India Simulating Space on Earth: भारतातील प्रमुख संशोधन संस्थांनी अंतराळवीरांशी संबंधित अॅनालॉग प्रयोग मोठ्या संख्येने हाती घेतले आहेत. अंतराळवीरांना मोहिमेदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अंतराळातील वातावरण, परिस्थिती पृथ्वीवर तयार केली जात असून त्याचा वापर प्रयोग करण्यासाठी केला जात आहे. मानवाला अंतराळात पाठविण्याच्या दृष्टीने हे प्रयोग भारतासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. तसेच भारताची स्वतंत्र अंतराळवीर नियमावली ठरविण्यासाठीही या प्रयोगांचा उपयोग होणार आहे.
या प्रयोगांमधून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे अंतराळवीरांच्या मानसिक स्थितीचादेखील अभ्यास केला जाणार आहे. त्यानुसार अंतराळवीरांची निवड करण्यासाठी मानसशास्त्रीय निकष निश्चित केले जाऊ शकतात. या प्रयोगांवर भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), भारतीय संरक्षण संशोधन संघटना (DRDO) यासारख्या प्रमुख संशोधन संस्था काम करत आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधकांनी अॅनालॉग प्रयोगांवर भाष्य करताना सांगितले, “भारतासाठी अंतराळ औषधशास्त्र आणि अंतराळ मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून ही एक महत्त्वाची सुरूवात आहे. या प्रयोगांचा उपयोग फक्त गगनयान मोहिमेसाठीच नव्हे, तर अवकाश स्थानकावर राहण्यासाठी तसेच चांद्रयान मोहिमेसाठी देखील होणार आहे. अंतराळ मोहिमांसाठी भारताची स्वतंत्र अंतराळवीर नियमावली तयार करण्यासाठी या प्रयोगांचा उपयोग होणार आहे.” भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) व बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन या दोन संस्था संयुक्तपणे अंतराळवीरांशी संबंधित अॅनालॉग प्रयोगांवर काम करणार आहेत.
अंतराळातील वातावरण निर्मिती पृथ्वीवर कशासाठी ?
अंतराळवीरांना अंतराळ मोहिमेदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत त्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करावे लागतात. अनेकदा अंतराळ मोहिमेदरम्यान अनपेक्षित समस्या उद्भवतात. त्यातून त्यांच्यावर मानसिक तणाव येतो. या सगळ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी अंतराळवीरांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला जात असून त्यासाठी प्रयोगशाळेत अंतराळातील वातावरण निर्मिती (अॅनालॉग प्रयोग) केली जात आहे. या प्रयोगादरम्यान अंतराळवीर अंतराळात कराव्या लागणाऱ्या सगळ्या क्रिया इथे पार पाडणार आहेत.
गगनयान अॅनालॉग एक्सपिरिमेंट्स (Gyanex) काय आहेत ?
गगनयान अॅनालॉग एक्सपिरिमेंट्स (Gyanex) मध्ये प्रशिक्षणार्थी अंतराळवीर हे काही संशोधक आणि संरक्षणक्षेत्रातील सहकाऱ्यांसह एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या अवकाशयानात किंवा अवकाश स्थानकात राहणार आहेत. या प्रयोगात सहभागी प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांना अंतराळातील दिनचर्या पाळावी लागणार आहे. तसेच काही वैज्ञानिक प्रयोग देखील करावे लागणार आहेत. अॅनालॉग एक्सपिरिमेंट्स दरम्यान त्यांना DRDO ने संशोधन करून तयार केलेले अन्नपदार्थच दिले जाणार आहेत. दरम्यान, याच वर्षी जुलै महिन्यात अॅनालॉग एक्सपिरिमेंट्सचा पहिला प्रयोग Gyanex-1 यशस्वीपणे पार पडला. या प्रयोगात ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह एका simulator (अंतराळयाना) मध्ये दहा दिवस राहिले. या दरम्यान प्रताप आणि त्यांच्या टीमने ११ वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले.
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणची (Microgravity) निर्मिती करता येते का ?
अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील प्रयोगशाळेत निर्माण करण्यात मुख्य अडचण आहे ती म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण. अंतराळात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (Microgravity) असते. त्यामुळे वस्तू आणि व्यक्ती तरंगतात. भारतीय अॅनालॉग प्रयोग व प्रत्यक्ष अंतराळ मोहिम यामध्ये मुख्य फरक गुरुत्वाकर्षणाचा आहे. पृथ्वीवरील अॅनालॉग प्रयोगांमध्ये अंतराळात असलेले सूक्ष्म गुरुत्वाकर्षण तयार करणे अशक्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे या प्रयोगांमधून अंतराळवीरांच्या आरोग्यावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा (Microgravity) काय परिणाम होतो, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकत नाही. दरम्यान, अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने पॅराबॉलिक फ्लाईट तयार केले असून त्यात ३० ते ४० सेकंद सूक्ष्म गुरुत्वाकर्षण जाणवल्याची नोंद आहे.
भारताची अंतराळवीर नियमावली तयार करण्यासाठी फायदा होणार ?
अॅनालॉग प्रयोगांचा उपयोग भारताला स्वत:ची अंतराळवीरांशी संबंधित नियमावली विकसित करण्यासाठी होणार आहे. या बाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) संशोधकांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे, “या प्रयोगांदरम्यान अंतराळवीरांना अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या समस्या संशोधकांना समजू शकतील. तणाव असताना अंतराळवीरांनी कसे काम करायचे, तसेच तणावाचा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, गोष्टी ठरवल्याप्रमाणे न घडल्यास अंतराळवीर कसे वर्तन करतात, परिस्थितीचा सामना कशाप्रकारे करतात या गोष्टींचा अभ्यास या प्रयोगांच्या आधारे केला जाणार आहे.” अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीरांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास या अॅनालॉग प्रयोगांमधून केला जाणार आहे.
दरम्यान, पहिल्या अॅनालॉग प्रयोगानंतर अंतराळवीरांसाठी वैद्यकीय व मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून अहवाल तयार करण्यात आला असून त्यावर काम सुरू आहे. तसेच त्याचा उपयोग भारताची अंतराळवीर नियमावली तयार करण्यासाठी होणार असल्याचे म्हटले जाते.
अंतराळवीरांसाठी मानसशास्त्रीय निकष ठरविणार?
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतराळवीरांसाठी मानसशास्त्रीय निकष व प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यावर सध्या काम करत आहे. अंतराळवीरांच्या मानसिक अवस्थांचा अभ्यास करून मानसशास्त्रीय निकष ठरवले जाणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन संस्थेचे संशोधक अंतराळवीरांच्या अन्नपदार्थांच्या गरजेवर काम करत आहे.
ISRO ने याआधी अॅनालॉग मोहिमा केल्या आहेत का, त्या कोणत्या ?
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने या आधी दोन अॅनालॉग मोहिम पार पाडल्या आहेत. ‘द लडाख ह्युमन अॅनालॉग मिशन’ ही मोहीम नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत लडाखमधील दुर्गम भागातील नापिक भूप्रदेशावर, अत्यंत थंड हवामानात राहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. इतर ग्रहावर किंवा अंतराळातील स्थानकावर राहण्याची परिस्थिती उद्भवल्यास तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे याचे प्रशिक्षण या मोहिमेत देण्यात आले होते.
तसेच इस्रोने दुसरी अॅनालॉग मोहिम लडाखमधील त्सो कर व्हॅलीत पार पाडली. यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्ये या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या व्हॅलीतील व मंगळ ग्रहावरील हवामानात काही साम्य असल्याने या व्हॅलीची निवड करण्यात आली होती. वाऱ्याचा दाब, कडाक्याची थंडी या वातावरणाचा मोहिमेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींनी सामना केला होता.