Blue-water navy India भारतीय नौदल आपली ताकद कमालीची वाढवत आहे. नौदल आपल्या ब्लू-वॉटर नेव्हीचा विस्तार करत असून, २०३० पर्यंत भारतीय नौदल अधिक सक्षम होणार आहे. भारत आपल्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि प्रादेशिक धोक्यांना तोंड देण्यासाठी ब्लू-वॉटर नौदलाची (खोल समुद्रात युद्ध करण्याची क्षमता असलेले नौदल) ताकद आणखी वाढवत आहे. भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र पर्शियन आखातापासून ते मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागापासून ते आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागापर्यंत आहे.
या जलक्षेत्रांमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या नौदल क्षमतेमुळे एक मोठी चिंता निर्माण झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या मते, भारतासाठी समुद्रमार्गाचे महत्त्व खूप मोठे आहे. देशाच्या एकूण व्यापारापैकी ९५ टक्के (८५५ दशलक्ष टन) मालाची वाहतूक आणि ७७ टक्केआर्थिक मूल्य सागरी मार्गाने होते. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी या सागरी दळणवळण मार्गांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काय आहे भारतीय नौदलाचे ‘नेटवर्क्ड ब्ल्यू-वॉटर फोर्स’ तयार करण्याचे उद्दिष्ट? भारताच्या सुरक्षेसाठी याचे महत्त्व काय? जाणून घेऊयात…

नौदल ताफ्याचा विस्तार आणि भविष्यातील उद्दिष्टे
- एका नौदल अधिकाऱ्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय)’ला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे २०२५ पर्यंत जहाजे व पाणबुड्यांची संख्या २०० हून अधिक करण्याचे उद्दिष्ट आहे आणि २०२७ पर्यंत ही संख्या २३० पर्यंत पोहोचू शकते.
- सध्या नौदलाकडे १४० युद्धनौका आहेत. त्यात १७ डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या (त्यापैकी ११ खूप जुन्या आहेत) आणि दोन अणु-शक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक पाणबुड्या (SSBNs) आहेत.
- नौदलाच्या एव्हिएशन विंगमध्ये २५० हून अधिक विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत.
- पुढील दशकभरात जुनी होत असलेली जहाजे सेवामुक्त होणार असल्यामुळे नौदल आपल्या ताफ्याची संख्या २०० युद्धनौका आणि ३५० विमाने व हेलिकॉप्टरपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे.
विमानवाहू जहाजे आणि लढाऊ विमाने
एप्रिलमध्ये भारताने आपल्या विमानवाहू जहाजांवरून उड्डाण घेण्यासाठी २६ राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी फ्रान्सबरोबर ६३ हजार कोटी रुपयांचा करार केला. त्याचबरोबर भारत आपली स्वदेशी क्षमता वाढवण्यासाठी ‘TEDBF’ (Twin Engine Deck-Based Fighter) नावाचे स्वतःचे लढाऊ विमान विकसित करत आहे.
युद्धनौकांचे बांधकाम आणि मंजूर प्रकल्प
सध्या भारतीय शिपयार्डमध्ये ९९,५०० कोटी रुपये खर्चून ५५ युद्धनौकांचे बांधकाम सुरू आहे. त्याव्यतिरिक्त नौदलाला २.३५ लाख कोटी रुपयांच्या ७४ अतिरिक्त युद्धनौकांसाठी स्वीकृती मिळाली आहे. त्याचे अजूनही करार बाकी आहेत. त्यांसारख्या काही प्रमुख जहाजांमध्ये पुढील जहाजांचा समावेश आहे :
- ९ डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या
- ७ पुढच्या पिढीतील फ्रिगेट (Multi-role frigates)
- ८ पाणबुडीविरोधी युद्ध कॉर्व्हेट (Anti-submarine warfare corvettes)
- १२ माईन काउंटरमेझर जहाजे (Mine countermeasure vessels)
त्याचप्रमाणे चार १०,००० टन वजनाच्या पुढच्या पिढीतील डिस्ट्रॉयर्स (destroyers) आणि जुन्या ४०,००० टन वजनाच्या आयएनएस विक्रमादित्यच्या (INS Vikramaditya) जागी नवीन विमानवाहू जहाजासाठीदेखील मंजुरीची वाट पाहिली जात आहे.
भारत काय काय खरेदी करणार?
गेल्या आठवड्यात संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सेनादलांसाठी १५ वर्षांची खरेदी योजना जाहीर केली गेली, त्यात नौदलासाठी च्या अनेक जहाजांचा समावेश आहे. या योजनेत संभाव्य संख्या आणि क्षमतांची रूपरेषा दिली आहे:
- ४ लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स (Landing Platform Docks) (प्रत्येकी २९,००० टन)
- ५ फ्लीट सपोर्ट जहाजे (Fleet support ships) (प्रत्येकी ४०,००० टन)
- १०० पुढच्या पिढीतील वेगवान इंटरसेप्टर बोटी (Fast interceptor boats) (१७ टनांपर्यंत)
- २० इंटरसेप्टर जहाजे (Remotely manned fast interceptor vessels)
- १० अणुशक्तीवर चालणाऱ्या युद्धनौका (Nuclear-powered warships)
- पाणबुडीविरोधी युद्धासाठी २० उच्च-क्षमतेची पाण्याखालील वाहने (high-endurance underwater vehicles)
- २,००० विस्तारित-पल्ल्याचे पाणबुडीविरोधी रॉकेट (extended-range ASW rockets)
- १२० हून अधिक मध्यम उंचीचे लांब पल्ल्याचे (MALE) ड्रोन
- ५० हून अधिक रिमोटली पायलटेड सिस्टीम (प्रत्येकी ३ ड्रोनसह)
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘टीओआय’ला सांगितले, “एका रात्रीत मोठे नौदल तयार करणे शक्य नाही, कारण- त्यासाठी अनेक वर्षांचे नियोजन आणि बांधकाम लागते. पी-५ (P5) देशांव्यतिरिक्त (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स व ब्रिटन) भारत हा एकमेव देश आहे, जो विमानवाहू जहाजे आणि SSBNs (अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक पाणबुड्या) यांची रचना, बांधकाम व संचालन करू शकतो.” ते पुढे म्हणाले, “एक शिपयार्डमध्ये तयार होणारे काम संबंधित उद्योगांमध्ये पाच ते सहा अतिरिक्त नोकऱ्या निर्माण करते आणि युद्धनौकांवर होणाऱ्या खर्चाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर १.८ पट जास्त परिणाम होतो.”
नौदलासमोरील आव्हाने
सध्या ३७० युद्धनौका आणि पाणबुड्यांसह जगातील सर्वांत मोठे नौदल चीनकडे आहे; तर एकूण वजनाच्या बाबतीत अमेरिका आघाडीवर आहे. चीन हिंदी महासागर प्रदेशात आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे. त्यांनी जिबूती, पाकिस्तानमधील ग्वादर व कंबोडियामधील रीम येथे तळ सुरक्षित केले आहेत. चीन पाकिस्तानला ८ हँगोर/युआन (Hangor/Yuan) श्रेणीच्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या देत आहे, त्यात एअर-इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान पाणबुड्यांना जास्त काळ पाण्याखाली राहण्यास मदत करते. एका नौदल अधिकाऱ्याच्या मते, पाकिस्तान सध्या पाच जुन्या अॅगोस्टा (Agosta) श्रेणीच्या पाणबुड्या चालवतो; परंतु या नवीन पाणबुड्यांच्या समावेशामुळे त्यांची समुद्रातील क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.
आपल्या पाण्याखालील लढाऊ क्षमता मजबूत करण्यासाठी, भारत एआयपी (AIP) आणि जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज सहा डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांसाठी वाटाघाटी करीत आहे. ७०,००० कोटी रुपयांचा हा करार जर्मनीच्या ‘थायसेनक्रुप मरीन सिस्टिम्स’बरोबर भागीदारीत ‘माझगांव डॉक शिपबिल्डर्स’द्वारे केला जाईल. दरम्यान, फ्रेंचमधील आणखी तीन स्कॉर्पिन (Scorpene) पाणबुड्यांच्या बांधकामाचा ३२,००० कोटी रुपयांचा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. नौदल सध्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्या (२०२२ मध्ये वितरित केलेली आयएनएस वागशीर (INS Vagsheer) सह), चार जर्मन एचडीडब्ल्यू (HDW) आणि सात जुन्या रशियन पाणबुड्या चालवते.