New GST 2.0 rate cut family budget saving पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘जीएसटी बचतोत्सव’ला सुरुवात झाल्याची घोषणा केली. जीएसटी २.० अंतर्गत नवे दर २२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले असून, या बदलांचा उल्लेख ‘पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा’ असा करत पंतप्रधानांनी मध्यमवर्ग, तरुणाई आणि अनेक क्षेत्रांना यातून थेट लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांत महागाईने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांसाठी ही दरकपात खूपच महत्त्वाची आहे. एका बाजूला महागाई आणि दुसरीकडे वाढलेले बेरोजगारीचे प्रमाण यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता जीएसटीचे दर कमी झाल्याने त्यांना एक महत्त्वपूर्ण दिलासा मिळणार आहे. पण हा दिलासा नेमका कसा आणि कोणत्या स्वरूपात असेल, त्याचा हा आढावा…

३ सप्टेंबर रोजी झालेल्या ५६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत ३७५ हून अधिक वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात अन्नधान्य, एफएमसीजी वस्तू, साबण-शॅम्पू यांसारख्या दैनंदिन वापरातील उत्पादने, सिमेंट, विमा हप्ता, घरगुती उपकरणे आणि मोटारगाड्या यांचा समावेश आहे. खरे तर याची माहिती यापूर्वीच जाहीर झाल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये किती घट होईल, याची आकडेवारी आधीच प्रसिद्ध केली होती. अनेकांनी त्यासाठी जाहिरात मोहिमाही राबवल्या. आता ही किमतीतील घट प्रत्यक्षात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात उत्साहाला उधाण आले आहे.

washing machines
वॉशिंग मशिन… (संग्रहित छायाचित्र)

अन्नधान्य व एफएमसीजी

  • करकपातीचा सर्वाधिक तातडीचा परिणाम अन्नपदार्थांवर जाणवणार आहे.
  • पनीर, दूध, चीज, लोणी, लोणची, जॅम, टोमॅटो सॉस, तूप : दरात ३ ते ८ टक्के घट.
  • अमूल व मदर डेअरीने दरकपात जाहीर केली आहे. उदा. २०० ग्रॅम पनीर पॅक आता ९२ रुपये (पूर्वी ९५).
  • अमूल चीज पराठा पूर्वी २४० रुपये, आता २०० रुपयांना.
  • प्रिंगल्स चिप्स (१०७ ग्रॅम पॅक) : १२ टक्के स्वस्त, आता ११० रुपये.
  • कॅलॉग्ज कॉर्नफ्लेक्स (९०० ग्रॅम) : ३९९ रुपयांवरून थेट ३५५ रुपये, म्हणजे ११ टक्के घट.
  • बिस्किटे व आईस्क्रीम : १० ते १४ टक्क्यांनी स्वस्त. मदर डेअरीची व्हॅनिला कप आईस्क्रीम १० रुपयांवरून आता ९ रुपयांना मिळणार.

वैयक्तिक वापराची उत्पादने

  • ग्राहकांना थेट घरखर्च कमी करणारी महत्त्वाची दरकपात ही शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, केसांचे तेल यांसारख्या वस्तूंमध्ये झाली आहे.
  • या सर्व उत्पादनांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणल्यामुळे दरात ११ ते १३ टक्क्यांची घट.
  • लॉरियल, हिमालया, क्लोजअप, डवसारख्या कंपन्यांनी तातडीने नवे दर लागू केले आहेत.

बांधकाम क्षेत्र व सिमेंट

  • सिमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला.
  • जे. के. सिमेंट, अल्ट्राटेक यांसारख्या उत्पादकांनी करकपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
  • सिमेंटचे दर साधारण १० टक्क्यांनी कमी होतील.
  • घरबांधणी व पायाभूत सुविधांमध्ये सिमेंट हा कळीचा घटक असल्याने या दरकपातीचा लक्षणीय परिणाम सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांपासून (एमएसएमई) ते रिअल इस्टेटपर्यंत अनेक क्षेत्रांवर होणार आहे.

विमा क्षेत्र

  • सर्वसामान्यांच्या खर्चातील महत्त्वाचा भाग असलेले आरोग्य व जीवनविमा हप्त्यायावर आता जीएसटी आकारला जाणार नाही.
  • आधी १८ टक्के कर असलेल्या पॉलिसी आता सवलतीच्या श्रेणीत गेल्याने हप्ता जवळपास १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.घरगुती वापराच्या वस्तू

घरगुती वापराच्या वस्तू

घरगुती वापराच्या उपकरणांच्या किमतीमध्येही मोठी घट जाहीर झाली आहे.

व्हर्लपूल एसी (१ टन क्षमतेचे) : दर ४,५०० ते ५,२०० रुपयांनी कमी.

डिशवॉशर्स : ३,२०० ते ४,३०० रुपयांनी स्वस्त.

मोटारगाड्या

  • जीएसटी बचतोत्सवाचा थेट परिणाम मोटारगाडी खरेदीवर होणार आहे.
  • देशातील सर्वात मोठी वाहननिर्मिती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने दरकपात जाहीर केली असून, ४६,४०० ते तब्बल १.२९ लाख रुपयांपर्यंत किंमती घसरल्या आहेत.
  • लहान गाड्यांवरील जीएसटी २८ टक्के आणि उपकरांवरून थेट १८ टक्क्यांवर आला आहे.
  • मोठ्या गाड्यांसाठी जीएसटी ४० टक्के असणार आहे; पूर्वी एकत्रित करदर ५० टक्क्यांपर्यंत होता.

मात्र, दरकपातीच्या संक्रमण काळात डिलर्सना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. ३ ते २२ सप्टेंबरदरम्यान जुन्या दरांनी खरेदी केलेल्या गाड्यांचा साठा विक्रीसाठी अडथळा ठरला. अंदाजे २,५०० कोटी रुपयांचा तोटा वाहनविक्रेत्यांना बसल्याचे उद्योगक्षेत्राचे म्हणणे आहे.

व्यापक आर्थिक परिणाम

बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे की, “या सुधारणा विक्रीला मोठी चालना देणाऱ्या आहेत. किमती कमी झाल्यामुळे महागाईचा भार कमी होईल, ग्राहकांना प्रत्यक्षात बचत करता येईल आणि ती बचत गुंतवणुकीकडे वळण्याची शक्यता वाढेल.”
ग्राहकांच्या हातात अधिक पैसा राहिल्याने अन्नधान्य, घरगुती वस्तूंपासून विमा, मोटारी आणि बांधकाम क्षेत्रापर्यंत एकंदरीत मागणी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उद्योगविश्वाने जाहिरात मोहिमा राबवून या नव्या कमी झालेल्या दरांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आहे.

दैनंदिन खर्चात बचत

एकुणात जीएसटी २.० मुळे सुरू झालेला ‘बचतोत्सव’ हा केवळ घोषणेपर्यंत न थांबता प्रत्यक्षात ग्राहकांच्या दैनंदिन खर्चात बचत करणारा आहे. पनीरपासून एसीपर्यंत, साबणापासून सिमेंटपर्यंत आणि विम्यापासून मोटारींपर्यंत – सर्व स्तरावर दरकपातीची लाट सुरू आहे. घरगुती बजेटला दिलासा देणाऱ्या या निर्णयाचा लाभ पुढील काही महिन्यांत उत्पादनांच्या विक्रीत झालेली वाढ, त्याचप्रमाणे बचत आणि गुंतवणूकीत होणारी वाढ या विविध स्वरूपांत दिसून येईल, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.