भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी रशियाला पसंती दिली जाते. मुख्य म्हणजे, रशिया विद्यापीठांतील पदव्यांना आशिया, युरोपसह सर्वत्र मान्यता आहे. परंतु, रशियातून भारतीय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशियाच्या बश्कीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या सुमारे २०० भारतीय विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती यांसारखी कारणे देत, हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाचे सांगणे आहे.
मात्र, विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात हकालपट्टी करणे हे आर्थिक लोभामुळे केले जात असल्याचाआरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. नेमके हे प्रकरण काय? विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्याचे कारण काय? याचा त्यांच्या करिअरवर काय परिणाम होणार? भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाची निवड का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
प्रकरण काय?
- ९ जून रोजी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या सूचनेत असे म्हटले आहे, “शैक्षणिक कार्यक्रमात प्रामाणिकपणे प्रभुत्व मिळविण्याची आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे विदेशी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.”
- त्यात पाच वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील २३४ नावे विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे, त्यातील बहुतांश विद्यार्थी भारतीय आहेत.
- ऑल फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स असोसिएशन (एएफए) ने ‘एक्स’वर लिहिले आहे की, कॉलेज भारतीय विद्यार्थ्यांना विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना जाणूनबुजून काढून टाकत आहे, कारण त्यांना माहित आहे की राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते इतर विद्यापीठांमध्ये स्थानांतरित होऊ शकत नाहीत.

महाराष्ट्रातील मूळचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी शनिवारी (५ जुलै) रात्री विमानाने भारतात परतला. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले , “मी आता भारतात परततो आहे कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. विद्यापीठाने त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त १००० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आणि आता किरकोळ कारणांमुळे ते आम्हाला काढून टाकत आहे.” विद्यार्थ्याने पुढे म्हटले, “आम्हाला आता पहिल्या वर्षापासून प्रवेश घेण्यास सांगितले जात आहे. आम्ही आधीच लाखो रुपये खर्च केले आहेत आणि त्यामुळे आता आम्ही मागे वळू शकत नाही. आम्हाला पुन्हा लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि तीन वर्षे वाया घालवावी लागतील.” एनएमसीने भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण आणि इंटर्नशिप जिथून सुरुवात केली त्याच विदेशी संस्थेत पूर्ण करावे, असा आदेश दिला आहे. विद्यार्थ्याने सांगितले की, विद्यापीठ गैरफायदा घेण्यासाठी भारतीयांना लक्ष्य करते”
विद्यार्थ्यांची अचानक हकालपट्टी
एका विद्यार्थ्याने सांगितले की, कमी उपस्थितीमुळे त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, त्याने हेदेखील स्पष्ट केले की, कुटुंबातील काही अडचणींमुळे तो भारतात परतत असल्याची पूर्वकल्पना त्याने आधीच विद्यापीठाला दिली होती. ‘द हिंदू’ने यासंदर्भात डीन आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. रशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या कार्यालयीन प्रमुख अंबिका यांना पाठवलेल्या संदेशांनाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. याच स्वरूपाच्या एका हकालपट्टीच्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, काही विद्यार्थ्यांनी बायोकेमिस्ट्री या विषयातील शैक्षणिक कर्ज पूर्ण केले नाही. महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, मला स्वतःहून हकालपट्टीच्या सूचनेवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि जर मी तसे केले नाही तर परतण्याचा पर्यायही माझ्याकडे राहणार नाही अशी धमकी देण्यात आली.”
रशियातील वैद्यकीय शिक्षणावर लाखोंचा खर्च
रशियात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने सांगितले, “युक्रेन-रशिया युद्धानंतर सल्लागारांनी रशियन विद्यापीठांची शिफारस करण्यास सुरुवात केली. आम्ही आमच्या मुलांना मोठ्या आशेने कर्ज घेऊन पाठवले आहे. बरेच जण आता परत येत आहेत आणि त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडून देत आहेत. हा त्यांच्यावर अन्याय्य आहे.” पालक म्हणाले की, कुटुंबाने आधीच २५ लाख खर्च केले आहेत आणि जर त्यांच्या मुलीला पुन्हा प्रवेश घ्यावा लागला तर त्यांना आणखी १५ लाख खर्च येईल.
विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांचा वार्षिक खर्च सुमारे चार लाख आहे. हा खर्च भारतातील खाजगी विद्यापीठांपेक्षा कमी आहे आणि म्हणूनच ते वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाचा पर्याय निवडतात. ‘द हिंदू’शी बोललेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, सल्लागार आणि एजंटांनी या विद्यापीठाची शिफारस केली. या प्रकरणासंदर्भात विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे आणि भारत सरकारला अनेक ईमेल लिहिले आहेत, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पाठवलेल्या एका ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, विद्यापीठे त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देतात आणि नंतर विविध कारणे देऊन त्यांना काढून टाकतात.
त्यात असेही म्हटले आहे की, इंग्रजीमध्ये शिकवण्याचे आश्वासन देणारी विद्यापीठे तिसऱ्या वर्षानंतर रशियन भाषेत बदल करतात, त्यामुळे विदेशी विद्यार्थ्यांच्या अडचणी आणखी वाढतात. रशियातील भारतीय दूतावासाने जूनमध्ये विद्यापीठाला भेट दिली होती आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांबरोबरचे फोटोदेखील शेअर केले होते. परंतु, विद्यार्थ्यांनी आरोप केला होता की अधिकाऱ्यांसमोरही त्यांना काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती.
रशिया भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतीचे ठिकाण का आहे?
‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना, मारी स्टेट युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू प्रोफेसर पेट्रोवा इरिना यांनी स्पष्ट केले की , शियन विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेशावर कोणतीही मर्यादा नाही. अनेक पाश्चात्य देशांमधील प्रतिबंधात्मक इमिग्रेशन धोरणे आणि प्रवेश मर्यादा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम करत आहेत. पेट्रोवा इरिना म्हणाल्या, “रशियन फेडरेशन सर्वांना स्वीकारण्यासाठी आणि त्यांना चांगल्या शिक्षणाची हमी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.” परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) आकडेवारीनुसार, रशियामधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २०२२ मध्ये १९,७८४ होती, जी २०२३ मध्ये २३,५०३ आणि २०२४ मध्ये ३१,४४४ झाली आहे. त्यातून वैद्यकीय शिक्षणातील वाढ दिसून येते.
भारतीय विद्यार्थ्यांची रशियाला पसंती देण्याचे कारण विचारले असता पेट्रोवा इरिना म्हणाल्या, “पहिला पैलू म्हणजे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन राजनैतिक संबंध.” त्यांनी नमूद केले की पहिला भारतीय विद्यार्थी १९४८ मध्ये रशियात आला होता आणि त्यानंतर पहिला वैद्यकीय विद्यार्थी १९६८ मध्ये आला होता. भू-राजकीय किंवा राजकीय अशांततेमुळे रशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कधीही व्यत्यय आला नाही. त्यामुळे कुटुंब शिक्षणासाठी रशियाची निवड करण्यास प्राधान्य देतात.
दुसरे म्हणजे परवडणारे शिक्षण. भारतात खाजगी वैद्यकीय शिक्षणाची किंमत तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर रशियन विद्यापीठांमध्ये संपूर्ण सहा वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाची किंमत १८ लाख ते ४५ लाख रुपयांच्या दरम्यान असते. हे एक प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त, अनेक रशियन विद्यापीठांनी त्यांच्या पायाभूत सुविधा विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल केल्या आहेत. पेट्रोवा इरिना म्हणाल्या, “भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. पालकांच्या गरजेनुसार मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहेत.” भारतीय वैद्यकीय मेस, विशेष सुरक्षा प्रोटोकॉल, त्यामध्ये २४ तास सीसीटीव्हीची देखरेख आणि पोलिसांची गस्त यांचा समावेश आहे, यासारख्या सुविधांमुळे भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबिय रशियाला प्राधान्य देतात.