संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एअर इंडिया’ने नुकताच जगातील सर्वांत मोठ्या प्रवासी विमान खरेदी कराराला अंतिम स्वरूप दिले. टाटा समूहाच्या मालकीची ही विमान वाहतूक कंपनी ४७० विमानांची खरेदी करणार असून एअरबस आणि बोइंग या जगातील दोन बड्या कंपन्यांशी त्याबाबत करार करण्यात आला आहे. या विक्रमी विमान करारामुळे ‘एअर इंडिया’ कंपनीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे. या विमान खरेदी कराराविषयी…

‘एअर इंडिया’चा विमान खरेदी करार काय आहे?

‘एअर इंडिया’ने नुकताच विमान खरेदीचा विक्रमी करार केला आहे. या करारानुसार ‘एअर इंडिया’कडून ४७० विमानांची खरेदी केली जाणार आहे. यासाठी ‘एअरबस’ ही फ्रेंच कंपनी आणि ‘बोइंग’ ही अमेरिकी कंपनी यांच्याशी करार करण्यात आला असून त्यानुसार ‘एअरबस’ ही कंपनी २५० आणि बोईंग ही कंपनी २२० विमाने देणार आहेत. ‘एअर इंडिया’ने योजलेल्या विस्तार आराखड्यानुसार ही खरेदी करण्यात येणार आहे. या विमानखरेदीअंतर्गत विमाने खरेदीच्या इरादापत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्याशिवाय बोइंगकडून आणखी ७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे.

हे दोन्ही करारांची किंमत काय?

एअरबस आणि बोइंग या दोन्ही कंपन्यांशी केलेले हे करार सुमारे ८० अब्ज अमेरिकी डॉलरचे (६.४० लाख कोटी रुपये) आहेत. ‘एअरबस’सोबतचा करार सुमारे ४६ अब्ज अमेरिकी डॉलरचा आहे, तर बोइंगसोबतचा करार ३४ अब्ज डॉलरचा आहे. बोइंगकडून आणखी ७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय असल्याने या कंपनीसोबतचा करार ४५.९ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे वाचा >> एअर इंडियाचा ४७० विमाने खरेदी करण्याचा सर्वात मोठा करार

या करारानुसार कोणत्या विमानांची खरेदी केली जाणार?

या करारानुसार एअर इंडिया वाइड बॉडी (दीर्घ व अतिदीर्घ पल्ला) आणि नॅरो बॉडी (लघू व मध्यम पल्ला) विमाने खरेदी करणार आहेत. ‘एअरबस’कडून एअर इंडियाला ४० वाइड बॉडी ए ३५० विमाने, २१० नॅरोबॉडी सिंगल- आइल ए ३२० निओस विमाने दिली जाणार आहेत. ‘बोइंग’सोबतच्या करारानुसार १९० बी ७३७ मॅक्स विमाने, २० बी ७८७ विमाने आणि १० बी ७७७ एक्स विमाने उपलब्ध होणार आहेत. वाइड- बॉडी विमाने अति- लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी वापरली जाणार आहेत. ज्या प्रवासाचा कालावधी १६ तास किंवा त्यापेक्षा अधिक असतो, अशा प्रवासासाठी ही विमाने वापरली जातील. या विमानांना अल्ट्रा- लाँग हॉल फ्लाइट म्हणात.

हे दोन्ही करार कसे झाले?

‘एअरबस’बरोबर झालेल्या कराराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्रॉन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन हेही सहभागी झाले. या विमानखरेदीअंतर्गत २५० विमान खरेदीच्या इरादापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही याच दिवशी स्वत: ‘बोइंग’बरोरबर ‘एअर इंडिया’ने करार केल्याची माहिती दिली. हा ऐतिहासिक करार असल्याचा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला.

या कराराचा भारत, एअर इंडियाला फायदा काय?

या करारामुळे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील यश पुन्हा अधोरेखित झाले. या करारामुळे देशातील विविध राज्यांमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार असून अनेक तरुणांना त्याचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी ‘टाटा समूहा’ने एअर इंडियाची खरेदी १८ हजार कोटी रुपयांना केली होती. कर्जात बुडालेल्या एअर इंडियाची खरेदी करून टाटा समूहाने भारतीय हवाई वाहतूक उद्योगाला आधार दिला. या करारामुळे विमान वाहतूक उद्योगाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या करारामुळे भारत आणि अमेरिका व फ्रान्स या देशांतील औद्योगिक संबंध आणखी दृढ होणार आहेत. एअर इंडियाने २००५ नंतर एकही विमान खरेदी केले नव्हते. आता १७ वर्षांनंतर विमान खरेदी केली आहे. यापासून एअर इंडियाला उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियात आपले अस्तित्व वाढवण्यास मदत मिळेल.

फ्रान्स आणि अमेरिकेची भूमिका काय‌?

‘बोइंग’बरोबरच्या कराराची घोषणा करताना अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी ठामपणे सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्याचा फायदा भारताला होणार असून दोन्ही देशांत आर्थिक व औद्योगिक संबंध आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘एअरबस’बरोबरच्या करारावरून असे दिसून येते की ही कंपनी आणि सर्व फ्रान्स भागीदार भारतासोबत भागीदारी वाढविण्यासाठी काम करत आहेत. ‘‘करोना महासाथ नियंत्रणात आल्याने आता दोन्ही देशांमध्ये अधिक देवाण-घेवाण व्हायला हवी. फ्रान्समध्ये विद्यार्थी, संशोधक, कलाकार, व्यापारी, पर्यटक यांचे स्वागत आहे. मी सर्वांना भारत-फ्रान्स मैत्रीचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करतो…’’ फान्सचे अध्यक्ष माक्रॉन यांचे ही मत उभय देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असे दिसून येते. त्याशिवाय या विमान खरेदी कराराचा फायदा ब्रिटनलाही होणार आहे. कारण एअरबसच्या विमानांचे इंजिन ब्रिटनमध्ये तयार करण्यात येतात. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही या कराराबाबत आनंद व्यक्त केला.

यापूर्वीचे मोठे विमान खरेदी करार कोणते?

दुबईमधील ‘एमिरेट्स’ या विमान वाहतूक कंपनीने २०१७ मध्ये ७६ अब्ज डॉलरला ‘बोइंग ७७७ एक्स’ विमानांची खरेदी केली. २०११ मध्ये ‘अमेरिकी एअरलाइन्स’ने एअरबस आणि बोइंग यांच्याकडून ४६० विमानांची खरेदी केली. ३८ अब्ज डॉलरचा हा करार होता. २०१७ मध्ये ‘इंडिगो पार्टनर्स’ने ४९.५ अब्ज डॉलरला ‘एअरबस ए-३२०’ या विमानांची खरेदी केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How air india made a record aircraft purchase print exp kvg
First published on: 16-02-2023 at 08:03 IST