Fauja Singh Marathon Runner Death : जगातील सर्वात वयस्क मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांचं सोमवारी (तारीख १४ जुलै) कार अपघातात निधन झालं. पंजाबचा जालंधर-पठाणकोट महामार्ग ओलांडत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातात फौजा सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं; पण सायंकाळी साडेसात वाजता वयाच्या ११४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. दरम्यान, कोण होते फौजा सिंग? त्यांनी जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळख कशी मिळवली? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…
१ एप्रिल १९११ मध्ये पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात फौजी सिंग यांचा जन्म झाला. चार भावंडांमध्ये ते सर्वांत लहान होते आणि बालपणी त्यांची शारीरिक प्रकृती अत्यंत अशक्त होती. गावातील लोक त्यांना “काठी” (Stick) या टोपणनावाने हाक मारत, कारण त्यांचे पाय इतके अशक्त होते की, ते पाच वर्षांचे होईपर्यंत नीट चालू शकत नव्हते. शाळेत जाण्याऐवजी त्यांनी बालपणीचा जास्तीत जास्त वेळ शेतावर काढला. गुरांना चारा घालणे, मका व गहू पिकाला पाणी घालणे अशी कामे ते करीत असत. “मी लहानपणी खूप अशक्त होतो आणि पाच वर्षांचा होईपर्यंत मला चालताही येत नव्हतं; पण वाहेगुरूच्या आशीर्वादाने मी चालायला लागलो,” असं त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
‘मॅरेथॉन’ हा शब्दही माहीत नव्हता
वयाची चाळिशी गाठण्यापर्यंत फौजा सिंग यांनी दोन्ही महायुद्ध व भारताच्या फाळणीचे भयावह दिवस पाहिले होते; पण या सर्व अनुभवांनंतरही त्यांच्या मनात कधीच भीती निर्माण झाली नाही. “माझ्या तरुणपणात मला ‘मॅरेथॉन’ हा शब्दही माहीत नव्हता. मी शाळेत कधीच गेलो नाही, ना कधी खेळात भाग घेतला. मी एक शेतकरी होतो आणि माझं संपूर्ण आयुष्य शेतातच गेलं,” असं त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जान कौर यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर फौजा सिंग यांना सहा अपत्ये झाली. १९९३ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या मोठ्या मुलाबरोबर राहायला गेले.
आणखी वाचा : कपिल देव यांच्यानंतरचा सर्वोत्तम अष्टपैलू कोण? रवींद्र जडेजाची आकडेवारी काय सांगते?
फौजा सिंग यांनी मॅरेथॉनची तयारी कशी सुरू केली?
काही दिवसांतच फौजा सिंग यांचा धाकटा मुलगा कुलदीपचा अपघाती मृत्यू झाला, ज्यामुळे ते पूर्णपणे खचून गेले. लंडनला गेल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ चालणे व नंतर धावणे सुरू केले. त्यांच्या घराजवळील असलेल्या एका उद्यानांमध्ये ते नियमितपणे जात असत. या दरम्यान, स्थानिक गुरुद्वाऱ्यात गेल्यानंतर त्यांची ओळख वृद्ध धावपटू हरमंदर सिंग यांच्याशी झाली. कालांतराने दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली व त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी सुरू केली. “माझी ओळख हरमंदर सिंग यांच्याशी झाली नसती, तर मला मॅरेथॉनमध्ये कधीच सहभाग घेता आला नसता,” असं फौजा सिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसला’ सांगितलं होतं.
फौजा सिंग यांना ‘टर्बन टोरनॅडो’ का म्हटलं जायचं?
- फौजा सिंग यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी लंडनमध्ये २००० साली झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला.
- या स्पर्धेतील अंतर त्यांनी ६ तास ५४ मिनिटांमध्ये पूर्ण केलं आणि तेथूनच त्यांना एक नवीन ओळख मिळाली.
- त्यानंतर झालेल्या प्रत्येक मॅरेथॉन स्पर्धेत फौजा सिंग सहभागी झाले आणि अधिकच जलदगतीने धावू लागले.
- तिसऱ्या लंडन मॅरेथॉनमध्ये त्यांनी आपला फौजा सिंग यांचा धावण्याचा वेळ ९ मिनिटांनी सुधारला.
- २००३ मध्ये त्यांनी टोरोंटो वॉटरफ्रंट मॅरेथॉनमध्ये ५ तास ४० मिनिटांत स्पर्धा पूर्ण करीत सर्वांना चकित केलं.
- फौजा सिंग यांनी आपल्या उत्तम आरोग्याचं आणि दीर्घायुषी आयुष्याचं श्रेय शिस्तबद्ध शाकाहारी आहाराला दिलं.
- कमी खाणं, जास्त धावणं आणि नेहमी आनंदात राहणं हाच माझ्या दीर्घायुष्याचा मंत्र आहे, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं होतं.
- २००३ मध्ये Adidas कंपनीने त्यांना मोहम्मद अलीसोबत ‘Nothing Is Impossible’ मोहिमेमध्ये स्थान दिलं.
- २००५ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी फौजा सिंग यांना लाहोर मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं.
- २००६ मध्ये इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये फौजा सिंग यांचं स्वागत केलं.
- वयाची शंभरी गाठल्यानंतर फौजा सिंग यांनी टोरोंटोमधील मॅरेथॉन स्पर्धेत त्यांच्या वयोगटात अनेक जागतिक विक्रम मोडले.
- १९११ सालचा जन्म दाखला नसल्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने फौजा सिंग यांचे विक्रम मान्य केले नाहीत.
- २०१२ मध्ये फौजा सिंग यांनी लंडन ऑलिंपिकमध्ये ज्योती वाहक म्हणून गौरव प्राप्त केला आणि त्यांना ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून ओळख मिळाली.
- २०१३ मध्ये हाँगकाँगमधील १० किमी अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेनंतर फौजा सिंग यांनी स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली.
फौजा सिंग दररोज १६ किलोमीटरपर्यंत पायी चालत.
मॅरेथॉनमधून निवृत्ती घेतल्यानंतरही फौजा सिंग यांनी पायी चालणं थांबवलं नव्हतं. त्यांचे प्रशिक्षक हरमंदर सिंग यांच्या मते, फौजा सिंग दररोज ईस्ट लंडनमधील इलफर्ड परिसरात १६ किलोमीटरपर्यंत पायी चालत असत. २०१५ मध्ये त्यांना खेळ आणि सामाजिक सेवेसाठी ‘ब्रिटीश एम्पायर मेडल’ देऊन सन्मानित करण्यात आलं. २०२० मध्ये लेखक सिमरनजीत सिंग यांनी लिहिलेल्या ‘Fauja Singh Keeps Going’ या पुस्तकामुळे त्यांची प्रेरणादायी कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचली. हे पुस्तक एका प्रमुख प्रकाशकाकडून प्रकाशित झालेलं शीख नायकावर आधारित पहिलं बालचित्र पुस्तक ठरलं. “मी आता १०८ वर्षांचा आहे, म्हणजे मी तुमच्यापेक्षा शंभर वर्षांनी मोठा आहे,” असं फौजा सिंग यांनी लहान वाचकांसाठी लिहिलेल्या प्रस्ताविकेत नमूद केलं होतं.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत? सीमेवरील जवान थेट राज्यांमध्ये तैनात; कारण काय?
फौजा सिंग यांच्या निधनावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
फौजा सिंग यांच्या अपघाती निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना असाधारण खेळाडू आणि अविश्वसनीय दृढनिश्चयी व्यक्ती म्हणून संबोधलं. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात, “फौजा सिंग जी यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. भारतातील तरुणांना फिटनेस या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रेरणा देण्याची त्यांची पद्धत असाधारण होती. अचल निश्चयी वृत्ती असलेले ते एक असाधारण खेळाडू होते. त्यांच्या निधनाने मला दुःख झाले. त्यांच्या कुटुंबासोबत आणि जगभरातील असंख्य चाहत्यांसोबत मी माझ्या संवेदना व्यक्त करत आहे.”
पंजाबच्या राज्यपालांनी वाहिली फौजा सिंग यांना श्रद्धांजली
पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांनीही फौजा सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. “प्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू आणि लवचिकता आणि आशेचे प्रतीक असलेले सरदार फौजा सिंग जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. वयाच्या ११४ व्या वर्षीही ते त्यांच्या उत्साहाने तरुणांना प्रेरणा देत राहिले. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या गावी बियास, जिल्हा जालंधर येथून निघालेल्या दोन दिवसांच्या ‘नशा मुक्त – रंगला पंजाब’ या पदयात्रेत त्यांच्यासोबत चालण्याचा मान मला मिळाला होता. निरोगी आणि ड्रग्जमुक्त पंजाबसाठी लढणाऱ्यांच्या हृदयात त्यांचा वारसा कायमचा जिवंत राहील. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो”, असे पंजाबच्या राज्यपालांनी म्हटलं आहे.