, पाकिस्तानी सैन्याने गुजरानवाला येथे कोसळलेल्या भारतीय यूएव्ही ड्रोनला अडवले. पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले की, हे फोटो २०२२ मध्ये युक्रेन-रशिया संघर्षादरम्यानचे आहेत. या माहितीची खात्रीलायक वृत्ताची लिंकही त्यांनी शेअर केली.
२१. फॅक्ट चेक : पाकिस्तानने अमृतसरमधील लष्करी तळावर हल्ला केला का?
पाकिस्तानस्थित खात्यांनी असे व्हिडीओ शेअर केले होते; ज्यात पाकिस्तानने अमृतसरमधील लष्करी तळावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोडून काढला आणि म्हटले की, हा व्हिडीओ २०२४ चा आहे. एजन्सीने लोकांना अशी खोटी, बनावट माहिती शेअर करणे टाळण्याचे आणि अचूक माहितीसाठी केवळ भारत सरकारच्या अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.
एजन्सीने लोकांना अशी खोटी, बनावट माहिती शेअर करणे टाळण्याचे आणि अचूक माहितीसाठी केवळ भारत सरकारच्या अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.