-ज्ञानेश भुरे

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर विजय मिळवून एक पाऊल पुढे टाकले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा भारताचा मार्ग आता सुकर आहे. भारतासमोर तुलनेने तुल्यबळ आव्हान नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयाने कमावलेल्या आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करण्याचे भारतीय संघाचे नियोजन असेल. 

पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचे महत्त्व काय?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची कुठलीही स्पर्धा असली, की त्या स्पर्धेत भारत वि. पाकिस्तान या सामन्याचे मुख्य आकर्षण असते. आयोजकांसाठी हा सामना गल्लाभरू असतो, मात्र या सामन्यात सरशी झाल्यास खेळाडूंसाठी हा सामना मानसिक दडपण दूर करणारा ठरतो. सहाजिकच मैदानावर खेळाडूच्या खेळ कौशल्याबरोबर मानसिकता सर्वांत महत्त्वाची असते. मानसिकता किती महत्त्वाची असते, याची कल्पना रविवारी रंगलेल्या भारत वि. पाकिस्तान सामन्यातील अखेरच्या षटकावरून येते. एक वाईड, एक नो-बॉल आणि यष्टीला लागून चेंडू दूर गेल्यानंतरही त्याकडे लक्ष नसणे हा सगळा त्याचाच भाग होता. भारतीय खेळाडूंनी उच्च दर्जाची मानसिकता दाखवली अन् प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. खेळाडूंच्या मनावरचे व त्याहीपेक्षा क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे उतरल्याची भावना प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर होती. आता भारतीय संघ अधिक दडपणमुक्त व मोकळेपणाने उर्वरित सामन्यात खेळेल. त्यामुळेच एक अडथळा पार झाला, असे म्हणता येईल.

भारतीय संघाचे पुढील नियोजन कसे असेल?

उर्वरित सामने लक्षात घेता आता एखाद-दुसरा प्रयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, तसे काही होईलच असेही नाही. कारण विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हे मोठे व्यासपीठ आहे. नियोजनाबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ व्यवस्थापनासमोर कर्णधार रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीच्या जोडीचा हरवलेला फॉर्म ही सर्वांत मोठी डोकेदुखी असेल. टी-२० प्रकारात सलामीच्या जोडीने किमान पहिली सहा षटके खेळणे अपेक्षित आहे. सध्या नेमके तेच होत नाही. या सलामीच्या जोडीला सूर गवसला, तर भारताला एखाद्या सामन्यात जास्तीचा वेगवान गोलंदाज निवडण्याचे धाडस करता येईल. त्यामुळे नेदरलॅंड्सविरुद्धचा सामना या जोडीसाठी खूप महत्त्वाचा असेल.

संघात बदल अपेक्षित आहेत का?

एखाद्या स्पर्धेत विजय मिळविला की बहुधा विजयी संघात बदल करण्यात येत नाही. संघातील अकरा खेळाडूंचा समन्वय जुळून आलेला असतो. भारतीय संघाने असा विचार केला तर आश्चर्य वाटणार नाही. विशेष म्हणजे संघात बदल करण्यासाठी फारसा वाव नाही. करायचाच झाला, तर यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला वगळून रिषभ पंतला स्थान मिळू शकते. याचा एक फायदा असा की पंत डावखुरा फलंदाज आणि धावगतीला कुठल्याही क्षणी वेग देण्याची त्याची क्षमता. दुसरा बदल करायचा झाला तर तो गोलंदाजीत होऊ शकतो. यापूर्वी नमूद केल्यानुसार भारतीय संघ व्यवस्थापनाला आपण गोलंदाजांचे समीकरण काय ठेवायचे हे वेळीच निश्चित करावे लागणार आहे.

सातत्य राखण्याचे आव्हान?

सातत्य राखण्याचे आव्हान प्रत्येकासमोर असते. भारतीय संघ याला अपवाद नाही. त्यामुळे विराट कोहली, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग अशा प्रत्येक खेळाडूला आपल्या खेळात सातत्य राखावे लागणार आहे. भारतीय संघातील सलामीच्या जोडीचे अलीकडच्या सामन्यातील अपयश लक्षात घेता मधल्या फळीवर ही मोठी जबाबदारी आहे. यातही कोहली सर्वात महत्त्वाचा असेल. मोठ्या अपयशानंतर कोहलीला लय गवसली. कोहलीच्या बॅटमधून अशाच धावा निघाल्या, तर भारतीय संघाला आव्हान उभे करण्यात किंवा आव्हानाचा पाठलाग करण्यात कष्ट पडणार नाहीत. हार्दिक पंड्या भारताचे छुपे अस्त्र असेल. मात्र, त्याला जपून खेळावे लागेल. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर त्याला लक्ष केंद्रित करायचे आहे.

उत्तरार्धातील षटके अचूक हवीत?

अखेरची पाच षटके जो संघ अचूक टाकेल विजय त्याचाच असेल यात शंका नाही. गेल्या काही सामन्यांत हीच उत्तरार्धातील पाच षटके भारतासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. कधी भुवनेश्वर, तर कधी अर्शदीप यांना यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे आता विश्वचषक स्पर्धेत या गोलंदाजांना या टप्प्यात छोटीशीही चूक माफ नसेल. एखादा दुबळा संघही याचा फायदा उठवू शकतो. नामिबियाने प्राथमिक फेरीत श्रीलंकेला हरवून हे दाखवून दिले आहे. उत्तरार्धातील षटके भारतीय गोलंदाजांना अचूकच टाकावी लागतील.

आता कुठल्या संघाचे आव्हान असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे आता स्पर्धेत नेदरलॅंडस, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्धचे सामने शिल्लक आहेत. यात दक्षिण आफ्रिका वगळता अन्य कुठलाही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे क्रिकेट खेळत नाहीत. याला बांगलादेश अपवाद. मात्र बांगलादेश खेळाडू सातत्याच्या अभावामुळे त्रस्त आहेत. दक्षिण आफ्रिका संघाला यापूर्वी मायदेशात झालेल्या मालिकेत आपण हरवले आहे. नेदरलॅंड्स आणि झिम्बाब्वे हे संघ दुबळेच आहेत. हे सामने लक्षात घेता नेदरलॅंडस, झिम्बाब्वेविरुद्ध मोठे विजय मिळवून भारतीय संघ निव्वळ धावगतीही राखण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर पुढील प्रवासाच्या दृष्टीने संघातील एखाद-दुसरा बदल या सामन्यात ते करून बघू शकतात.