रशियातील कॅलिनिनग्राड येथील बंदरात बांधलेली गुप्त तंत्रज्ञानयुक्त (स्टेल्थ) बहुद्देशीय आयएनएस तमाल युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. लवकरच ती पश्चिम विभागाअंतर्गत अरबी समुद्रात तैनात केली जाईल. परदेशात निर्मिलेली ही शेवटची युद्धनौका असेल. कारण, युद्धनौका बांधणीत देशांतर्गत विस्तारलेली क्षमता परकीय अवलंबित्व संपुष्टात आणणारी ठरणार आहे.
आयएनएस तमाल काय आहे?
समुद्रातील एक भक्कम तरंगता किल्ला असे नौदलाने आयएनएस तमालचे वर्णन केले आहे. तलवार वर्गातील ती आठवी युद्धनौका असून क्रिव्हाक – तीन श्रेणीतील युद्धनौकेची सुधारित आवृत्ती आहे. रशियाने ११३५.६ प्रकल्पाचा भाग म्हणून भारतीय नौदलासाठी ती बांधली. १२५ मीटर लांब आणि ३९०० टन वजनाच्या युद्धनौकेत भारतीय आणि रशियन तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालण्यात आली. ताशी ३० सागरी मैल कमाल वेगात ती मार्गक्रमण करते. दीर्घकाळ गस्त घालण्याची तिची क्षमता आहे. या युद्धनौकेवर २६ अधिकारी आणि २५० खलाशांचा ताफा कार्यरत होईल.
बहुद्देशीय कशी?
नौदल युद्धानमध्ये हवा, पृष्ठभागावर, पाण्याखाली आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक या चारही आयामांतील कारवाईत आयएनएस तमाल सक्षम आहे. खोल समुद्रात (ब्लू वॉटर) ती प्रभावी ठरेल. ७० किलोमीटरपर्यंत पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारे शील आणि कमी पल्ल्याच्या इग्ला या दोन विमानविरोधी क्षेपणास्त्रांनी ती सुसज्ज आहे. जवळून येणारी विमाने व क्षेपणास्त्रांना नौकेवरील दोन स्वयंचलित तोफांनी रोखता येते. त्या प्रतिमिनिट पाच हजारपेक्षा अधिक गोळ्या डागू शकतात. युद्धनौकेची जहाज विरोधी आणि जमिनीवरील हल्ल्याची क्षमता ब्राम्होस क्षेपणास्त्राभोवती केंद्रित आहे. या आठ क्षेपणास्त्रांमुळे तिला शेकडो किलोमीटरवर वेगवान हल्ल्याचे सामर्थ्य लाभते. १०० मिमी ए – १९० ई ही मुख्य तोफ २० किलोमीटरहून अधिकवर तोफगोळे डागू शकते. पाणबुडीविरोधी कारवाईसाठी तमालमध्ये एका वेळी १२ रॉकेट्सचा मारा करणारे लाँचर आहे. ती शक्तिशाली पाणतीर डागण्यास सक्षम आहे. तिच्यात स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, संवेदक बसविण्यात आले आहेत. आधुनिक संवाद आणि डेटा लिंक प्रणाली, दिशादर्शन उपकरणे आदी महत्त्वाची सुविधा संचलनात्मक क्षमतेत भर घालतात. महत्त्वाचे म्हणजे पाणबुडी विरोधी कारवाई आणि हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे कामोव्ह हेलिकॉप्टर तिच्यात सामावतात. ज्यामुळे नौदलाच्या शक्तीचा गुणाकार होतो.
एकसमान क्षमतांशी सुसंगता
आयएनएस तमालच्या नव्या रचनेमुळे सुधारित गुप्त तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये आणि अधिक स्थिरता प्राप्त झाल्याचे नौदलाने आधीच म्हटलेले आहे. आण्विक, जैविक व रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षणासाठी स्वयंचलित प्रणालींनी ती सुसज्ज आहे. यात नुकसान नियंत्रक आणि अग्निशमनचा समावेश होतो. या प्रणाली जीवितहानी कमी करून युद्धनौका सुरक्षित राखतात. आणि लढाऊ क्षमता, प्रभाव वाढविण्यास सहाय्यभूत ठरतात, याकडे लक्ष वेधले जाते. तमाल ही तुशिल श्रेणीतील दुसरी नौका आहे. तलवार आणि तेंग या प्रत्येकी तीन नौकांच्या श्रेणी होत्या. या व्यापक करारांतर्गत देशात तंत्रज्ञान हस्तांतरण व रशियाच्या मदतीसह त्रिपूट श्रेणीच्या दोन युद्धनौका बांधल्या जात आहेत. या नौकांच्या मालिकेतील समाप्तीपर्यंत भारतीय नौदलाकडे एकसमान क्षमतांशी सुसंगत चार वेगवेगळ्या श्रेणीतील एकूण १० युद्धनौका असतील. ज्यात उपकरणे, शस्त्रास्त्र व संवेदक प्रणालींची समानता असेल.
स्वदेशीकरणाकडे मार्गक्रमण…
‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या अनुषंगाने परदेशातून प्राप्त होणारी आयएनएस तमाल ही शेवटची युद्धनौका असेल. यामागे मागील काही दशकांत देशांतर्गत जहाज बांधणीत साधलेली प्रगती कारक ठरली. तमालमध्येही स्वदेशी सामग्रीचा हिस्सा २६ टक्क्यांपर्यंत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताकडे स्वत:चे जहाज बांधण्याचे ज्ञान नव्हते. ती क्षमता विकसित होण्यासाठी आवश्यक संसांधनेही नव्हती. परिणामी, ब्रिटन आणि पूर्वीच्या सोव्हिएत रशियाकडून (यूएसएसआर) युद्धनौका, पाणबुड्या खरेदी करणे क्रमप्राप्त ठरले. १९६० च्या दशकात ब्रिटनच्या सहकार्याने माझगाव गोदीत लिएंडर – वर्गीय युद्धनौकांची बांधणी सुरू झाली. तेव्हा बरीचशी सामग्री परदेशातून आणलेली होती. पुढील दशकात या युद्धनौकांमध्ये १५ टक्के स्वदेशी सामग्रीचा अंतर्भाव झाला. हळूहळू स्वदेशी सामग्रीचा हिस्सा वाढत गेला. नौदलाच्या जवळपास सर्वच युद्धनौकांची आता देशांतर्गत बांधणी होते. ज्यामध्ये ७५ टक्क्यांहून जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर केला जातो. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील शिपयार्ड नौदलासाठी जहाज बांधणी करतात. भारतीय नौदलाची जहाज बांधणी क्षमता सातत्याने विस्तारली आहे.
परिवर्तन
भारतीय नौदल सुरुवातीपासून स्वदेशी युद्धनौका बांधण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी १९६४ मध्ये मध्यवर्ती रचना कार्यालयाची स्थापना झाली. कामाची व्याप्ती वाढल्याने कालांतराने हे कार्यालय नौदल रचना संचलनालयात परिवर्तित झाले. त्यांच्याकडून विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकांच्या रचनेवर काम झाले. पुढे नौदल मुख्यालयात स्वदेशीकरण संचलनालय स्थापन झाले. मुंबई आणि विशाखापट्टणम येथे स्वदेशी विकास क्षेत्राची निर्मिती झाली. भारतीय नौदल इतिहास प्रकल्पाच्या नव्या खंडात ‘परिवर्तनाचे दशक, भारतीय नौदल २०११-२१’ या शीर्षकांतर्गत भारतीय जहाज बांधणी क्षमतेच्या घटनाक्रमावर प्रकाशझोत टाकला आहे. त्यानुसार २००१-११ या काळात नौदलाच्या ताफ्यात ५७ हजार आणि ३३ हजार टन वजनाच्या युद्धनौका समाविष्ट झाल्या. २०११-२१ पर्यंत ती संख्या ९२ हजार टन आणि ४० युद्धनौकांवर गेली. या काळात बहुसंख्य म्हणजे ३९ पैकी ३३ नौका भारतीय बंदरात बांधल्या गेल्या. मागणी नोंंदविलेल्या ३९ पैकी ३६ युद्धनौका भारतात बांधल्या जात आहेत. आगामी काळात नऊ ते १० युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जाते.