युक्रेन युद्धासंदर्भात आपण भारत, चीन आणि ब्राझील या मित्रदेशांशी सातत्याने बोलत असतो, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. तर युद्धबंधीबाबत भारत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, असे पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनी थेटच म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतिन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन या तिघांशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे ते वाटाघाटींसाठी पुढाकार घेऊ शकतात, असा विश्वास पुतिन प्रवक्त्यांनी व्यक्त केला. पुतिन कुठे, काय म्हणाले? रशियातील व्लाडिवोस्टॉक येथे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम परिषद सुरू आहे. या परिषदेमध्ये पुतिन यांनी युक्रेन युद्ध, शांतता प्रयत्न, वाटाघाटींसंदर्भात काही विधाने केली. यासंबंधीचे वृत्त अमेरिकेची माध्यम कंपनी ‘पोलिटिको’ने दिले. ‘आमचे काही मित्रदेश युक्रेनमधील लढाई थांबवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. मी यासंदर्भात भारत, चीन आणि ब्राझील यांची नावे घेईन.’ युक्रेनला वाटाघाटी करायवयाच्या असल्यास आपली त्यास तयारी असल्याचेही पुतिन यांनी नमूद केले. अशा प्रकारे युक्रेन युद्धविरामासंदर्भात पुतिन यांनी भारतासह चीन आणि ब्राझील यांचे नाव घेण्याची ही पहिलीच वेळ ठरते. हेही वाचा >>>विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार? ‘ब्रिक्स’मधील सहकारी रशिया, भारत, चीन, ब्राझील (BRICS) हे देश ब्रिक्स या संघटनेचे सदस्य आहेत. दक्षिण आफ्रिका हा या गटातील सर्वांत नवीन आणि छोटा सदस्य. पुढील महिन्यात २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान रशियातील कझान येथे ब्रिक्स समूहाची परिषद होत आहे. या परिषदेत पुतिन, मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ब्राझीलचे अध्यक्ष लुइस इनासियो लुला डा सिल्वा यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेमध्ये युक्रेनचा विषय येण्याचीही दाट शक्यता आहे. अमेरिकेने रशिया आणि चीनविरोधात भारताला चुचकारण्याचे धोरण गेली काही वर्षे राबवले असले, तरी ब्रिक्सला भारताने अंतर दिलेले नाही. उलट आता तर या समूहाच्या विस्तारीकरणाची तयारी सुरू झाली आहे. युक्रेन युद्धात चर्चेचा पर्याय? गेल्या वर्षीपासून तुर्कीये येथे रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींदरम्यान वाटाघाटी सुरू असून, युद्धबंदीची चाचपणी सुरू आहे. याशिवाय स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने अनेक पाश्चिमात्य देश आणि युक्रेन यांचे एक व्यासपीठ स्थापले गेले असून, त्या गटाशी चर्चा करण्याची मात्र रशियाची तयारी नाही. भारतानेही, ज्या वाटाघाटींमध्ये रशिया सहभागी होत नाही, त्यांना नैतिक आधार नसल्याची भूमिका घेतली. अर्थात एकीकडे युक्रेन-रशिया युद्ध तुंबळ बनले असताना, दोन्ही देशांनी वाटाघाटींचा मार्ग पूर्ण बंद केलेला नाही. वाटाघाटींचा हा केंद्रबिंदू आता भारताकडे सरकण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा >>>Pew Research Center Survey: पाच पैकी चार भारतीयांना त्यांच्या राष्ट्रीय नेत्याने धार्मिक परंपरांचे पालन करणे महत्त्वाचे वाटते; प्यू अभ्यासात नेमके काय आढळले? भारतच का? पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनी इझ्वेस्तिया या रशियन वृत्तपत्राला सांगितले, की युक्रेन, रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांशी स्नेहपूर्ण संबंध असलेले मोदी जगातील अत्यंत मोजक्या नेत्यांपैकी एक ठरतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे हे तिन्ही देश एकून शकतात. या वक्तव्यात तथ्य नक्कीच आहे. गेल्या ८ जुलै रोजी मोदी यांनी रशियात पुतिन यांची भेट घेतली. यांतील एक सत्र खासगी चर्चेचे होते. २३ ऑगस्ट रोजी मोदी यांनी युक्रेनमध्ये झेलेन्स्की यांना भेटले. या भेटीतही निर्धारित वेळेपेक्षा कितीतरी अधिक वेळ चर्चा चालली. २५ ऑगस्ट रोजी मोदी यांनी बायडेन यांच्याशी चर्चा केली. मोदी-पुतिन आणि मोदी-झेलेन्स्की भेटीनंतर संघर्ष थांबवण्याच्या दिशेने मोदी यांचे प्रयत्न सकारात्मक ठरू शकतात, असे अनेकांना वाटू लागले आहे. चीन हाही रशिया आणि युक्रेनचा मित्र आहे. पण चिनी संपर्कप्रणाली रशियन शस्त्रास्त्रांमध्ये वापरली जात असल्याचा संशय असल्यामुळे त्या देशावर युक्रेन फार भरवसा ठेवण्याची शक्यता नाही. ब्राझील या देशाला भारत किंवा चीन यांच्याइतके भूराजकीय वजन नाही. या समीकरणात दोन्ही देशांचा भरवसा भारतावरच अधिक दिसतो.