ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने उडालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाला आता पहिल्या ड्रोन युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. सिंदूर मोहिमेंतर्गत ड्रोनद्वारे पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आल्या. भारतीय लष्करातील सर्वात तरुण ‘आर्मी एव्हिएशन कोअर’ जे लष्करी हवाई दल म्हणून ओळखले जाते, ते ही कामगिरी बजावत आहे. ड्रोनद्वारे हे दल शत्रूवर तुटून पडले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ड्रोन वैमानिकाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये महिला लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
स्थापना आणि वाटचाल
लष्करास अनेक वर्षे दैनंदिन कामासाठी हवाई दलावर विसंबून राहणे अवघड ठरू लागले होते. सैन्याची सामरिक क्षमता वाढविण्यासाठी अनेक प्रमुख राष्ट्रांनी स्वतंत्र लष्करी हवाई शाखेची स्थापना केलेली आहे. याच धर्तीवर, १९८६ मध्ये आर्मी एव्हिएशन कोअरची स्थापना करण्यात आली. भारतीय लष्करातील हे सर्वात तरुण दल आहे. त्याच्या ताफ्यात चिता, चेतक, हलक्या वजनाचे ध्रुव, हल्ला करण्याची क्षमता राखणारे रुद्र आणि अपाचि आदी हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. त्यांच्याकडून हवाई गस्त, निरीक्षण, रसद पुरवठा आणि हल्ला चढविणे आदी जबाबदारी सांभाळली जाते. लष्करी हवाई दलाने उपलब्ध साधनसामग्रीचे एकत्रीकरण करून एव्हिएशन ब्रिगेडची स्थापना केली. भविष्यात आणखी चार एव्हिएशन ब्रिगेडची स्थापना करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
ड्रोनची जबाबदारी कशी आली?
सीमावर्ती भागात टेहळणी, शत्रूच्या प्रदेशातील हालचालींवर नजर ठेवण्याबरोबर तोफखान्याचा अचूक मारा व्हावा, यासाठी दिशादर्शनाचे काम करणाऱ्या मानवरहित विमानांची (ड्रोन) जबाबदारी पूर्वी तोफखाना दलाकडे होती. या क्षेत्रात सुरक्षित उड्डाण, उपकरणांची तपासणी, देखभाल -दुरुस्तीला महत्त्व असते. त्याचे दस्तावेजीकरण होते. तोफखाना दलाची कार्यसंस्कृती त्यास मानवणारी नव्हती. अनेक बाबी लक्षात घेऊन मध्यंतरी हवाई क्षेत्रात कार्यरत लष्कराच्या हवाई दलाकडे मानवरहित विमानांची धुरा देण्यात आली.
ड्रोनची सद्यःस्थिती
लष्करी मोहिमेत गुप्तवार्ता मिळविणे, पाळत ठेवणे आणि शोध ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या क्षमतेच्या आधुनिक ड्रोनमुळे सैन्यदलांची कार्यक्षमता विस्तारत आहे. सैन्य दलांच्या भात्यात सध्या सर्चर मार्क – १, सर्चर मार्क – २ आणि हेरॉन या इस्रायली बनावटीच्या, तसेच निशांत, रुस्तुम, ईगल अशा काही स्वदेशी मानवरहित विमानांचा समावेश आहे. त्यांची १२ ते ३० तास अधिकतम उड्डाण क्षमता आहे. शत्रूच्या प्रदेशात हे ड्रोन १२० किलोमीटरपर्यंत भ्रमंती करू शकतात. त्यांच्यामार्फत मुख्यत्वे टेहळणी केली जाते. लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ल्यासाठी हारुप ड्रोनचा वापर केला गेला. अमेरिकन बनावटीचे प्रिडेटर एमक्यू-१ हे आधुनिक ड्रोनही भारताकडे आहे. जोडीला त्याहून अधिक शक्तिशाली रिपर ड्रोनच्या खरेदीने भारतीय सैन्याची टेहळणी आणि मारक क्षमता विस्तारत आहे. हल्ला करण्याची क्षमता राखणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या ४५० नागास्त्र – १ ड्रोन खरेदीवर शिक्कामोर्तब झालेले आहे.
प्रशिक्षणात काळानुरूप बदल
या दलाची स्थापना झाली, तेव्हा हेलिकॉप्टर वैमानिकांचीसुद्धा कमतरता होती. ती दूर करण्यासाठी नाशिक येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली. हवाई सरावाचा अनुभव नसणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्राथमिक वैमानिक व नंतर काॅम्बॅक्ट एव्हिएटर्स शिक्षणक्रम करावा लागतो. या दोन्ही प्रशिक्षणांतर्गत ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव बंधनकारक असतो. दलाकडे ड्रोनची जबाबदारी आल्यानंतर स्कूलने नवीन शिक्षणक्रम सुरू केले. त्याआधारे दूर संवेदकांनी नियंत्रित होणाऱ्या मानवरहित विमानांसाठी वैमानिक तयार केले जात आहेत. त्या अंतर्गत काही महिला लष्करी अधिकारी ड्रोन वैमानिक बनल्या आहेत.
लढाऊ दलात परिवर्तन
रॉकेट आणि दूरवर मारा करू शकणाऱ्या बंदुकांनी सुसज्ज असणारे रुद्र, अपाची हेलिकॉप्टरच्या जोडीला हल्ला चढविण्याची क्षमता राखणाऱ्या मानवरहित विमानांमुळे लष्कराचे साहाय्यकारी दल अशी ओळख असणारे लष्करी हवाई दल लढाऊ दलात परिवर्तित झाले आहे. सिंदूर मोहिमेंतर्गत दलाच्या ड्रोन हल्ल्यांनी ते सिद्ध केले. १९८४ मध्ये सियाचिनमध्ये मेघदूत, श्रीलंकेतील पवन मोहिमेसह १९९९ मध्ये कारगिल युद्धात सहभाग दलाने सहभाग नोंदविला होता. दहशतवाद आणि बंडखोरांविरुद्धच्या कारवायांमध्ये त्याचे योगदान आहे. इतकेच नव्हे तर, अमरनाथ यात्रा, उत्तरांचलमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना, गुजरात भूकंप, काश्मीर भूकंप, लेहमधील ढगफुटीवेळी बचाव कार्यात दल सदैव सक्रिय राहिले.
स्वतंत्र निशाण कधी मिळाले?
युद्धभूमीवर सैन्य विशिष्ट रंगाचा निशाण (ध्वज) घेऊन लढत असते. सैन्यातील एखादा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते त्यास निशाण देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे. संबंधित विभागास एकदाच हा बहुमान मिळतो. हे निशाण त्या दलाची ओळख बनते. युद्ध आणि शांतता काळात लष्करी हवाई दलाने बजावलेल्या कामगिरीचा गौरव २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विशिष्ट रंगाचे निशाण देऊन करण्यात आला.