खासगी शिकवण्या लावून, तीन-चार वर्षे सातत्याने अभ्यास करून, अत्यंत कठोर स्पर्धेला तोंड देऊन देशभरातील विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी धडपड करतात. मात्र, आता ऑलिम्पियाड स्पर्धांच्या माध्यमातून आयआयटीमध्ये प्रवेश देण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे ऑलिम्पियाड हा आयआयटी प्रवेशाचा नवा मार्ग ठरतो आहे का, याचा घेतलेला वेध….
आयआयटीची निवड प्रक्रिया काय?

आयआयटी प्रवेशासाठी  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांसह विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर आयआयटीसाठी दोन टप्प्यांत निवड प्रक्रिया होते. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेतील पात्र ठरलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा देतात. त्यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आयआयटीमध्ये प्रवेशाची संधी मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या जेईई अॅडव्हान्स्डमधील गुणानुक्रमानुसार जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटीच्या (जोसा) समुपदेशनात सहभागी व्हावे लागते. गेल्या काही वर्षांत जेईई परीक्षेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी विद्यार्थी शालेय जीवनापासूनच तयारी सुरू करतात. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांनाही आता आयआयटीमध्ये प्रवेश देण्यात येऊ लागला आहे.

ऑलिम्पियाडमधून आयआयटीला प्रवेश

२०२५-२६ शैक्षणिक वर्षात आयआयटी कानपूरने आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि संगणकशास्त्र या विषयांत मिळवलेल्या गुणांवरून पाच विद्यार्थ्यांना बीटेक व बीएस अभ्यासक्रमात प्रवेश दिला. या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा द्यावी लागली नाही. तर ऑलिम्पियाडमधील गुणवत्तेनुसार त्यांची निवड करून, लेखी चाचणीनंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांना सेतू किंवा जोड अभ्यासक्रमाची गरज नाही, त्यांना नियमित वर्गात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती आयआयटी कानपूरने दिली. केवळ आयआयटी कानपूरच नाही, तर आयआयटी मद्रास, आयआयटी मुंबई, आयआयटी गांधीनगर आणि आयआयटी इंदूर यांनीही अशा मार्गांचा विचार सुरू केला आहे. आयआयटी मद्रासने २०२५-२६ मध्ये ‘सायन्स ऑलिंपियाड एक्सलन्स’ (स्कोप) योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक पदवी अभ्यासक्रमात दोन अतिरिक्त जागा ठेवण्यात आल्या असून त्यापैकी एक जागा मुलींसाठी राखीव आहे. त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांतील ऑलिम्पियाडमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा क्रमांक ठरतो. आयआयटी गांधीनगरने ऑनलाइन प्रस्तावाद्वारे ऑलिंपियाडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यता दिली असून, आयआयटी मुंबईने बीएस (गणित) प्रवेशासाठी इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाडला मान्यता दिली आहे, तर आयआयटी इंदूरने क्रीडा मार्गाने प्रवेशाचा पर्याय सुरू केला आहे. त्यामुळे आयआयटीच्या प्रवेशात आता ‘लॅटरल एंट्री’चा मार्ग खुला होत असल्याचे चित्र आहे.  

ऑलिम्पियाडद्वारे आयआयटीमध्ये प्रवेश का?

जेईई अॅडव्हान्स्डमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांचे सखोल ज्ञान तपासले जाते. मात्र, ऑलिंपियाडमधून समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि विषयाची समजही तपासली जाते. हेच गुण संशोधन आणि नवोवक्रमासाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे ऑलिंपियाडच्या माध्यमातून निवड ही आयआयटी प्रवेशासाठीच्या गुणवत्तेला पूरक ठरते. दोन्ही पद्धती प्रतिभेचे वेगळ्या प्रकारे मूल्यमापन करतात. एक दुसऱ्याची जागा घेऊ शकत नाही. ऑलिंपियाडच्या माध्यमातून आयआयटी प्रवेश हा समानता राखून बुद्धिमत्तेची विविधता ओळखण्याचा प्रयत्न आहे. आयआयटी प्रवेशासाठीची आणखी एक वेगळी वाट तयार करण्याचा, जेईईचे महत्त्व कमी करण्याचा विचार त्यामागे नाही. जेईई आणि ऑलिंपियाड हे प्रतिस्पर्धी नसून एकमेकांसाठी पूरक आहेत, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

ऑलिम्पियाडद्वारे प्रवेश हा नवीन कल?

आयआयटी प्रवेशासाठीचे गुणांकन फक्त जेईईपुरते मर्यादित न ठेवता गुणवत्ता अनेक रूपांत दिसू शकते, हा संकेत ऑलिम्पियाडद्वारे प्रवेशांतून मिळतो. ऑलिंपियाडच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रवेशांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येक अभ्यासक्रमात मोजक्याच जागा आहेत. त्यामुळे आयआयटी प्रवेशासाठी जेईई हीच मुख्य परीक्षा आहे. मात्र, असामान्य प्रतिभेच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन दार उघडले जाते. त्यामुळे ऑलिम्पियाडद्वारे प्रवेश ही केवळ संधी आहे, यातून कल निर्माण होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञांनी नोंदवले.

ऑलिम्पियाडद्वारे प्रवेशांवर आक्षेप काय?

लाखो विद्यार्थी आयआयटीच्या प्रवेशासाठी प्रचंड अभ्यास करून तयारी करतात, परीक्षा द्यावी लागते. साधनसुविधा असलेल्या शाळांतील विद्यार्थी ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्यांना प्रवेशाची संधी मिळणे, अन्य विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक नाही का, या पद्धतीने प्रवेशासाठीचा ओढा वाढल्यास येत्या काळात या प्रवेशांचा नवा प्रश्न निर्माण होणार नाही का, असे प्रश्न शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित केले जात आहेत.