आरक्षणविरोधी आंदोलनामुळे भारतातील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर बांगलादेशात आता अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आज नोबेल परितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. असे असले तरी बांगलादेशातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. हिंसक आंदोलनामुळे जाळपोळ आणि सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांना देश सोडावा लागत आहे. भारताने दूतावासातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ढाका येथून परत आणले आहे.

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या आठवड्याच्या शेवटी झालेल्या हिंसाचारात १०० हून अधिक लोक मारले गेले. सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, सर्व भारतीय मुत्सद्दी बांगलादेशमध्येच आहेत. राजधानी ढाका येथील दूतावास, चितगाव, राजेशाही, खुलना व सिल्हेत येथे भारताचे सहायक उच्चायुक्त आहेत. बांगलादेशात नक्की किती भारतीय अडकले आहेत? आणि ते किती सुरक्षित आहेत? यावर एक नजर टाकू या.

हेही वाचा : इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा नवा प्रमुख; कोण आहे याह्या सिनवार?

बांगलादेशातील भारतीय नागरिक

‘इंडिया टुडे’नुसार, १९० कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विशेष एअर इंडिया (AI1128) विमानाने भारतात परत आणण्यात आले आहे. सूत्रांनी ‘आउटलेट’ला सांगितले की, ढाका उच्चायुक्तालयात २० ते ३० वरिष्ठ कर्मचारी आहेत. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने वृत्त दिले आहे की, सध्या त्या ठिकाणी ज्या कर्मचार्‍यांची आवश्यकता नाही, असे कर्मचारी व्यावसायिक फ्लाइटद्वारे स्वेच्छेने भारतात परत येत आहेत. ‘पीटीआय’ने वृत्त दिले की, एअर इंडिया ७ ऑगस्टपासून दिल्ली ते ढाकापर्यंत नियमितपणे उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की, बांगलादेशमध्ये सुमारे १९ हजार भारतीय आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की, बांगलादेशमध्ये सुमारे १९ हजार भारतीय आहेत. त्यापैकी नऊ हजार विद्यार्थी आहेत. नऊ हजारपैकी बहुतेक विद्यार्थी जुलैमध्ये भारतात परतले आहेत. “आम्ही आमच्या निर्धारित मिशनद्वारे बांगलादेशातील भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहोत”, असे जयशंकर म्हणाले. शेजारी देशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर सीमा सुरक्षा बलांना सुरक्षित राहण्याचा इशारा देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय नागरिक किती सुरक्षित?

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार सर्वपक्षीय बैठकीत जयशंकर यांनी सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढावे लागेल. आपले राजकीय मिशन त्यांना सुरक्षित ठेवेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “आमची अपेक्षा आहे की, नवीनतम सरकार या आस्थापनांना आवश्यक सुरक्षा प्रदान करील. परिस्थिती स्थिर झाल्यावर आस्थापनांचे सामान्य कामकाज सुरू होईल,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबतही आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्यांचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विविध गट आणि संघटनांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. साहजिकच कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत होईपर्यंत आम्हाला काळजी असेल.”

निदर्शनांमुळे बांगलादेशात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचे उपाय सुरू केले आहेत. पण, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आहेत. बांगलादेशात काही दिवसांपासून हिंदू, त्यांची घरे आणि प्रार्थनास्थळे यांच्यावर हिंसक हल्ले होत आहेत. इस्कॉन आणि काली मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी ढाक्यातील धानमंडी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची तोडफोड करण्यात आली. द्विपक्षीय सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा : भारतीय वंशाच्या न्यायमूर्तींनी गूगल विरोधात दिला महत्त्वाचा निकाल; कोण आहेत अमित मेहता? नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, बांगलादेशातील मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिरालाही सोमवारी आग लावण्यात आली. “मेहेरपूरमधील आमचे एक इस्कॉन केंद्र जाळण्यात आले. मंदिरात भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा देवी या देवतांच्या मूर्ती होत्या. मंदिरातील तीन भाविक कसेतरी पळून जाण्यात आणि स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले”, असे इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंदा दास यांनी ‘एक्स’वर लिहिले. बांगलादेशमधील परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेशच्या ४,०९६ किलोमीटरच्या सीमेवरील सर्व सुरक्षा बलांना सतर्क करण्यात आले आहे. कारण- सीमेवर सुरक्षा वाढवणे आणि घुसखोरीचा प्रयत्न थांबवणे भारतासाठी अत्यावश्यक आहे. बांगलादेशातील या हिंसाचारात चीन आणि पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचेही सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील ही परिस्थिती भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी घातक असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे.