Mumbai High Court pigeon ruling मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित दादर येथील कबुतरखाना ही अनेक वर्षांपासून हजारो कबुतरांच्या विसाव्याची जागा राहिली आहे. मात्र, शनिवारी या कबुतरखान्यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. कबुतरांना खाद्य घालण्यावर बंदी घातल्यानंतर कबुतरखान्याला मोठ्या प्लास्टिकच्या चादरींनी झाकण्यात आले आहे. कबुतरांना खाद्य घालणे हा मुंबईतील एक वादग्रस्त विषय राहिला आहे. कबुतरांना खाद्य घालण्याची ही प्रथा अनेक शतकांपासून सुरू आहे. कबुतरखान्यांचा इतिहास आणि शहरात कबुतरांना खाद्य घालण्याची प्रथा काय आहे? ही प्रथा इतकी वादग्रस्त का ठरली आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.
कबुतरांना खाद्य घालण्याचा इतिहास काय?
- भारतीय संस्कृतींमध्ये कबुतरांना खाद्य घालणे हे एक पवित्र कार्य मानले जाते. या कार्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, असेही मानले जाते.
- तसेच, कबुतरांना अन्न अर्पण केल्याने दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वजांशी संबंधित कोणत्याही दोषांपासून मुक्ती मिळते, अशीही मान्यता आहे.
- ही प्रथा विशेषतः अमावास्येच्या दिवशी अधिक प्रभावी मानली जाते. काही संस्कृतींमध्ये अशीही धारणा आहे की, कबुतरे पृथ्वीवरील आणि आध्यात्मिक जगातील संदेशवाहक आहेत. त्यांना खाद्य दिल्याने आध्यात्मिक ऊर्जेबद्दलची आपली जाणीव वाढते आणि देवाशी घट्ट असे नाते निर्माण होते.

जैन धर्मात कबुतरांना खाद्य घालणे हे ‘जीव दया’ किंवा ‘जीवजंतूंवर दया’ या तत्त्वाचा एक भाग आहे. हा जैन नीतीशास्त्रातील एक मुख्य सिद्धान्त आहे. अनेक जैन कुटुंबे आणि मंदिरे नियमितपणे कबुतरांना खाद्य घालण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. सहसा मंदिरे किंवा ट्रस्टद्वारे संचालित कबुतरखान्यांमध्ये या कबुतरांना खायला दिले जाते. दादर कबुतरखानादेखील असेच एक कबुतरांचे खाद्य स्थळ आहे, जे एका जैन मंदिराने सुरू केले होते.
मुंबईमधील कबुतरांना खाद्य घालण्याचा इतिहास काय सांगतो?
मुंबईमध्ये मोठ्या संख्येने गुजराती आणि जैन व्यापारी असल्याने शहराच्या मुख्य कोपऱ्यांमध्ये कबुतरखाने आढळत होते. या कबुतरखान्यांमुळे शहरातील कबुतरांच्या संख्येमध्ये वाढ झाली, ही बाब २० व्या शतकाच्या सुरुवातीलाही नोंदवली गेली होती. एडवर्ड हॅमिल्टन ऐटकेन यांनी १९०९ साली ‘द कॉमन बर्ड्स ऑफ बॉम्बे’ (The Common Birds of Bombay) हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात शहरातील कबुतरांच्या वाढत्या संख्येची कारणे स्पष्ट करताना लिहिले गेलेय, “दोन गोष्टींमुळे ही कबुतरे मुंबईकडे आकर्षित होतात. एक म्हणजे निवासासाठी भरपूर जागा आणि दुसरे म्हणजे हिंदू धान्य व्यापाऱ्यांकडून परोपकारी वृत्तीने त्यांना खाद्य म्हणून दिले जाणारे धान्य.”
सुरुवातीच्या काळात कबुतरांना खाद्य घालण्याची एक प्रथा होती, ज्याचे नाव होते ‘पराबडी’. ही मोठी, सुशोभित पक्षिगृहे होती. ही पक्षिगृहे अंदाजे सात मीटर उंच, सहसा लाकडापासून तयार करण्यात आलेली, कोरीव काम केलेली व रंगवलेली असायची. या पक्षिगृहांना मांजरी आणि कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी छप्पर असलेल्या घरासारख्या संरचनांच्या स्वरूपात उंच ठिकाणी उभे केले जात असे. त्या ठिकाणी नियमितपणे पक्ष्यांसाठी, विशेषतः कबुतरांसाठी धान्य ठेवले जात असे. त्यापेक्षा मोठ्या संरचनांना ‘कबुतरिया’ किंवा ‘कबुतरखाना’, असे म्हटले जात असे. हे सुशोभित बांधकाम स्थानिक समुदायाच्या देणगीतून उभारले जात असे. लोक नियमितपणे कबुतरखान्यांमध्ये पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवत असत.
कबुतरखाने हे धर्मादाय स्थळ म्हणून विकसित झाले. त्या ठिकाणी अनेक धर्मांतील लोक धान्य दान करून आपले धार्मिक कर्तव्य पार पाडू शकत होते. त्यामुळेच ही अनेक बांधकामे मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांच्या जवळ आढळतात. आज मुंबईमध्ये ५० पेक्षा जास्त कबुतरखाने आहेत. हे सर्व कबुतरखाने प्रामुख्याने शहराच्या मुख्य भागांत आणि काही उपनगरीय भागांत आहेत. सर्वांत जुना आणि प्रसिद्ध कबुतरखाना म्हणजे दादर कबुतरखाना. हा कबुतरखाना दादर कबुतरखाना ट्रस्टद्वारे चालवला जातो.
१९४४ मध्ये बॉम्बे नगरपालिकेने दादरमधील जैन मंदिराला कबुतरांना खाद्य घालण्यासाठी ट्रॅफिक आयर्लंड बांधण्याची परवानगी दिली. ही परवानगी जैन मंदिराच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून देण्यात आली होती. जैन समाजाकडून मंदिराजवळ जमणाऱ्या आणि गाड्यांखाली येण्याचा धोका असलेल्या कबुतरांच्या संरक्षणासाठी एक जागा उभारण्याची मागणी करण्यात आली होती.
मुंबईत कबुतरांबद्दल चिंता का आणि कधी वाढली?
मुंबईत कबुतरांना खाद्य घालणे मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले होते. मात्र, ९० च्या दशकाच्या मध्यापासून चिंता वाढू लागली. कबुतरांच्या विष्ठेचा श्वसनविकारांशी संबंध जोडणारे अनेक वैद्यकीय अभ्यास समोर आले. त्यानंतर कबुतरांना खाद्य घालण्यावरून तक्रारी नोंदवल्या जाऊ लागल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनाच्या समस्या जाणवू लागत असल्याच्या तक्रारींचा समावेश होता.
२०१३ मध्ये एका बीएमसी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ३० जून रोजी ग्रँट रोडवरील कबुतरखान्याजवळ एका कबुतरामुळे तो आपल्या मोटरसायकलवरून फेकला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेनंतर स्थानिक नगरसेवकाने रस्त्यावरून धान्य विक्रेत्यांना हटवले. दोन दिवसांनंतर तत्कालीन बीएमसी कायदा समितीचे अध्यक्ष मकरंद नार्वेकर यांनी कबुतरखाने कमी गर्दीच्या ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, या प्रस्तावावर कधीही ठोस कारवाई झाली नाही. २०१४ पासून शहरातील अनेक कबुतरखाने हटवले गेले आहेत आणि कबुतरांना खाद्य घालताना पकडल्या गेलेल्या व्यक्तींना बीएमसीने दंड ठोठावला आहे.
कबुतरखान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सत्रादरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी कबुतरांची विष्ठा आणि पिसे यांमुळे होणाऱ्या श्वसन आरोग्याच्या धोक्याचे कारण देत मुंबईतील ५१ कबुतरखाने तत्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर बीएमसीने शहरभर मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांना दंड ठोठावला गेला आणि शहरातील कबुतरखाने बंद करण्यात आले. १५ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मानव आणि प्राणी यांचे हक्क संतुलित असले पाहिजेत, असे सांगितले. न्यायालयाने दिवसातून दोनदा कबुतरांना खाद्य घालण्याची परवानगी देणारा अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. परंतु, न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कोणत्याही ऐतिहासिक कबुतरखान्यांचे बांधकाम तोडू नये, असेही निर्देश दिले.
न्यायमूर्ती गिरीश एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने प्राणी हक्क कार्यकर्त्या पल्लवी सचिन पाटील यांच्यासह स्नेहा दीपक विसारिया व सविता महाजन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी घेतली. या याचिकेत मुंबई महापालिकेला कबुतरखाने पाडण्यापासून रोखण्याची आणि नागरिकांना कबुतरांना खाद्य घालण्यापासून प्रतिबंधित न करण्याची मागणी करण्यात आली होती. ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दादर (पश्चिम) आणि इतर कबुतरखान्यांमध्ये बेकायदा आणि न्यायालयाची अवज्ञा करून कबुतरांना खाद्य घालणाऱ्या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. शनिवारी अखेर मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित कबुतरखाना बंद करण्यात आला आणि त्याला जाड राखाडी रंगाच्या ताडपत्रीने झाकण्यात आले.