what is happening with Imran khan in jail: एका माजी पंतप्रधानाला अंधारात बंद केलंय… ना वकिल, ना कुटुंबीयांचा सहवास… फक्त निःशब्द तुरुंग आणि १४ वर्षांची शिक्षा. हे एखाद्या हुकूमशाही देशात घडतंय, असं वाटेल. पण ही कथा आहे पाकिस्तानातील, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची. त्यांच्या दोन मुलांनी अखेर मौन तोडलंय आणि जगभरातील प्रभावी नेत्यांकडे, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी भावनिक साद घातली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची दोन मुलं कासिम आणि सुलेमान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील प्रभावशाली नेत्यांकडे त्यांच्या वडिलांची सुटका व्हावी यासाठी हस्तक्षेप कऱण्याची विनंती केली आहे.

ब्रिटिश नागरिक असलेले हे दोघं आतापर्यंत फारसे प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. पण आता पहिल्यांदाच त्यांनी उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सर्व कायदेशीर आणि राजनैतिक मार्ग वापरून पाहिले, पण काहीही उपयोग झाला नाही. आता गप्प राहणं अशक्य झालंय,” असं सुलेमान म्हणाला. कासिमनेही या गोष्टीला समर्थन देत म्हटलं की, “आम्ही यापूर्वी कधीच काही बोललो नव्हतो, पण आता त्यांना ज्या पद्धतीने त्रास दिला जातोय, ते पाहून गप्प बसणं अशक्य झालं आहे.”
पत्रकार मारिओ नवफल यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत या भावंडांनी इम्रान खान यांचं अटकेनंतरचं आणि शिक्षा सुनावल्यानंतरचं वास्तव स्पष्टपणे मांडलं आहे. इम्रान खान यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप बनावट असून पाकिस्तानमध्ये लोकशाहीचं दमन सुरू आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
वीज नाही, निव्वळ अंधार आणि एकटे इम्रान खान
इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात १४ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. २०२३ सालाच्या ऑगस्टपासून ते अटकेत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार, गोपनीय कागदपत्रांच्या गैरवापरासह १०० हून अधिक आरोप आहेत. हे आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळले असून, “हा सगळा राजकीय कट आहे,” असा आरोप खान यांच्या दोन्ही मुलांनी केला आहे.
इम्रान खान यांच्या पूर्व पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी देखील मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारवर गंभीर आरोप केले होते. “शहबाज शरीफ सरकारने खान यांना वकील आणि कुटुंबीयांपासून दूर केलं. त्यांच्या सेलमधली वीज कापली आणि ते आता अंधारात पूर्ण एकटे आहेत. बाहेरील जगाशी त्यांचा कोणताही संपर्क नाही,” असं त्यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
कासिमनेही हेच सांगितलं की, इम्रान खान यांना सलग १० दिवस पूर्ण अंधारात ठेवण्यात आलं होतं. “ते माणूस म्हणून जगू शकतील, अशा मूलभूत गोष्टीही त्यांना दिल्या जात नाहीत. ही केवळ आमच्या वडिलांची गोष्ट नाही, तर इतर राजकीय कैद्यांचीही आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा खरी लोकशाही यावी, यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव हवा आहे,” असं तो म्हणाला.
वडिलांसाठी ट्रम्प यांनी मदत करावी
मुलाखतीत कासिम आणि सुलेमानने डोनाल्ड ट्रम्प यांना खास विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. “आम्हाला ट्रम्प यांच्याशी बोलायला आवडेल. त्यांनी काही तरी मार्ग शोधावा आणि आमच्या वडिलांना या अंधारकोठडीतून बाहेर काढण्यासाठी मदत करावी,” असं कासिम म्हणाला.
सुलेमाननेही जगभरातील प्रभावशाली नेत्यांनी इम्रान खान यांच्यासाठी आवाज उठवावा अशी विनंती केली आहे. “खूप दिवसांपासून शांतता आहे, लोक गप्प बसलेत. पण आता आवाज उठवण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे थोडीशीही ताकद किंवा पोहोच आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,” असं तो म्हणाला.
“सौदा करणारा नाही…”
इम्रान खान सरकारशी तडजोड करून सुटका करून घेतील का, या प्रश्नाबाबत विचारल्यावर कासिमने स्पष्ट नकार दिला. “ते स्वतःला वाचवण्यासाठी सौदा करणारी व्यक्ती नाहीत, ते तत्वनिष्ठ आहेत. त्याच्या समर्थकांना खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यामुळे ते स्वतःला बाहेर काढण्यासाठी फक्त तडजोड करतील असं होणार नाही,” असं तो म्हणाला.

“ते देशासाठी लढले… आता देश त्यांना गमावतोय”
शेवटी कासिम म्हणतो, “वडिलांची आठवण येतेच, पण त्याहून अधिक वेदना ही आहे की, ज्यांनी आयुष्य देशासाठी दिलं, त्या देशाने त्यांना गमावण्याची वेळ आणली आहे.” “वास्तवासाठी उभं राहिलं, तर किंमत मोजावी लागते… हे त्यांनीच आम्हाला शिकवलं होतं. आणि आज आम्ही ती किंमत प्रत्यक्ष चुकवतोय,” असं तो म्हणाला.
सध्या इम्रान खान अदियाला तुरुंगात १४ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याची मागणी केली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील काळात पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती आणि न्यायप्रक्रिया यावर या प्रकरणाचा काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.