scorecardresearch

Premium

मेंदूच्या पेशी कशा मृत पावतात? अल्झायमरच्या उपचारासाठी शास्त्रज्ञांनी लावला नवीन शोध

जगभरात ५.५ कोटी लोक डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) आजाराने ग्रस्त आहेत. मेंदूच्या पेशी का मृत पावतात, याचा शोध लावून शास्त्रज्ञांनी आता अल्झायमर आजारावर औषध विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

what is alzheimer and its symptoms
अल्झायमर आजारावर औषध शोधल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. (Photo – Reuters)

जगभरातील ५.५ कोटी लोक डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) प्रकाराशी निगडित आजाराने ग्रस्त आहेत. अल्झायमर हा आजार त्यापैकीच एक आहे. २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर्स जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील एकूण रुग्णसंख्येंपैकी विकसित देशात असलेल्या रुग्णांची संख्या दोन तृतीयांश इतकी आहे. जागतिक स्तरावरील लोकसंख्येचे वयोमान जसे जसे वाढत जाईल, त्यानुसार २०५० पर्यंत जगभरात डिमेन्शियाग्रस्त रुग्णांची संख्या १३.९ कोटींपर्यंत पोहोचले, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चीन, भारत, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील सहाराच्या आसपास असलेल्या देशांमध्ये या रोगाचा वाईट परिणाम पाहायला मिळेल, अशी शक्यता संशोधकांनी वर्तविली आहे. गेल्या अनेक दशकांपासून संशोधक अल्झायमर आजारावर प्रभावी उपचार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित यश मिळाले आहे.

अल्झायमरच्या उपचारासाठी लेकेनेमॅब (Lecanemab) या औषधाचा शोध लागल्यापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या औषधाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने याचवर्षी (२०२३) मंजुरी दिली आहे. या औषधामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील अल्झायमरचा विकास मंदावल्याचे दिसून आले आहे.

हे वाचा >> ६५ वर्षांवरील लोकांना स्मृतिभ्रंशाचा सर्वाधिक धोका

अल्झायमर्स हा आजार काय आहे?

जर्मन डॉक्टर अलॉइस अल्झायमर यांनी १९०६ मध्ये हा आजार जगासमोर आणला होता. या आजाराने ग्रस्त प्रथम रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याच्या मेंदूतील प्लेक्स आणि गुंता शोधून काढला. अल्झायमर हळूहळू मेंदूच्या ऊतींचा नाश करतो व स्मरणशक्ती हिरावून घेतो; यामुळे मन व मेंदू विचलित होते. अनेकदा या रुग्णांना साधी दैनंदिन कामेसुद्धा करता येत नाहीत. अनेकदा अशा रुग्णांचे सतत मूड स्विंग होत असतात. केवळ कामातच नाही, तर संवाद साधतानाही त्यांना बराच अडथळा येतो.

मेंदूतील जटील प्रक्रिया

मेंदूत अशी कोणती प्रक्रिया घडते, ज्यामुळे स्मृतीभ्रंशसारखा आजार विकसित होतो, हे अद्याप संशोधकांना पूर्णपणे समजले नव्हते. त्यामुळेच अल्झायमरच्या विरोधात औषध विकसित करण्यासाठी संशोधकांना अडचणी येत होत्या. औषध विकसित करताना संशोधकांसमोर प्रश्न होता की, मेंदूमध्ये पेशी का मरतात? अमायलॉईड (Amyloid) आणि टाउ (Tau) ही प्रथिने असतात, हे संशोधकांना माहीत होते. पण, अलीकडच्या काळापर्यंत मेंदूच्या पेशी मृत पावण्यात त्यांचा सहभाग कसा असतो, याबाबत पुरेसे संशोधन हाती नव्हते. मात्र, बेल्जियम आणि युकेमधील संशोधकांना आता याचे कारण कळले आहे.

आणखी वाचा >> विश्लेषण: कोट्यवधी रुग्ण पण उपचार ठाऊक नाही.. स्मृतीभ्रंश रोग नेमका कसा ओळखावा? जाणून घ्या लक्षणे

मेंदूच्या पेशी मृत होण्यामागचे कारण उलगडले

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अमायलॉईड (Amyloid) आणि टाउ (Tau) या असमान्य प्रथिनांचा आणि मेंदूतील पेशी मृत होण्याचा थेट संबंध असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पेशी मृत होण्याच्या या प्रक्रियेला नेक्रोप्टोसिस असे म्हणतात.

आपल्या शरीरातील नको असलेल्या पेशीतून मुक्त करण्यासाठी आणि सहसा शरीरात संसर्ग किंवा दाह उत्पन्न झाल्यास आपल्या प्रतिकार शक्तीमुळे त्या ठिकाणच्या पेशी मृत पावतात. या प्रक्रियेतून शरीरात नवीन, निरोगी पेशी तयार होण्यास मदत होत असते.

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, अल्झायमर झालेल्या रुग्णाच्या मेंदूतील न्यूरॉन्समध्ये अमायलॉईड प्रथिनं तयार झाल्यामुळे न्यूरॉन्समध्ये दाह निर्माण होतो. हा दाह होत असल्यामुळे पेशींच्या अंतर्गत रसायनशास्त्रात बदल घडतो. अमायलॉईड प्रथिने न्यूरॉन्सला चिकटून राहिल्यामुळे मेंदूत गुठळ्या तयार होतात, ज्या कालांतराने मेंदूला हानी पोहोचवतात. तसेच टाउ (Tau) प्रथिने स्वतःपासूनच आणखी प्रथिने तयार करत जाते, ज्याला टाउ टँगल्स असे म्हणतात.

या दोन प्रथिनांची क्रिया मेंदूत सुरू असताना मेंदूतील पेशी मेग३ (MEG3) नावाचे रेणू तयार करते. संशोधकांनी मेग३ रेणू तयार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मेग३ रेणूची निर्मिती थांबली तर मेंदूतील पेशी मृत होण्यापासून थांबविता येऊ शकतात, असेही संशोधकांनी सांगितले.

हे संशोधन करण्यासाठी, संशोधकांनी ज्या मानवी मेंदूतील पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात अमायलॉईड प्रथिने निर्माण झालेली आहेत, अशा पेशींचे प्रत्यारोपण अनुवांशिकरित्या सुधारित उंदरांच्या मेंदूमध्ये केले. युकेमधील डिमेन्शिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधक बार्ट डी स्ट्रूपर यांनी सांगितले की, तब्बल तीन ते चार दशके शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केल्यानंतर हा अतिशय महत्त्वाचा शोध लागला आहे. अल्झायमरग्रस्त रुग्णाच्या मेंदूतील पेशी मरण का पावतात? याचे उत्तर आता आमच्याकडे आहे.

हे वाचा >> आरोग्याचे डोही: साठी बुद्धी नाठी?

नवीन औषधापासून आशा ठेवाव्यात?

लंडनमधील डिमेन्शिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी कॉलेज आणि बेल्जियममधील संशोधक के. यू. ल्युवेन यांनी वरील अहवालात नमूद केले की, या संशोधनातील अनुमानानुसार यापुढे अल्झायमर रुग्णांसाठी नवीन वैद्यकीय उपचार शोधण्यास मदत होईल. लेकेनेमॅब (Lecanemab) हे औषध नको असलेल्या अमायलॉईड प्रथिनाला लक्ष्य करते, ज्यामुळे मेंदूतील न्यूरॉन्समध्ये दाह होणार नाही आणि पुढे मेग३ (MEG3) रेणू तयारच होणार नाहीत. या औषधामुळे मेग३ रेणूंची निर्मिती होण्यापासून रोखता आले तर मेंदूतील पेशी मरण पावणे थांबवता येऊ शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How scientists figured out how brain cells die and how this is helping alzheimers treatment kvg

First published on: 25-09-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×