-अनिकेत साठे
भारतीय हवाई दलात शस्त्रप्रणाली ही नवीन शाखा लवकरच कार्यान्वित होत आहे. बदलते युद्धतंत्र, भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन हवाई दलाने स्वत:मध्ये परिवर्तन घडविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सध्या हवाई दल तीन शाखांमार्फत काम करते. यामध्ये प्रत्येक शाखेच्या गरजेनुसार कमी-अधिक उपशाखा आहेत. भविष्यात शत्रू अदृश्य, आभासी स्वरूपात असणार आहे. त्याचा तितक्याच सक्षमतेने सामना करण्याची जबाबदारी शस्त्रप्रणाली शाखेवर राहणार आहे.
निर्णय नेमका काय?
भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिन सोहळ्यात हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी, सरकारने शस्त्रप्रणाली (डब्ल्यूएसबी) ही नवीन शाखा स्थापण्यास मान्यता दिल्याची माहिती दिली. स्वातंत्र्यानंतरच प्रथमच दलात नव्या शाखेची स्थापना करीत कार्यात्मक दृष्टीने बदल घडणार आहे. जमिनीवरून जमिनीवर व जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, दूरस्थपणे चालणारी विमाने (यूएव्ही), दोन किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या विमानांतील शस्त्र प्रणालीचे संचलन ही जबाबदारी नव्या शाखेवर राहणार आहे. या शाखेत चार उपशाखा असतील. त्यात उड्डाण उपशाखेत सुखोईसारख्या लढाऊ विमानात शस्त्र प्रणाली संचलनाचा अंतर्भाव असेल. दुसऱ्या दूरसंवेदक (रिमोट) उपशाखेत वैमानिकरहित विमाने अर्थात ड्रोन संचलन तर तिसऱ्या गुप्तवार्ता उपशाखेला सांकेतिक माहिती, प्रतिमा आदींच्या विश्लेषणातून शत्रूच्या हालचालींचा मागोवा काढावा लागणार आहे. चौथ्या जमिनीवरील कार्य उपशाखेत क्षेपणास्त्र कमांडर आणि क्षेपणास्त्र, अन्य आयुधांच्या चालकांचा (ऑपरेटर) अंतर्भाव राहणार आहे.
हवाई दलाची सद्यःस्थिती काय?
भारतीय हवाई दलात सध्या उड्डाण, तांत्रिक आणि जमिनीवरील कर्तव्ये पार पाडणारी या तीन शाखा आहेत. उड्डाण शाखा लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर व मालवाहू विमाने या तीन उपशाखांत कार्यरत आहेत. तांत्रिक शाखा विमाने व उपकरणांचे व्यवस्थापन, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सांभाळते. त्यात अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक उपशाखा आहेत. जमिनीवरील कार्य करणारी शाखा प्रशासकीय, वाणिज्य, पुरवठा व्यवस्था, शिक्षण व हवामानशास्त्र सेवा या पाच उपशाखांमार्फत विविध कामांची जबाबदारी पार पाडते.
रचनेत बदल कसे?
नव्या शस्त्रप्रणाली शाखेने हवाई दलाची रचनाही बदलणार आहे. आजवर लढाऊ विमानांचे सारथ्य, आयुधे, आधुनिक उपकरणे हाताळणी व संचलन यावर एकत्रितपणे काम चालत होते. नव्या शाखेने लढाऊ वैमानिक आणि शस्त्रास्त्र हाताळणी, संचलन यात विभागणी झाली आहे. शस्त्रप्रणाली शाखेत २०२३पर्यंत पहिली तुकडी समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. एअर मार्शल हुद्द्याचे (लेफ्टनंट जनरल समकक्ष) महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा कार्यरत असेल. अत्याधुनिक साधने व आयुधांनी युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. हवाई दलात तशी सामग्री समाविष्ट होत आहे. त्या दृष्टीने अतिप्रगत क्षेपणास्त्रे, उपग्रहाधारित व्यवस्था व उपकरणे, टेहेळणी व लढाऊ ड्रोनची हाताळणी याकरिता विशेष प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा संवर्ग तयार केला जाणार आहे.
प्रशिक्षणातही बदल होईल का?
हवाई दलात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), हवाई दल सामाईक प्रवेश परीक्षा (ॲफकॅट) आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएस) परीक्षेतून दाखल होता येते. एनडीएमध्ये अर्ज करताना इच्छुकांना आपल्याला कुठल्या दलात जायचे, ही निवड करता येते. पूर्वी हवाई दलात जाणाऱ्यांना एनडीएमधून केवळ उड्डाण या एकमेव शाखेत जाण्याचा मार्ग होता. त्यात बदल करीत आता उड्डाण शाखेबरोबर जमिनीवरील कार्याचाही पर्याय समाविष्ट झाला आहे. एनडीए प्रशिक्षणार्थी, ॲफकॅट व सीडीएस परीक्षा यशस्वी झालेल्यांना हैदराबाद येथील हवाई दल प्रबोधिनीत प्रशिक्षण दिले जाते. ॲफकॅट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना उड्डाण, जमिनीवरील कार्य तांत्रिक-अतांत्रिक शाखा, उपशाखेची निवड करता येते. प्रबोधिनीतील वैमानिक प्रशिक्षणात जे उत्तम कामगिरीत सातत्य राखू शकले नाही, ज्यांना वैद्यकीय कारणास्तव अडचणी आल्या, त्यांना जमिनीवरील कार्यासाठी पाठविले जाते. शस्त्रप्रणाली शाखेला अनुरूप भरती व प्रशिक्षणात बदल होणे अभिप्रेत आहे.
आर्थिक बचत कशी होईल?
नव्या शाखेच्या स्थापनेमुळे विमान प्रशिक्षणावरील खर्चात ३४०० कोटींहून अधिकची बचत होईल, असे हवाई दलाने म्हटले आहे. हेलिकॉप्टर प्रशिक्षणाचा प्रति तासाचा खर्च आठ ते १० लाखांच्या पुढे असल्याचे सांगितले जाते. लढाऊ विमानाच्या प्रशिक्षणाचा खर्च यापेक्षा कितीतरी अधिक असेल. हा खर्च कमी करण्यासाठी आभासी पद्धतीच्या उपकरणांचा (सिम्युलेटर) वापर होत आहे. नव्या शाखेद्वारे उड्डाण वगळता अन्य शाखेतील अधिकाऱ्यांना प्राथमिक हवाई प्रशिक्षण देण्याची गरज भासणार नाही. त्यातून सध्याच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.
विकेंद्रीकरणात समन्वयाची अधिक गरज का?
हवाई दलात आमूलाग्र बदल घडवताना नव्या व अस्तित्वातील शाखा, उपशाखांमध्ये समन्वय राखणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. फेब्रुवारी २०१९मध्ये दलातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने समोर आला होता. हवाई दलाचे एमआय १७ हेलिकॉप्टर आपल्याच हवाई संरक्षण विभागाने क्षेपणास्त्र डागून जमीनदोस्त केले होते. त्यात वैमानिक स्क्वाॅड्रन लीडर निनाद मांडवगणेसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. ही अतिशय गंभीर स्वरूपाची चूक असल्याची कबुली तत्कालीन हवाई दलप्रमुखांनी दिली होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. दलात एकत्रितपणे काम करताना घडलेली ही आहे. नव्या निर्णयाने कार्यात्मक जबाबदारीचे विकेंद्रीकरण करताना प्रभावीपणे समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक शाखेवर असणार आहे.