India-Pakistan Ceasefire: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर हल्ल्याच्या तीनच दिवसांनंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारताने टपाल आणि व्यापारी मार्गही बंद करण्याचा निर्णय केला. अखेर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पीओजेकेमध्ये एअर स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतरही पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामध्ये निष्पाप १२ नागरिकांचा बळी गेला तर ४० जण जखमी झाले. पाकिस्ताननेदेखील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत १५ भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचे प्रत्युत्तर देत भारताने लाहोर येथील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली.
शनिवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “पाकिस्तानच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांनी दुपारी ३.३५ वाजता भारताच्या डीजीएमओ यांना फोन केला. दोन्ही बाजूंनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्रातून सर्व गोळीबार आणि जमीन, हवाई आणि समुद्र अशा तिन्ही पातळ्यांवर कारवाई थांबेल”, अशी सहमती दर्शविली गेली. मात्र शस्त्रविरामाच्या या घोषणेनंतर काही तासातच पाकिस्तानने याचं उल्लंघन केलं. रात्रीच्या वेळी मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकायला मिळाले.
शस्त्रविराम म्हणजे काय?
शस्त्रविराम म्हणजे संघर्षात सहभागी असलेल्या राष्ट्रांमधील एक करार आहे. फ्रँकोइस बोचे-सॉल्नियर यांच्या ‘द प्रॅक्टिकल गाइड टू ह्युमॅनिटेरियन लॉ’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, एका विशिष्ट क्षेत्रात दिलेल्या कालावधीसाठी सर्व लष्करी कारवायांचा आणि हालचालींच्या समाप्तीचे नियमन करण्याचा प्रयत्न असा अर्थ होतो.
शस्त्रविराम म्हणजे शत्रुत्वाचा अंत नाही. आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय नसलेल्या सशस्त्र संघर्षांमध्ये तो शस्त्रविराम तात्पुरती शत्रुत्वाची स्थगिती दर्शवते. कागदोपत्री म्हटल्याप्रमाणे ते संघर्षपूर्ण स्थितीचा कायदेशीर अंत प्रतिबिंबित करत नाहीत.
ऑक्सफर्ड विश्वकोशातील नोंदीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, शस्त्रविरामाची कोणतीही अधिकृत व्याख्या नाही. तटस्थ देशांच्या मध्यस्थीनंतरची परिस्थिती असे शस्त्रविरामाचे वर्णन आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील लेखक आणि तज्ज्ञ सिडनी डी. बेली यांनी केलेले आहे. शस्त्रविराम औपचारिकपणे कागदोपत्री केला जाऊ शकतो किंवा तोंडी मान्य केला जाऊ शकतो.
१९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सनदेची ओळख होण्यापूर्वी ‘शस्त्रविराम’ आणि ‘शांतता करार’ हे शब्द विशिष्टपणे वापरले जात होते. असं असताना संयुक्त राष्ट्रांनी स्वतः ‘शस्त्रविराम’ या शब्दाचा तत्कालीन संदर्भानुसार वापर केला. त्यामुळे या शब्दांचा वापर परस्पर बदलण्या योग्य झाला, असे ऑक्सफर्ड सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत केलेल्या नोंदीत म्हटले आहे.
शस्त्रविराम करार कशाशी संबंधित आहेत?
ऑक्सफर्ड नोंदीनुसार, आंतरराष्ट्रीय आणि गैर-आंतरराष्ट्रीय सशस्त्र संघर्षांच्या बाबतीत शस्त्रविराम करारांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
- सुरुवातीची वेळ: शस्त्रविराम कधी लागू झाला याची वेळ ते स्पष्ट करते.
- प्रतिबंधित कृत्यांची ओळख आणि व्याख्या: दोन प्रकारच्या प्रतिबंधित कृत्यांची ओळख पटवता येऊ शकते एक म्हणजे लष्करी (सर्व लष्करी हिंसाचाराच्या कृत्यांचा समावेश आहे) आणि गैर-लष्करी (हिंसाचाराच्या धमक्या किंवा प्रचारकी स्वरुपाचा मजकूर).
- शस्त्रविराम रेषा किंवा बफर झोनचे सीमांकन यासह सशस्त्र दलांचे भौतिक विभक्तीकरण: शस्त्रविराम राखण्यासाठी आणि नवीन लष्करी कारवाईची शक्यता रोखण्यासाठी वेगळेपणाचा वापर केला जातो.
- पडताळणी, पर्यवेक्षण आणि देखरेख: हे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखण्यासाठीची देखरेख, संयुक्त देखरेख आयोग किंवा शस्त्रविराम आयोग, संयुक्त कमांड आणि नागरी देखरेख मोहिमांद्वारे साध्य केले जाऊ शकते.
- या महत्त्वाच्या व्याख्यांव्यतिरिक्त त्यात “संघर्षादरम्यान अटक केलेल्यांना स्वदेशी पाठवणे तसंच बेपत्ता किंवा विस्थापित आणि निर्वासितांचे परतणे आणि दाव्यांची भरपाई” याचादेखील समावेश आहे.
शस्त्रविरामाच्या ‘उल्लंघना’बद्दल आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो?
स्वतःच शस्त्रविराम किंवा शस्त्रविरामाचे उल्लंघन केल्याने कोणतेही कायदेशीर परिणाम होत नाहीत, कारण करारांना संघर्ष आणि शांतता यांच्यातील पहिले पाऊल म्हणून पाहिले जाते. संघर्षाच्या काळात मानवतावादी कायदा प्रामुख्याने हिंसेचा वापर आणि नागरिकांच्या संरक्षणाचे नियमन करण्याशी संबंधित राहतो.
शस्त्रविरामाच्या उल्लंघनावरील उपायांचे सविस्तर वर्णन जमिनीवरील युद्धाच्या कायद्याचा आणि नियमांमध्ये केले गेले आहे, ज्याला हेग नियम देखील म्हणतात. ऑक्सफर्ड पब्लिक इंटरनॅशनल लॉ अंतर्गत नोंदीनुसार, हेग नियमांच्या कलम ३६ मध्ये असे म्हटले आहे की, जर शस्त्रविराम त्याचा कालावधी निश्चित करत नसेल तर शत्रूला मान्य केलेल्या वेळेत इशारा देत युद्धग्रस्त पक्ष कधीही ऑपरेशन पुन्हा सुरू करू शकतात.
शिवाय, एका पक्षाने शस्त्रविरामाचे गंभीर उल्लंघन केल्यास दुसऱ्या पक्षाला त्याचा निषेध करण्याचा आणि तातडीच्या प्रकरणांमध्ये ताबडतोब शत्रुत्व पुन्हा सुरू करण्याचा अधिकार मिळतो, असे नियमांच्या कलम ४०च्या नोंदीत म्हटले आहे.
“वैयक्तिक पुढाकाराने काम करणाऱ्या व्यक्तींकडून शस्त्रविरामाच्या अटींचे उल्लंघन झाल्याने जखमी झालेल्या पक्षाला गुन्हेगारांना शिक्षा किंवा आवश्यक असल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्याचा अधिकार मिळतो”, असे कलम ४१ मध्ये म्हटले आहे.