scorecardresearch

विश्लेषण : गुलाम नबी खरेच ‘आझाद’? की भाजपशी जवळीक?

काँग्रेसमध्ये पाच दशके घालविल्यानंतर आझाद यांनी २६ ऑगस्टला या पक्षाला रामराम ठोकला होता.

विश्लेषण : गुलाम नबी खरेच ‘आझाद’? की भाजपशी जवळीक?
आता त्यांच्या नव्या पक्षाच्या वाटचालीबाबत उत्सुकता आहे

-हृषिकेश देशपांडे

जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी डेमॉक्रेटिक आझाद पार्टीची स्थापना सोमवारी केली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पक्ष स्थापन करत, आझाद यांनी जम्मूतील जनतेला वेगळा संदेश दिला. काँग्रेसमध्ये पाच दशके घालविल्यानंतर आझाद यांनी २६ ऑगस्टला या पक्षाला रामराम ठोकला होता. आता त्यांच्या नव्या पक्षाच्या वाटचालीबाबत उत्सुकता आहे.

भाजपवर टीका टाळली…

आगामी निवडणुकीत अनुच्छेद-३७० चा प्राधान्याने उपस्थित करणार नसल्याचे स्पष्ट करत गुलाम नबींनी एक प्रकारे भाजपशी जवळीक असेल असे संकेतच दिले आहेत. पक्षाची घोषणा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली नाही हे विशेष. तसेच आझाद यांची वक्तव्ये पाहता ते भाजपशी थेट युती करणार नाहीत, पण पूरक भूमिका घेतील असे मानले जात आहे. पक्ष स्थापना करताना आझाद यांनी नवरात्रोत्सवाचा दिवस निवडला, जम्मू विभागातील हिंदू मतदार पाहता त्यांना जोडण्याचा हा प्रयत्न आहे. जम्मू विभागातील ४३ पैकी विधानसभेचे ३० मतदारसंघ हे हिंदुबहुल मानले जातात. भाजपचे त्या मतदारसंघांवर प्राबल्य आहे. जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभेच्या ११४ जागा आहेत. त्यामधील २४ जागा या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. तर उर्वरित ४७ काश्मीर खोऱ्यात आहेत. येथे जवळपास ९८ टक्के मुस्लिम आहेत. त्यामुळे भाजपला तिथे मोठा प्रभाव पाडणे अवघड आहे. त्यामुळे अल्ताफ बुखारी यांची अपनी पार्टी किंवा आता गुलाम नबी यांचा नवा पक्ष यांची भाजपला अप्रत्यक्ष मदत होऊ शकते. काश्मीर खोऱ्यात भाजपला फारसे स्थान नाही. त्यामुळे गुलाम नबींची भाजपशी जवळीक दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. आझाद यांना राज्यसभा किंवा अन्य कोणत्या तरी मार्गाने त्याची बक्षिशी मिळू शकते.

सहा महिन्यांत निवडणूक शक्य?

जम्मू व काश्मीर विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आझाद यांच्या नव्या पक्षाला तयारी करावी लागेल. सध्याची स्थिती पाहता, जम्मू व काश्मीरमध्ये भाजपचे नियंत्रण आहे. दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली आहे. दगडफेकीच्या घटना थांबल्या आहेत. संप, हरताळ नाहीत. तसेच भाजपने बाहेरून आलेल्यांना मतदानाचा हक्क देण्याचे सूचित केले आहे. या गोष्टी पाहता जम्मू व काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा असावा म्हणून पुरेपूर तयारी केली जात आहे. अशा स्थितीत भाजप गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाला किती मोकळीक देईल हाही प्रश्न आहेच.

प्रमुख पक्षांची स्थिती

आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची स्थिती जम्मू व काश्मीरमध्ये काहीशी कमकुवत आहे. काँग्रेसमधील प्रमुख अशा दोन डझन नेत्यांनी आझाद यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मेहबूबा मुफ्ती यांचा पीपल्स डेमॉक्रेटिक पक्ष व फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स या येथील प्रमुख प्रादेशिक पक्षांनी गुलाम नबींवर आतापर्यंत थेट टीका केलेली नाही. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० ची पुनर्स्थापना व्हावी यासाठी गुपकर आघाडी स्थापन करण्यात आली आहे. त्यात मुफ्ती आणि फारुख यांचे पक्ष प्रमुख आहेत. हीच आघाडी भाजपची स्पर्धक आहे. त्यात आता नव्या पक्षाची भर म्हणजे मते फोडण्यासाठीच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. रोजगार, विकास हेच मुद्दे घेऊन जनतेपुढे जाऊ अशी घोषणा पक्ष स्थापनेवेळी आझाद यांनी केली आहे. भावनिक मुद्द्यांपेक्षा जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कुणाशी स्पर्धा नाही असे आज जरी ते सांगत असले तरी निवडणुकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोप होणारच, त्या वेळी गुलाम नबी आझाद यांचा कल अधिक स्पष्ट होईल. तूर्तास तरी त्यांची खेळी भाजपसाठी काश्मीर खोऱ्यात पूरक अशीच आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या