भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर बरोबरच पाकिस्तानात खोलवर पंजाबमध्ये अचूक लक्ष्यभेदी हल्ल्यांद्वारे आता केवळ दहशतवादी केंद्रच नव्हे तर, त्यांची मुख्यालये लक्ष्य ठरतील, असा महत्त्वाचा संदेश दिला आहे. यापूर्वीच्या लक्ष्यभेदी हल्ल्यांच्या तुलनेत आताच्या कारवाईची व्यापकता मोठी आहे. यामुळे तणाव वाढण्याचा धोका संभवतो. मात्र पाकिस्तानकडून मर्यादित स्वरूपाचे हल्ले होतील. सर्वंकष युद्ध तो छेडणार नाही, असा अंदाज जम्मू-काश्मीरमधील लष्करी मुख्यालयाची जबाबदारी सांभाळणारे लेफ्टनंट जनरल डीएस हुडा (निवृत्त) आणि लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

दहशतवादी अड्ड्यांची निवड

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत नऊ ठिकाणी लक्ष्यभेदी हल्ले चढविले. यामध्ये पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी भरती व प्रशिक्षण केंद्र. घुसखोरीसाठी वापरली जाणारी ठिकाणे आदींचा समावेश आहे. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील लष्कर ए तय्यबाचे सवाई नाला केंद्र, मुझफ्फराबादमधील जैश ए मोहम्मदचे सय्यदना बिलाल केंद्र, कोटलमधील गुलपूर कॅम्प व अब्बास केंद्र यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानच्या सियालकोटमधील सरजल व मेहमूना केंद्र, मुरीदके येथील मरकझ तैयबा आणि बहावलपूरमधील मरकझ सुभानल्लाह हे जैश-ए-मोहंमदचे मुख्यालय देखील प्रथमच लक्ष्य ठरले.

सर्जिकल स्ट्राइक, बालाकोटपेक्षा वेगळा

उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता. यानंतर ११ व्या दिवशी भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिले होते. भारतीय लष्कराच्या विशेष तुकडीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील भिंबर येथील दहशतवादी तळावर हल्ला चढविला होता. फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर १३ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर मिराज – २००० लढाऊ विमानांनी हल्ले केले. हे दोन्ही लक्ष्यभेदी हल्ले विशिष्ट भागातील केंद्रांपुरते मर्यादित होते. ही नियंत्रण रेषेलगतची ठिकाणे होती. या तुलनेत सिंदूर मोहिमेतील लक्ष्यभेदी हल्ला वेगळा ठरला. त्याची व्यापकता अधिक असून तो खोलवर करण्यात आला. यावेळी केवळ प्रशिक्षण केंद्र वा घुसखोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्थळांपर्यंत तो मर्यादित राहिला नाही तर पंजाबमधील जैश ए मोहंमदच्या मुख्यालयापर्यंत विस्तारला आहे .

लेफ्टनंट जनरल हुडा (निवृत्त) म्हणतात…

पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला कठोर संदेश देण्याची आवश्यकता होती. त्याने दहशतवाद्यांचा वापर केला तर, आम्ही शांत बसणार नाही हा संदेश सिंदूर मोहिमेतून दिला गेला. यापूर्वीच्या दोन्ही लक्ष्यभेदी हल्ल्यात एखाद्या भागातील दहशतवादी केंद्र लक्ष्य करण्यात आली होती. आता एकाच वेळी नऊ ठिकाणच्या विविध केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने हा मोठा हल्ला आहे. महत्त्वाचे म्हणजे दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांनाही सोडले जाणार नसल्याचे अधोरेखित करण्यात आले. भारताच्या कारवाईंनंतर पाकिस्तान सैन्याकडून दाखविण्यासाठी मर्यादित स्वरूपाचे हल्ले होतील. सर्वंकष युद्ध तो छेडणार नाही.

लेफ्टनंट जनरल हसनैन (निवृत्त) म्हणतात…

भारतीय सैन्यदलांकडून ही कारवाई अपेक्षित होती. पण वेळ अनिश्चित होती. अमेरिकेचा केवळ आर्थिक व मानसिक कारवाई करण्यासाठी दबाव असेल असे अनेकांना वाटले. परंतु, लक्ष्यभेदी कारवाईचे धाडसी पाऊल उचलण्यात आले. पाकिस्तानचा मध्यभाग म्हणजे पश्चिम पंजाबमध्ये हल्ला करण्यात आला. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात खोलवर हल्ला करण्याचा संदेश महत्त्वाचा आहे. पाकिस्तानकडून तणाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु, क्षमतेअभावी तो त्या स्तरावर जाईल, याविषयी शंका आहे. काही कालावधीनंतर तो कुरापती काढू शकतो.