scorecardresearch

विश्लेषण: चित्रपट वितरणातून नेमका आर्थिक फायदा कसा होतो? कसे होतात देवाणघेवाणीचे व्यवहार?

प्रदर्शक आणि वितरक यांच्यात एखाद्या चित्रपटाच्याबाबतीत एक करार होतो

विश्लेषण: चित्रपट वितरणातून नेमका आर्थिक फायदा कसा होतो? कसे होतात देवाणघेवाणीचे व्यवहार?
चित्रपट व्यवसाय

सध्या ‘सनी’ या मराठी चित्रपटाचे शो रद्द केल्याने पुन्हा मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रीनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने याविषयी खंतदेखील व्यक्त केली आहे. मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटात निर्माण होणारी ही तेढ काही नवीन नाही. चित्रपट बनवणं हा जेवढा महत्त्वाचा भाग असतो तेवढंच त्या चित्रपटाचं योग्य पद्धतीने वितरण करणं हादेखील महत्त्वाचा भाग असतो. आज आपण याच वितरक व्यवसाय आणि चित्रपटगृहाचे मालक यांची गणितं याविषयी जाणून घेणार आहोत.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी जो पैसे गुंतवतो तो निर्माता, जो चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी घेतो तो वितरक आणि जो चित्रपटगृहांचा मालक असतो त्याला प्रदर्शक म्हंटलं जातं. चित्रपटाच्या निर्मात्याकडून वितरक हक्क विकत घेतात. ही गोष्ट त्या चित्रपटात कोणते स्टार्स आहेत यावरुन ठरतं, आणि मग वितरक तो चित्रपट प्रदर्शकांकडे पाठवतात.

प्रदर्शक आणि वितरक यांच्यात एखाद्या चित्रपटाच्याबाबतीत एक करार होतो, आणि त्या करारानुसार चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी केली जाते. शिवाय या करारानुसार प्रदर्शक आणि वितरक यांना किती टक्के नफा मिळणार हेदेखील ठरवण्यात येते. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यानंतर वितरकांना ६५% तर प्रदर्शकांना ३५%नफा मिळतो, तर दुसऱ्या आठवड्यात वितरकांना ६०% आणि प्रदर्शकांना ४०% नफा मिळतो. हे आकडे चित्रपटाच्या कमाईनुसार बदलतात.

चित्रपट प्रदर्शित करून त्यातून ७०% नफा न झाल्यास वितरक आणि प्रदर्शकांना मिळणाऱ्या नफ्यात घट होते. एकूणच चित्रपट अगदीच फ्लॉप ठरला तरी वितरक आणि प्रदर्शक यांना थोड्याफार प्रमाणात नफा होतो. यातून त्यांचा खर्च जरी भागत नसला तरी त्यांच्याहातात पुरेसे पैसे पडतात असं चित्रपट निर्मात्यांचं म्हणणं आहे. तर याउलट चित्रपट वितरक यांचं म्हणणं असतं आणि या दोघांमध्ये हा वाद कायम आपल्याला बघायला मिळतो.

आणखी वाचा : “तिच्याशी लग्न करण्याशिवाय…” नागा चैतन्यने केला त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल मोठा खुलासा

चित्रपटगृहांचे मालकदेखील त्यांच्या सोयीनुसार चित्रपटांचे शो लावतात. एखाद्या चित्रपटातून चांगली कमाई त्या चित्रपटगृहांच्या मालकाला होत असेल तर ते त्या चित्रपटाचे शोज वाढवतात आणि ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. याचा परिणाम इतर काही चांगल्या चित्रपटांवर होतो, पण अखेरीस चित्रपटगृहाच्या मालकांनाही त्यांच्या व्यवसायाचा विचार करावाच लागतो. याच गोष्टीमुळे बऱ्याचदा आपल्याला मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रीन्स आणि इतर चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रीन्स यांच्यात वाद आपल्याला पाहायला मिळतो.

यावेळीही ‘दृश्यम २’ या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चित्रपटगृहाच्या मालकांनी त्या चित्रपटाला जास्त शो दिले. यामुळेच हेमंत ढोमेच्या ‘सनी’ या चित्रपटाचे शो रद्द झाल्याचं समोर आलं आहे. चित्रपट निर्माते, वितरक आणि चित्रपटगृहांचे मालक यांच्यातील हा वाद अध्येमध्ये डोकं वर काढतच असतो. यामुळे चांगल्या आशयघन आणि उत्तम कथानक असलेले चित्रपट मात्र होरपळून निघतात हे वास्तव आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या