Rajani Pandit India’s First Woman Detective: लपून-छपून केलेला एखाद्या गुन्हेगाराचा पाठलाग, डोळ्यावर काळा गॉगल, अंगावर कोट… कुठल्याही रहस्य कथेतील वाटावे असे हे दृश्य. पण, इथे घडणारी ही कथा काही काल्पनिक नाही, हे रोज घडतंय. साहजिकच ही कथा एका गुप्तहेराची आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल. परंतु, या कथेतील गुप्तहेर साधासुधा नाही. तर ही कथा भारताच्या आधुनिक इतिहासातील पहिल्या स्त्री गुप्तहेराची आहे. रजनी पंडित हे नाव आपल्यापैकी अनेकजण ऐकून असतील. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी अनेक गुपितं उलगडली आहेत, अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे, अनेकांची विखुरलेली आयुष्य सावरलेली आहेत. कधी कुठल्याशा एका हॉटेलमध्ये एखाद्या नवऱ्याची बेवफाई पकडण्यापासून ते कॉर्पोरेट घोटाळे उघड करण्यापर्यंत… एखादी चित्तथरारक कादंबरी वाचावी, असं त्याचं आयुष्य.
अलीकडेच त्यांनी अभिनेत्री छवी मित्तल यांच्या पॉडकास्टवर मुलाखत दिली. त्या सांगतात, “ज्या दिवसापासून मी हा पेशा निवडला आहे, त्या दिवसापासूनच मृत्यू माझ्यासोबत आहे.”
कॉलेजमधील साधी मुलगी ते अंडरकव्हर गुप्तहेर
रजनींचा गुप्तहेरी क्षेत्राकडे जाणारा प्रवास कॉलेजमध्येच सुरू झाला. साहजिकच त्यावेळी त्या गुप्तहेर नव्हत्या. त्यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील महाराष्ट्र पोलिसांत गुप्तचर विभागात काम करीत होते, त्यामुळे तपास आणि गुप्त माहिती गोळा करण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. परंतु, त्यांनी कॉलेजमध्ये असताना लोकांचा बारकाईने अभ्यास आणि निरीक्षण करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला मित्र-मैत्रिणींच्या वैयक्तिक समस्या सोडवायला मदत केली. चालू घडामोडी लक्षात घेऊन तर्कशुद्ध सल्ले द्यायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळाने त्यांना आणखी गंभीर समस्यांसाठी… जस की, हरवलेली माणसं शोधणं, गुप्त पाळत ठेवणं, रहस्यमय तपास करणं यासाठी बोलावलं जाऊ लागलं. त्यावेळी त्यांना जाणवलं की, एखाद्या गोष्टीचा शोध घेणं, सत्य उलगडणं ही वृत्ती त्यांच्यात उपजतच आहे. त्यांनी लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करून, मित्रांच्या समस्या सोडवून आपला प्रवास सुरू केला आणि पुढे हेच त्यांचं करिअर ठरलं.
लग्न का नाही केलं?
लग्न का नाही केलं? असा प्रश्न विचारल्यावर त्या हसून उत्तर देतात. “मला जोडीदार पाहण्यासाठी वेळच मिळाला नाही. मी कॉलेजमध्ये असल्यापासून काम करतेय. आजही मी निवांत बसून टीव्ही पाहू शकत नाही; फोन कधीच थांबतच नाही.”
फक्त गुप्तहेर नाहीत… एक समुपदेशकदेखील!
रजनी पंडित केवळ गुप्तहेर नाहीत; त्या अर्ध्या गुप्तहेर, अर्ध्या समुपदेशक आणि अर्ध्या समाज कार्यकर्ता आहेत. त्या विभक्त झालेल्या मुलांच्या प्रकरणांबाबत, व्यसनाधीन तरुणांबाबत आणि निराश झालेल्या पालकांबाबत बोलत असतात. या विषयी सांगताना त्या एका मुलाचं उदाहरण देतात. एका मुलाला अजिबातच इंजिनियर व्हायचं नव्हतं. परंतु, त्याच्या पालकांनी त्याला बळजबरीने शिक्षण घेण्यास भाग पाडले. “त्याचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. त्यामुळे त्याने स्मोकिंग करायला सुरुवात केली. त्याचे पालक खूपच त्रस्त झाले होते,”. अखेर दीर्घ समुपदेशन आणि वास्तव समजावून सांगितल्यानंतर त्या मुलानं आपलं आयुष्य बदलून टाकलं. पुढे त्या सांगतात, आजच्या काळात संधींची अनेक दारं खुली आहेत. मग, मुलांना यशाचा एकचं मार्ग का दाखवायचा?
राजकारणातील गुप्तहेरगिरी
त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे आणि काम सतत सुरू असतं. मुख्यतः कुटुंबं, संशयित जोडीदार, कॉर्पोरेट कंपन्या आणि अगदी राजकारणीसुद्धा त्यांच्या कामाचा भाग आहेत. “आजकाल तर मिठी मारणं, हात हातात घेणं या सामान्य गोष्टी झाल्या आहेत. कोर्टात शारीरिक संबंध सिद्ध करणं अवघड असतं,” त्या स्पष्ट करतात. त्यामुळे अनेकदा हॉटेलला वारंवार भेटी, गुप्त रेकॉर्डिंग्ज, आणि सोशल मीडियावरच्या पुराव्यांच्या धाग्यांवरून कायदेशीररित्या ग्राह्य धरता येईल असा पुरावा तयार केला जातो. त्या निवडणुकांच्या वेळी राजकारण्यांनाही मदत करतात. विरोधकांविषयी गुप्त माहिती गोळा करणं किंवा जनतेचा कल कुठे आहे, याचा शोध घेणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. “तुम्ही जिंकणार आहात की नाही, लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत, हे सगळं कळून येतं,” असं त्या स्पष्ट सांगतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
त्या तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. “अर्धा तपास सोशल मीडियावरच होतो,” त्या मान्य करतात. इतर तपासासाठी “टेडी बेअर्समध्ये लपवलेले स्पाय कॅमेरे, पेन, बटणं… अगदी टेबलाखाली लपवलेले मायक्रोफोनसुद्धा उपयोगी पडतात” असं त्या सांगतात. एका प्रकरणात त्यांनी बनावट वस्तूंचा मोठा गोरखधंदा उघड केला. त्या प्रकरणात नकली ब्रँडेड वस्तूंचा बाजारात पूर आला होता. दुकानदारांपासून ते वितरकांपर्यंत बनावट वस्तूंचा पुरवठा साखळीचा माग काढून त्यांनी कंपन्यांना तातडीची गुप्त माहिती मिळवून दिली.
पुस्तकाविषयीचा कायदेशीर संघर्ष
पण त्यांचा प्रवास नेहमीच सोपा नव्हता. रजनी आपल्या पुस्तकाविषयीचा कायदेशीर संघर्ष सांगतात. त्यांच्याच पुस्तकाच्या नकली प्रती त्यांच्या नकळत बाजारात विकल्या जात होत्या. हजारो डुप्लिकेट प्रती त्यांच्या नावाने विकल्या जात असल्याचं त्यांनी शोधलं. जेव्हा त्यांनी दोषींना न्यायालयात खेचलं, तेव्हा त्यांना धमक्या, दडपशाही, आणि अगदी कोर्टातच नियोजित हल्ल्याचाही सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही. कायदेशीर मार्गाने लढा जिंकला आणि विजय मिळवला.
गुप्तहेरगिरीतील मानवी बाजू
त्यांचं काम गुप्त कारस्थानं आणि रहस्यमय तंत्रांनी भरलेलं असलं तरी रजनी कधीच आपण माणूस आहोत हे विसरत नाहीत. मग तो बंडखोर तरुण असो किंवा खोटं बोलणारा पती… सत्याचा परिणाम किती खोलवर होऊ शकतो याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच “प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगावीच असं नसतं, ते ठरवावं लागतं,” त्या स्पष्ट करतात. “ती एक जबाबदारी असते.” त्यांना अनेकदा गुंतागुंतीच्या वास्तवाला सामोरं जावं लागतं. तरी इतरांना मदत करण्यात, त्यांच्या आयुष्यात खरा बदल घडवण्यातच त्यांना समाधान मिळतं. अनेक प्रकरणांत त्यांनी पोलिसांनाही शांतपणे आणि अनौपचारिक मदत केली आहे
यामुळेच यात अजिबातच आश्चर्य नाही की, अनेक चित्रपट निर्माते त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या अनुभवांवर आधारित एका वेब सिरीजसाठीची चर्चादेखील सुरू आहे.
“तुमचं पात्र मी करू का?” होस्ट छवीने हसत विचारलं. त्यावर रजनी स्मितहास्य करत म्हणाल्या, “अभिनयात करू शकतेस, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात डिटेक्टिव्ह होणं कठीण आहे!