महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवात तर चांगली केली होती. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या संघांच्या आव्हानाचा कठीण पेपर सोडवताना त्यांना अपयश आले. चांगली धावसंख्या रचूनदेखील भारतीय गोलंदाज या धावसंख्येचा बचाव करू शकले नाहीत. आता भारताला आगामी सामन्यांमध्ये न्यूझीलंड, इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध खेळायचे आहे. भारताला हे अपयश नेमके कशामुळे आले, त्यामध्ये काय सुधारणा अपेक्षित आहे, याचा घेतलेला हा आढावा

महिला क्रिकेट संघाच्या अपयशाची कारणे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ परिपूर्ण समजला जात होता. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, अशा चांगल्या फलंदाज, अमनजोत कौर, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, श्री चारणी, क्रांति गौड, रेणुका सिंह ठाकूर अशा भरवशाच्या गोलंदाज संघात होत्या. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून सुरुवात चांगली केली होती. पण, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशा तगड्या संघांसमोर भारतीय महिलांना चांगली धावसंख्या उभारूनदेखील एकत्रित सांघिक कामगिरीच्या अभावामुळे पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ सामना अखेरपर्यंत घेऊन जातो आणि चुरस निर्माण करतो. मात्र, विजय त्यांच्या पदरी पडत नाही. आगामी सामने भारतासाठी महत्त्वाचे असून, त्यांना आपल्या चुका सुधारून कामगिरी उंचवावी लागेल.

अपयशाला फलंदाज किती जबाबदार?

भारतीय महिला संघाच्या लागोपाठच्या दोन पराभवाला फलंदाजीतील सातत्याच्या अभावाला निश्चितपणे जबाबदार धरता येईल. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध भारताने विजय मिळविले असले, तरी त्या दोन्ही सामन्यांत भारताच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आले होते. मनधाना, प्रतिका, हरमनप्रीत, जेमिमा यांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. दोन्ही सामन्यात तळातील फलंदाजांनी केलेल्या निर्णायक खेळीमुळे भारताचे आव्हान उभे राहिले होते. श्रीलंकेविरुद्ध अमनजोत, दिप्ती या सहाव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाज खेळल्या, तर पाकिस्तानविरुद्ध हरलीन देओल, रिचा घोष चमकल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रिचाने एकहाती डाव सांभाळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडीची फळी खेळली. पण, तळातील फलंदाज सातत्य राखू शकले नाहीत. या सामन्यात भारतीय संघ ४ बाद २९४ अशा भक्कम स्थितीत होता. मात्र, अवघ्या ३६ धावांत त्यांचे सहा फलंदाज माघारी परतल्याने भारताला ३३० धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

गोलंदाजांची कामगिरी 

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दीप्तीची फिरकी यशस्वी ठरल्यामुळे भारताला २६८ धावांचा बचाव करता आला. पाकिस्तानविरुद्ध क्रांति गौडच्या मध्यमगती माऱ्यामुळे भारताला २४० धावांचा बचाव करत आला. या दोन्ही सामन्यांत अन्य फिरकी गोलंदाजांनी आपली बाजू सांभाळली. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५१ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ३३० धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी कच खाल्ली. नेहमीप्रमाणे पाकिस्तानविरुद्धच्या मानसिक दबावाचा सामना यशस्वीपणे करणाऱ्या भारतीय गोलंदाज या दोन्ही सामन्यांत आपल्या दिशा आणि टप्प्यावर नियंत्रण राखू शकल्या नाहीत. दोन्ही सामन्यात क्रांती गौडची षटके निर्णायक ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने ५९, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७३ धावा तिने खर्ची घातल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिरकी गोलंदाज स्नेह राणाने ८३, तर अमनजोत आणि दीप्ती या दोघींनी पन्नासहून अधिक धावा दिल्या. गोलंदाजांना आलेले हे अपयश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवास कारणीभूत ठरते.

प्रमुख खेळाडूंचे अपयश किती निर्णायक?

विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार विजय मिळविले होते. स्मृती मनधाना आणि प्रतिका रावल या दोघींची फलंदाजी निर्णायक ठरली होती. पण, नेमक्या विश्वचषक स्पर्धेत मनधाना आपली लय गमावून बसली, प्रतिकाला आपली आक्रमकता दाखवता आली नाही. या सलामीच्या जोडीकडून भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. अर्थात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोघींनी ही कसर भरुन काढली. मात्र, कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा यांना अद्याप आपला खेळ दाखवता आलेला नाही. भारतीय महिला संघासाठी या दोघींचे अपयश निश्चितपणे डोकेदुखी ठरली आहे.

नियोजनात भारतीय संघ कमी पडला?

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवडताना भारताने फलंदाजी भक्कम करताना पाच प्रमुख फलंदाजांचा समावेश केला होता. गोलंदाजही निवडताना त्यांनी फलंदाजी करू शकतील अशा खेळाडूंचीच निवड केली होती. मात्र, यात पर्यायांचा विचार करताना भारतीय महिला संघ व्यवस्थापन कुठे तरी कमी पडले. आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टप्प्यात क्रांती गौडचा वापर करण्याचे धाडस महागात पडले. ऑस्ट्रेलियाविरुद्धदेखील तेच घडले. क्रांती सुरुवातीपासून अपयशी ठरली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ पाचच गोलंदाजांचा वापर करण्याचा निर्णय समजण्या पलिकडचा होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरमनप्रीतने स्वतः गोलंदाजी घेतली. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहाव्या गोलंदाजांचा विचार केलाच गेला नाही. रेणुका सिंह ठाकूरला संघात स्थान न देण्याचा निर्णय भुवया उंचावणारा ठरला.

उपांत्य फेरीच्या आशा किती?

भारताने स्पर्धेतील श्रीलंका आणि पाकिस्तानचे सोपे आव्हान सहज पार केले. पण, नंतरच्या प्रमुख चार संघांपैकी पहिल्या दोन दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघ अडखळला. दोन सामने जिंकल्यावर उर्वरित पाच सामन्यांपैकी भारताला तीन सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र, आता दोन सामने गमाविल्यामुळे भारतीय महिला संघाचा मार्ग खडतर झाला आहे. भारतीय संघ चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवानंतर अजूनही तिसऱ्या स्थानावर आहे. आता भारतीय महिला संघासमोर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांचे आव्हान असेल. निव्वळ धावगतीचा भारताला फायदा असला, तरी आता पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. त्याचवेळी अन्य संघांच्या निर्णयावर भारताला अवलंबून रहावे लागण्याची शक्यता दिसत आहे.