What is Tea App: ‘टी’ नावाचे एक ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं कारणही तसेच आहे. हे अ‍ॅप महिलांना पुरुषांविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी मदत करतं. एखादी महिला ज्या पुरुषाला डेट करीत आहे, त्याच्याशी पूर्वी कोणाचे संबंध होते, त्याची पार्श्वभूमी काय तसेच त्यांच्याबद्दलचा अनुभव शेअर करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला जात आहे. ‘जेन झी’ (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती) मध्ये ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. दुसरीकडे या अ‍ॅपला प्रसिद्धी मिळत असतानाच यामधले जवळपास ७२ हजार फोटो लीक झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी सकाळी एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर एक लिंक शेअर केली. त्यामध्ये वापरकर्त्यांना या अ‍ॅपमधून चोरी केलेल्या फोटोचा डेटाबेस डाऊनलोड करण्याचे आवाहन देण्यात आले. ‘टी’ या अ‍ॅपने फोटो लीक झाल्याचे अधिकृतपणे सांगितले.

काय आहे हे ‘टी’ अ‍ॅप?

टी अ‍ॅप हे महिलांसाठीचे एक खास अ‍ॅप आहे. हे महिलांना त्या डेट करत असलेल्या, पूर्वी डेट केलेल्या किंवा भूतकाळात संवाद साधलेल्या पुरुषांबद्दल अनुभव शेअर करण्याची परवानगी देते. महत्त्वाची बाब म्हणजे कोल्डप्लेमधील किस कॅम व्हिडीओ व्हायरल झाल्यावर जे प्रकरण उघड झाले, त्यानंतर हे अ‍ॅप अधिक लोकप्रिय झाले आहे.

हे अ‍ॅप कसे काम करते?

टी या अ‍ॅपची सुरुवात शॉन कुक यांनी आहे. कुक यांनी याआधी सेल्सफोर्स (सॉफ्टवेअर कंपनी) आणि शटरफ्लाय (डिजिटल प्रिंटिंग कंपनी) मध्ये काम केले होते. टिकटॉकवर या अ‍ॅपची लोकप्रियता अधिक आहे. हे अ‍ॅप जेन झी आणि पश्चिम आशियाई भागात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. सध्या याचे पाच लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. अ‍ॅपल स्टोअरवरील मोफत अ‍ॅप्सच्या यादीत हे वरच्या स्थानावर आहे. तसेच ते अँड्रॉइड फोनवरदेखील उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये ग्रुप चॅट आहे. त्यामध्ये महिला पुरुषांबद्दल आणि त्यांचे डेटिंगबद्दलचे अनुभव एकमेकांशी शेअर करतात.

महिला ज्या पुरुषांना डेट करीत आहेत, त्यांचे फोटो पोस्ट करू शकतात आणि त्यांच्याबद्दल ग्रीन फ्लॅग (एखाद्या महिलेसाठी तो पुरूष म्हणजे योग्य व्यक्ती) आणि रेड फ्लॅग (एखाद्या महिलेसाठी तो पुरूष म्हणजे अयोग्य व्यक्ती) दर्शविणारे अनुभवही शेअर करू शकतात. त्या एका पुरुषाने पूर्वी ज्या महिलांना डेट केले असेल, त्या महिलांकडूनही त्या पुरुषाच्या पार्श्वभूमीबद्दल माहितीदेखील मागू शकतात. या अ‍ॅपमधील काही फीचर्स मोफत आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल पाच मोफत शोध घेतल्यानंतर या अ‍ॅपसाठी पैसे भरावे लागतात.

हे अ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. यात कॅटफिश डिटेक्शन टेक्नॉलॉजीदेखील आहे. यामुळे वापरकर्त्यांना रिव्हर्स इमेज सर्च आणि बनावट प्रोफाइल शोधण्याची सुविधा मिळते. अनेक महिलांनी याबाबतचे त्यांचे अनुभवही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

डेटिंग अ‍ॅप्सवर महिलांची फसवणूक होण्याचा धोका तर असतोच. त्याशिवाय शारीरिक धोकाही असू शकतो. कोलंबिया जर्नलिझम इन्व्हेस्टिगेशन्ससोबत आयोजित केलेल्या २०१९ च्या प्रोपब्लिका अहवालात असे दिसून आले आहे की, १२०० महिलांपैकी एक-तृतीयांश महिलांवर डेटिंग अ‍ॅप्सवर भेटलेल्या पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले आहेत.

टी अ‍ॅप त्यांच्या नफ्यातील १० टक्के रक्कम राष्ट्रीय घरगुती हिंसाचार हॉटलाइनलादेखील देते. सोशल मीडियावर या अ‍ॅपचे बरेच कौतुक केले जात आहे. मात्र, पुरुषांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी या अ‍ॅपचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ज्या पुरुषांचे फोटो आणि माहिती या अ‍ॅपवर देण्यात येते, त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.

“या अ‍ॅपचा वापर सहजपणे खोटे आरोप पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याशिवाय सूड उगवण्यासाठीदेखील त्याचा वापर होऊ शकतो”, असे जागतिक सायबर सुरक्षा सल्लागार जेक मूर यांनी फोर्ब्सला सांगितले. अ‍ॅपवर पोस्ट करणाऱ्या महिलांनी हे काळजीपूर्वक करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अ‍ॅपवरील फोटो लीक झाल्याची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी अ‍ॅपच्या एका निवेदनानुसार, लीक झालेल्या फोटोंमध्ये वापरकर्त्यांनी त्यांचे प्रोफाइल तयार करताना अपलोड केलेले १३ हजार व्हेरिफिकेशन सेल्फी आहेत. ५९ हजार वापरकर्त्यांनी अपलोड केलेले असे फोटो होते, जे कोणीही पाहू शकतात.