भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखले. आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीपाठोपाठ ‘अव्वल चार’ फेरीतही भारतीय संघाने पाकिस्तानवर मात केली. या विजयादरम्यान भारतीय संघाने विक्रम रचला. हा विक्रम काय आहे आणि पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना भारताची कामगिरी सरस कशी, याचा आढावा.
भारताची कामगिरी विशेष का?
ट्वेन्टी-२० प्रारूपामध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध आठ वेळा आव्हानाचा पाठलाग करताना विजय नोंदवला आहे आणि विशेष म्हणजे कधीही पराभव स्वीकारलेला नाही. यासह दुबई येथे भारताने १७२ धावांचा यशस्वी पाठलाग केला. पाकिस्तानविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. ‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यात भारताने ‘पॉवर-प्ले’मध्ये बिनबाद ६९ अशी सुरुवात केली. पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ही भारताची सर्वोत्तम सुरुवात होती. यापूर्वी भारताने २०२२ मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० प्रारूपातील आशिया चषकात दुबई येथील सामन्यात १ बाद ६२ अशी सुरुवात केली होती.
आव्हानाचा पाठलाग करताना कामगिरी…
भारत-पाकिस्तान यांच्यात २०१२ मध्ये कोलंबो येथे झालेल्या सामन्यात भारताने आठ गडी राखून विजय नोंदवला. २०१४ साली मीरपूर येथे सात गडी राखून, २०१६ मध्ये मीरपूर येथेच पाच गडी राखून, २०१६ मध्ये इडन गार्डन्स येथे सहा गडी राखून, दुबई येथे २०२२ मध्ये पाच गडी राखून, मेलबर्न येथे २०२२ मध्ये चार गडी राखून भारताने विजय मिळवले. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताने १४ सप्टेंबरला झालेल्या साखळी सामन्यात सात गडी राखून, तर आता ‘अव्वल चार’ फेरीत सहा गडी राखून विजयाची नोंद केली.
यशाचे गमक काय?
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची कामगिरी सातत्याने खालावत असून भारतीय क्रिकेट प्रगतीपथावर आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या फलंदाजांना रोखणे पाकिस्तानला अवघड जायचे. आता हे अनुभवी फलंदाज निवृत्त झाले असले, तरी नव्या दमाच्या भारतीय फलंदाजांसमोरही अडचणी निर्माण करण्यात पाकिस्तानचे गोलंदाज अपयशी ठरत आहेत. यामुळेच भारतीय संघ वारंवार धावांचा यशस्वीपणे पाठलाग करत आहे.
अभिषेक, गिलचा झंझावात…
आशिया चषकात ‘अव्वल चार’ फेरीत भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा (३९ चेंडूंत ७४) आणि शुभमन गिल (२८ चेंडूंत ४७) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यांनी पहिल्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी रचली. ही पाकिस्तानविरुद्ध पहिल्या गड्यासाठी आजवरची सर्वोच्च भागीदारी ठरली. अभिषेकने केवळ २४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. हे पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजाने केलेले आजवरचे सर्वांत वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी, २०१२ मध्ये युवराज सिंगने २९ चेंडूंत ही कामगिरी केली होती. तसेच पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक करणारा अभिषेक हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. यापूर्वी सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी २००७ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात ७५ धावांची खेळी केली होती.
भारतीय गोलंदाज, क्षेत्ररक्षकांकडून निराशा
भारताच्या क्षेत्ररक्षकांनी या लढतीत तब्बल पाच झेल सोडले. २०१९ नंतरही ट्वेन्टी-२० मधील हे भारताचे सर्वांत खराब क्षेत्ररक्षण राहिले. यापूर्वी पुणे येथे २०२३ मध्ये झालेल्या सामन्यात भारताने चार झेल सोडले होते. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात निराशा केली. बुमराने चार षटकांत ४५ धावा दिल्या. बुमराने तीन षटके ही ‘पॅावर-प्ले’मध्ये टाकली. त्यामध्ये त्याने तब्बल ३४ धावा दिल्या.
पाकिस्तानी खेळाडूंकडून गैरवर्तन?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामने म्हटले की वाद-विवाद आलेच, पण सध्या मैदानाबाहेरील परिस्थिती पाहता दोन्ही संघांमधील वातावरण अधिक तणावाचे आहे. आशिया चषकातील दोन्ही सामन्यांत भारताचा कर्णधार आणि संघानेही पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. तसेच, ‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानचे काही खेळाडू आक्रमक होताना दिसले. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलच्या चेंडूवर षटकार मारताना त्याने अर्धशतक साजरे केले. त्यावेळी त्याने बॅटला बंदुकीप्रमाणे धरत गोळ्या झाडण्याची कृती केली. त्याच्या या कृतीवर टीकाही झाली. आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा आणि शाहीन शाह आफ्रिदीमध्ये द्वंद्व पाहायला मिळाले. यानंतर गिलने शाहीनच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याला सुनावले. पाचव्या षटकात गिलने हारिस रौफला चौकार मारल्यानंतर तो आक्रमक झाला. गिल, अभिषेक आणि हारिस यांच्यात वाद झाला. अखेर पंचांनी मध्यस्थी करून त्यांना एकमेकांपासून दूर केले.