पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये नि:शस्त्र पर्यटकांचे प्राण घेतल्यानंतर भारताने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका-ब्रिटन यांनी सबुरीचा सल्ला दिला असतानाच रशिया, जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला. चीनने पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली तर त्यात काही नवल नाही, मात्र सीमेवर तणाव वाढला असताना तुर्कस्ताननेदेखील पाकिस्तानला चिथावणी मिळेल, अशी कृती केली आहे. एकीकडे भारताबरोबर व्यापार करायचा, स्वत:चा फायदा करून घ्यायचा आणि पाठिंबा मात्र दहशतवाद्यांच्या पोशिंद्यांना द्यायचा, हे तुर्कस्तानचे पूर्वापार धोरण भारत किती काळ खपवून घेणार हा प्रश्न आहे…
तुर्कस्तानच्या संशयास्पद हालचाली…
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव कमालीचा वाढला असताना तुर्की सैन्याच्या काही हालचालींनी भारताचे लक्ष वेधून घेतले आहे. तुर्कस्तानी लष्कराची काही ‘सी-१३० ई’ ही लष्करी मालवाहू विमाने कराची विमानतळावर उतरल्याचे समोर आले. ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’च्या विमानांचे दळणवळण टिपणाऱ्या माहितीमुळे ही बाब उजेडात आली. भारताबरोबर युद्धाची शक्यता निर्माण झाल्याने कंगाल पाकिस्तानला तुर्कस्तानमधून तातडीने दारुगोळा पाठविण्यासाठी ही विमाने कराचीला आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तुर्कस्तानने अर्थातच हा दावा फेटाळला असून केवळ इंधन भरण्यासाठी विमाने काही काळ कराचीमध्ये उतरली आणि नंतर लगेचच मार्गाला लागली, असे तकलादू स्पष्टीकरण तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यिप रेसेप एर्दोगन यांच्या संभाषण संचालनालयाने समाजमाध्यमाद्वारे दिले. तुर्कस्तानी लष्कराची विमाने कराचीमध्ये येऊन गेल्यानंतर लगेचच तुर्की नौदलाची ‘टीसीजी बुयुकदा’ ही युद्धनौका कराची बंदरामध्ये नांगरण्यात आली. दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने बुयुकदा कराचीला आल्याची मखलाशी पाकिस्तानी नौदलाने केली असली, वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला एका अर्थी धमकी देण्यासाठीच ही युद्धनौका कराचीला धाडून दिली असू शकेल. कारण पाकिस्तान-तुर्कस्तानचे लष्करी संबंध हे पूर्वापार आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच एकमेकांचे राजकीय समर्थक राहिले आहेत.
तुर्कस्तान-पाकिस्तानचे घट्ट नाते…
तुर्कस्तान हा पाकिस्तानचा चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र पुरवठादार राहिला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार तुर्कस्तानच्या एकूण शस्त्रास्त्र निर्यातीत १० टक्के वाटा एकट्या पाकिस्तानचा आहे. २०१९ मध्ये भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे सामरिक संबंध अधिकच दृढ झाले आहेत. २०२१मध्ये संयुक्तरित्या शस्त्रास्त्र निर्मितीसाठी तुर्कस्तान आणि पाकिस्तानने करार केला. तुर्की बनावटीची ‘जेट’ तयार करण्यासाठी दोन्ही देशांनी भागिदारीत कारखाने सुरू केल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी नौदलासाठी ‘कॉर्वेट’ श्रेणीतील छोट्या युद्धनौका संयुक्तरित्या बांधण्यासाठी दोन्ही देशांमध्ये २०२२ साली करार झाला. त्यानुसार कराचीमध्ये तीन आणि इस्तंबूलमध्ये तीन युद्धनौकांची उभारणी सुरू आहे. यातील ‘पीएनएस बाबर’ ही पहिली नौका तयार असून पाकिस्तानी नौदलाच्या सेवेत आहे. ३-४ वर्षांपूर्वी ‘बायकार’ हे लढाऊ ड्रोन तुर्कस्तानने दिले. दोन्ही देशांमध्ये ‘अतातुर्क’ नावाने संयुक्त युद्धसराव होतात. केवळ सामरिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांची पाठराखण करण्याची एकही संधी पाकिस्तान आणि तुर्कस्तान सोडत नाहीत. काश्मीर मुद्द्यावर तुर्कांचे पाकिस्तानला उघड समर्थन असून त्याची परतफेड म्हणून सायप्रसवरील तुर्कस्तानचा हक्क पाकिस्तानला मान्य आहे. २०२०मध्ये ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या करड्या यादीतून पाकिस्तानला बाहेर काढावे, या ३९ देशांपैकी एकट्या तुर्कस्तानने मतदान केले होते, हे विशेष…
भारताबरोबर‘फायद्याचे’ व्यापारी संबंध…
एकीकडे पाकिस्तानला उघड समर्थन द्यायचे आणि त्याच वेळी भारताकडून बक्कळ फायदा उकळायचा, हे तुर्कस्तानचे धोरण राहिले आहे. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे ‘इंडिगो’ आणि ‘टर्किश एअरलाईन्स’मधला करार… ‘कोडशेअर पार्टनरशिप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करारानुसार युरोप-अमेरिकेत जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या प्रवाशांना इस्तंबूल किंवा अंकारापासून पुढला प्रवास टर्किश एअरलाईन्समधून करता येतो. मात्र यामध्ये नफ्याचा मोठा हिस्सा तुर्कस्तानी विमान कंपनीकडे जात असल्याची ओरड देशातील अर्थतज्ज्ञ करतात. तुर्कस्तान पाकिस्तानला सढळ हस्ते मदत करत असताना भारत सरकारने हे सहन करू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’ची अन्य सात देशांतील विमान कंपन्यांबरोबर ‘कोडशेअर पार्टनरशिप’ असताना पाकिस्तानच्या मित्रराष्ट्राचा फायदा का करून द्यायचा, असा सवाल विचारला जात आहे.
संबंध तोडण्याची वाढती मागणी…
दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार झालेला नसला तरी भारत-तुर्कस्तानचे व्यापारी संबंध पूर्वापार आहेत. भारत हा तुर्कस्तानच्या मोठ्या व्यापारी भागिदारांपैकी एक असून तेथील वस्तू आणि सेवांची मोठी निर्यात भारतात होते. २०२३च्या आकडेवारीनुसार १० अब्ज डॉलरपर्यंत हा व्यापार आहे. याशिवाय जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या, पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि मोठा उच्च मध्यमवर्ग असलेल्या भारतामुळे तुर्कस्तानच्या पर्यटनालाही मोठा फायदा होतो. तुर्कस्तानमध्ये भूकंप झाल्यानंतर सर्वप्रथम मदत पाठविणारा भारतच होता, याचा उल्लेख करावा लागेल. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील बहुतांश देश भारताच्या बाजुने उभे राहिले असताना चीन आणि तुर्कस्तान मात्र पाकिस्तानला सक्रीय पाठिंबा देत आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही राष्ट्रे भारताबरोबर व्यापारातून बक्कळ नफा कमावित आहेत. त्यामुळेच कुरापतखोर पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहणाऱ्या तुर्कस्तानशी व्यापारी संबंध तोडावेत किंवा गेलाबाजार घटवावेत, अशी मागणी आता समाजमाध्यमांवर जोर धरू लागली आहे.
amol.paranjpe@expressindia.com