FIFA Penalty shootout Rules and history in World Cups: विश्वचषक २०२२ स्पर्धेत बाद फेरीपासून पेनल्टी शूट-आऊट्सचा अवलंब सुरू झाला असून क्रोएशियाकडून ब्राझीलचा झालेला पराभव हा आतापर्यंतचा सर्वाधिक धक्कादायक निकाल ठरला. क्रोएशिया-जपान, मोरोक्को-स्पेन, अर्जेंटिना-नेदरलँड्स हे आणखी तीन सामने पेनल्टी शूट-आऊटपर्यंत गेले. पेनल्टी शूट-आऊट हा काहींच्या मते निकाल ठरवण्यासाठी एक प्रकारे लॉटरीचा मामला असला, तरी काही संघ यात निपुण असतात, तर काही निस्तेज. या थरारक प्रकाराचा विश्वचषकाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
पेनल्टी शूट-आऊट्सपूर्वी कशा प्रकारे कोंडी फोडली जायची?
पेनल्टी शूट-आऊटपूर्वी एखाद्या बरोबरीतल्या सामन्याचा निकाल कसा ठरवायचा याविषयीनेमके नियम नव्हते. निर्धारित वेळेत बरोबरीत सुटलेला सामना पुन्हा खेळवण्याचा एक पर्याय होता. मध्यंतरीच्या काळात अतिरिक्त वेळेचा पर्याय पुढे आला. त्याही वेळेत सामना बरोबरीत राहिला, तर काय करायचे याविषयी फारसे विचारमंथनच झालेले नव्हते. कारण त्या काळात तुल्यबळ संघांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सामने बरोबरीत राहण्याचे प्रमाणही खूप कमी होते. परंतु १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात सामने बरोबरीत सुटण्याचे प्रमाण वाढू लागले. बलाढ्य, आक्रमक संघांविरुद्ध गोलच होऊ नये यासाठी व्यूहरचना तयार होऊ लागल्या. तेव्हा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये याविषयी नेमका तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. युरो १९६८मध्ये उपान्त्य फेरीचा विजेता (इटली, वि. सोव्हिएत महासंघ) चक्क नाणेफेकीने ठरवावा लागला. मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये इस्रायल वि. बल्गेरिया सामन्यात नाणेफेकीचा कौल बल्गेरियाच्या बाजूने लागला. या विशिष्ट सामन्यानंतरच पेनल्टी शूट-आऊटविषयी गांभीर्याने विचार होऊ लागला.
विश्वचषकात पहिल्यांदा पेनल्टी शूट-आऊट्स केव्हा सुरू झाले?
इस्रायली पत्रकार जोसेफ दगान, जे पुढे इस्रायली फुटबॉल संघटनेचे सरचिटणीस बनले, यांना पेनल्टी-शूटआऊटची संकल्पना प्रथम मांडण्याचे श्रेय दिले जाते. १९७०मध्ये त्यांनी आणखी काही सहकाऱ्यांसमवेत ही संकल्पना इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन बोर्ड (आयएफएबी) या आंतरराष्ट्रीय फुटबॉलविषयक नियम बनवणाऱ्या समितीसमोर मांडली. ती स्वीकारली गेली. यानुसार १९७८ मध्ये अर्जेंटिनात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बाद फेऱ्यांमध्ये बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूट-आऊटचा अवलंब करण्याचे ठरले.
विश्वचषकात पेनल्टी शूट-आऊटवर गेलेला पहिला सामना कोणता?
अर्जेंटिना १९७८ विश्वचषकापासून पेनल्टी शूट-आऊट वापरण्याचे ठरले, तरी पहिले शूट-आऊट स्पेन १९८२ विश्वचषकात घडले. तो पश्चिम जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील उपान्त्य फेरीचा सामना होता. त्यावेळी प्रत्येकी ६ किक घेतल्या गेल्या आणि पश्चिम जर्मनीने ५-४ अशी बाजी मारली. त्यावेळी पेनल्टीसाठी स्वतंत्र नियोजन वा प्रशिक्षण घेण्याची पद्धत नव्हती. त्या सामन्यात पेनल्टी शूट-आऊटच्या वेळी बहुतेक फ्रेंच खेळाडू बूट काढून बसले आणि त्यांची पेनल्टी मारण्याची तयारीच नव्हती! फ्रान्सचा अॅलेन गिरेस पेनल्टी शूट-आऊटमध्ये गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला. पश्चिम जर्मनीचा उलरीच स्टील्के गोल करू न शकणारा पहिला फुटबॉलपटू ठरला, तर पश्चिम जर्मनीचा टोनी शुमाकर शूट-आऊटमध्ये पेनल्टी रोखणारा पहिला गोलकीपर ठरवा.
नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास
पेनल्टी शूट-आऊटचे नियम काय आहेत?
केवळ बाद फेरीतच पेनल्टी शूट-आऊट घेतले जाऊ शकते. निर्धारित ९० मिनिटे अधिक दुखापतींचा वेळ, मग आणखी ३० मिनिटे अधिक दुखापतींचा वेळ संपल्यानंतरही सामना बरोबरीत राहिल्यास शूट-आऊटचा अवलंब केला जातो. यासाठी प्रथम दोन वेळा नाणेफेक होते. पहिल्या नाणेफेकीत मैदानाच्या कोणत्या बाजूच्या गोलजाळ्यात शूट-आऊट होईल हे ठरवले जाते. दुसऱ्या नाणेफेकीत कोणता संघ पहिली किक घेणार हे ठरवले जाते. दुसरी नाणेफेक जिंकणारा संघ प्रतिस्पर्धी संघाला पहिली किक देण्याचा पर्याय सांगू शकतो. दोन्ही संघांना प्रत्येकी पाच फुटबॉलपटू किक घेण्यासाठी निर्धारित करावे लागतात. हे पाचही खेळाडू अतिरिक्त वेळेच्या अखेरीस सामना संपताना प्रत्यक्ष मैदानावर असलेलेच निवडावे लागतात. दोन्ही संघांनी आलटून-पालटून किक घ्यायच्या असतात. गोलकीपरही किक मारू शकतात. प्रत्येकी पाच किकनंतरही कोंडी न फुटल्यास ‘सडन डेथ’ प्रकाराचा अवलंब केला जातो. यात दोन्ही संघांना एकेक किक मिळते. या चक्रात जो संघ पहिल्यांदा अयशस्वी ठरतो, तो हरतो. पाचही खेळाडू आणि गोलकीपर यांनी किमान एक किक मारल्यानंतरच एखाद्या खेळाडूला दुसऱ्यांदा किक मारण्यासाठी पाठवता येते. पेनल्टी शूट-आऊटमधील गोलांची नोंद संबंधित खेळाडूच्या नावावर होत नाही. याउलट ९० मिनिटांच्या निर्धारित वेळेत किंवा ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत पेनल्टीवर गोल झाल्यास तो संबंधित खेळाडूच्या नावापुढे नोंदवला जातो. तांत्रिकदृष्ट्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये गेलेल्या सामन्यांचे वर्णन ‘बरोबरी’ असे केले जाते. स्कोअरपुढील कंसात कोणता संघ शूट-आऊटवर विजयी झाला, ते नोंदवले जाते.
विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पेनल्टी शूट-आऊटवर कधी गेला?
दोन वेळा. १९९४ आणि २००६. दोन्हींमध्ये इटलीचा संघ होता. पहिल्या खेपेला इटलीला ब्राझीलकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. तो सामना निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जगज्जेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूट-आऊटचा अवलंब करावा लागला. २००६मध्ये फ्रान्स आणि इटली यांच्यात निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्यानंतर सामना पेनल्टी शूट-आऊटमध्ये गेला. त्यावेळी मात्र इटलीने ५-३ अशी बाजी मारली.
नक्की वाचा >> “प्रत्येक वेळेस जीव ओतून…”; ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी विराटची भावूक पोस्ट! प्रेरणास्थान असा उल्लेख करत म्हणाला, “तुला पाहून…”
अर्जेंटिना, जर्मनी, क्रोएशिया सर्वाधिक यशस्वी…
अर्जेंटिना, जर्मनी, क्रोएशिया आणि काही प्रमाणात ब्राझील हे विश्वचषकाच्या इतिहासात पेनल्टी शूट-आऊटमध्ये सर्वांत यशस्वी संघ मानता येतील. अर्जेंटिनाला सर्वाधिक ६ वेळा पेनल्टी शूट-आऊटपर्यंत खेळावे लागले, यात ते ५ वेळा यशस्वी ठरले. हाही एक विक्रमच. २००६मध्ये ते एकदाच जर्मनीविरुद्ध पराभूत झाले. जर्मनी आणि क्रोएशिया आजवर ४ वेळा पेनल्टी शूट-आऊटमध्ये उतरले आणि आजवर १०० टक्के यशस्वी ठरले. दोन्ही संघ २पेक्षा अधिक शूट-आऊट खेळलेल्या संघांमध्ये टक्केवारीनुसार सर्वाधिक यशस्वी ठरतात. ब्राझीलने ५ पैकी ३ वेळा शूट-आऊट जिंकले, पण २ वेळा ते पराभूत झाले. अलीकडेच या स्पर्धेत ते उपान्त्यपूर्व फेरीत क्रोएशियाविरुद्ध हरले. त्यामुळे उपान्त्य फेरीत क्रोएशिया आणि अर्जेंटिना यांचा सामना पेनल्टी शूट-आऊटमध्ये गेल्यास अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
स्पेन, इंग्लंड, नेदरलँड्स, इटली ‘चोकर्स’!
स्पेन सर्वाधिक ४ वेळा विश्वचषकात पेनल्टी शूट-आऊटवर अपयशी ठरले, तर एकदाच जिंकले. इंग्लंड, नेदरलँड्स आणि इटली हे ४पैकी ३ वेळा शूट-आऊटमध्ये पराभूत झालेले आहेत. तर फ्रान्सचे जय-पराजय समीकरण २-२ असे राहिले.