ब्रिटिशांच्या काळात मुंबईत ट्रामने प्रवास केला जायचा. ९ मे १८७४ साली पहिल्यांदा मुंबईत घोड्यांकडून खेचली जाणारी ट्राम धावली. त्यावेळी दोन ते सहा घोड्यांकडून खेचल्या जाणार्‍या ट्राम मुंबईच्या रस्त्यावर आल्या. ही ट्राम सेवा सुरू झाली तेव्हा दोन मार्ग निश्चित करण्यात आले होते. पहिला मार्ग होता कुलाबा ते पायधुनीमार्गे क्रॉफर्ड मार्केट आणि दुसरा मार्ग होता बोरिबंदर ते काळबादेवीमार्गे पायधुनी. त्यावेळी एका तिकिटाची किंमत एक आणे (१६ आणे म्हणजे एक रुपया) होती. ट्राम गाड्या ८ किमी प्रतितास वेगाने चालायच्या. ही ट्राम पर्वाची सुरुवात होती.

मुंबईच्या महानगरातून अनेक वर्षांपूर्वीच ट्राम बंद करण्यात आल्या. खरे तर कोलकाता हे भारतातील एकमेव असे शहर आहे, जिथे अजूनही ट्राम कार्यरत आहेत. एकेकाळी संपूर्ण देशात म्हणजे दिल्ली, बॉम्बे (आताची मुंबई) आणि मद्राससारख्या महानगरांपासून पाटणा व भावनगर यांसारख्या लहान शहरांमध्येही ट्राम चालायच्या. देशातील पहिली सार्वजनिक वाहतूक असलेली ट्राम सेवा कशी सुरू झाली, या सेवेचा इतिहास काय? त्यावर एक नजर टाकू या.

हेही वाचा : नोंदणी केलेली नसल्यास विवाह अवैध ठरतो का?

एकेकाळी घोडे हाकायचे ट्राम

सर्वांत पहिल्यांदा ही कल्पना १८६५ मध्ये स्टर्न्स हॉबर्ट या एका अमेरिकन कंपनीने मांडली. त्यासाठी त्यांनी मुंबई प्रांतातील सरकारकडे अर्ज केले. त्याच वर्षी मुंबईत घोड्यांद्वारे चालणाऱ्या ट्रामचा परवाना मंजूर करण्यात आला. मात्र, तो प्रकल्प प्रत्यक्षात आलाच नाही. मुंबईऐवजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे पहिली ट्राम कार दाखल झाली. कलकत्ता ही तत्कालीन ब्रिटिश राजधानी होती; जिथे १८७३ मध्ये देशातील पहिली ट्राम कार सेवेत दाखल झाली होती. कलकत्त्यात घोड्यांद्वारे खेचली जाणारी ट्राम सियालदाह आणि आर्मेनियन घाट स्ट्रीटदरम्यान ३.८ किमीच्या मार्गावर चालायची. पण, कलकत्त्यात जनतेकडून सुरुवातीस अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ही सेवा बंद करण्यात आली.

१८७४ मध्ये मुंबईला घोड्यांकडून खेचली जाणारी पहिली ट्राम मिळाली. त्यानंतर १८८६ मध्ये ट्राम पाटणा येथे दाखल झाली. पाटण्यात ट्रामचा मार्ग तीन किमी अंतरावर असलेल्या बांकीपूरपर्यंत पसरला होता. १८८९ मध्ये नाशिकमध्ये आठ किमी लांबीच्या ट्राम लाइनचे उदघाटन करण्यात आले; जी आजच्या जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीपासून ते नाशिक रोड रेल्वेस्थानकापर्यंत पसरली होती. सुरुवातीला ट्राम चालविण्यासाठी मोठ्या संख्येने घोड्यांची आवश्यकता होती आणि या ट्रामचा वेगही फार कमी होता; ज्यामुळे आर्थिक व्यवहार्यतेच्या संदर्भात समस्या निर्माण झाली.

जुन्या दिल्लीतील ट्राम (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

वाफेच्या इंजिनावर चालणारी ट्राम

१८८० मध्ये कलकत्ता येथे ट्राम पुन्हा उदयास आली. लॉर्ड रिपनने बोबझार स्ट्रीट, डलहौसी स्क्वेअर आणि स्ट्रॅण्ड रोडमार्गे सियालदाह आणि आर्मेनियन घाट स्ट्रीटदरम्यान नवीन मीटरगेज मार्गाचे उदघाटन केले. दोन वर्षांनंतर कलकत्ता ट्रामवे कंपनीने ट्राम खेचण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा प्रयोग सुरू केला. परंतु, जुने लोकोमोटिव्ह मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरवणारे होते; ज्यामुळे त्याला नागरिकांचा विरोध होता. १९ व्या शतकाच्या अखेरीस कलकत्ता ट्रामवे कंपनीने सात लोकोमोटिव्ह इंजिने आणि १००० हून अधिक घोडे ट्रामसाठी वापरले. मुंबई, नाशिक व पाटणा यांनी कधीही वाफेवर चालणारे लोकोमोटिव्ह इंजिन वापरले नाही.

परंतु, काही प्रमाणात का होईना वाफेच्या इंजिनांना यश मिळाले. १९०७ मध्ये ट्रामच्या साह्याने कोचीन स्टेट फॉरेस्ट ट्रामवेने पलक्कडच्या जंगलातून सागवान आणि गुलाबाचे लाकूड त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडी शहरापर्यंत नेण्याचे काम सुरू केले. हा सुमारे ८० किमी लांबीचा मार्ग होता. १९२६ मध्ये कर्नल महाराजा राव सर कृष्ण कुमारसिंहजी भावसिंहजी यांच्या कारकिर्दीत भावनगर संस्थानात लोकोमोटिव्ह-चालित ट्रामवे सुरू करण्यात आली.

इलेक्ट्रिक ट्रामने क्रांती घडवली

१८९५ मध्ये मद्रासमध्ये देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्रामवे सेवेत दाखल झाली. इलेक्ट्रिक ट्राम या क्रांतिकारक होत्या. कारण- त्यांनी घोड्यांद्वारे चालणाऱ्या आणि वाफेवरील इंजिनावर चालणाऱ्या ट्रामवेच्या उणिवा दूर केल्या. या ट्राम प्रदूषणविरहीत आणि अतिशय कमी आवाज करणार्‍या होत्या. इलेक्ट्रिक ट्राममुळे शेकडो घोड्यांच्या देखभालीचीही आवश्यकता नव्हती. १९०२ पर्यंत कलकत्त्यात एस्प्लेनेड ते किडरपोर आणि एस्प्लेनेड ते कालीघाटदरम्यान धावणारी पहिली इलेक्ट्रिक ट्राम दाखल झाली. १९०७ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रामवे कंपनी (BEST) अंतर्गत मुंबईतही इलेक्ट्रिक कार धावली.

कानपूरमध्येदेखील १९०७ मध्ये रेल्वेस्थानक ते सिरसिया घाट यादरम्यान ६.४ किमीच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ट्रॅकचे उदघाटन करण्यात आले. मात्र, दिल्लीत इलेक्ट्रिक ट्राम सेवा एक वर्षानंतर सुरू झाली. जिथे ही सेवा सुरू झाली होती, त्या भागाला आता जुनी दिल्ली म्हणून ओळखले जाते. ट्राम सेवा रुळल्यानंतर दिल्लीत जामा मशीद, चांदनी चौक, चावरी बाजार, कटरा बडियान, लाल कुआं व फतेहपुरी, तसेच सब्जी मंडी, सदर बाजार, पहाडगंज, अजमेरी गेट, बारा हिंदू राव आणि तीस हजारी येथे ट्राम दिसू लागल्या.

ट्राम वाहतुकीची वाटचाल कालबाह्यतेकडे

१९६० च्या दशकापर्यंत ट्रामवेकडे शहरी वाहतुकीतील क्रांतिकारी विकास म्हणून पाहिले जात होते. परंतु, हळूहळू ट्राम कालबाह्य साधन ठरू लागले. कलकत्त्यात शेवटच्या उरलेल्या ट्रामदेखील कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा : केजरीवालांवर दहशतवाद्याच्या सुटकेसाठी पैसे घेतल्याचा आरोप; कोण आहे देविंदर भुल्लर?

पाटणा हे पहिले शहर होते; ज्याने १९०३ मध्ये कमी प्रवासी संख्येमुळे आपली ट्राम सेवा बंद केली. सलग पडणार्‍या दुष्काळ आणि प्लेगच्या साथीमुळे नाशिकने १९३३ मध्ये आपली ट्रामवे बंद केली. आर्थिक नुकसानीमुळे कानपूरने त्याच वर्षी आपली ट्राम सेवा बंद केली. मद्रासची ट्राम कंपनी १९५० मध्ये दिवाळखोरीच्या मार्गावर होती. १९५३ मध्ये मद्रास येथे शेवटची ट्राम धावली. ट्रामपेक्षा उत्तम वाहतूक पर्याय उपलब्ध झाल्याने लोकांनी ट्रामकडे पाठ फिरवली. मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेने शहराला त्याच्या उपनगरांशी मोठ्या प्रमाणावर जोडले आणि बेस्ट बस रस्त्यावर आल्यानेही ट्राम मुंबईतून लवकर कालबाह्य झाल्या. मुंबईमध्ये १९६४ मध्ये शेवटच्या ट्राम धावल्या. शहराकडे येणारा लोंढा वाढल्यामुळे दिल्लीनेही ट्राम सेवा बंद केली.