Iran Attack on Qatar US Air Base : इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना अमेरिकेनं त्यात उडी घेतली. शनिवारी अमेरिकन लष्कराच्या विमानांनी हवाई हल्ले करून तेहरानमधील आण्विक केंद्रांना लक्ष्य केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. विशेष म्हणजे इराणकडून संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आधीच सतर्क झाली होती आणि सर्व लष्करी तळांवर अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू करण्यात आले होते. तरीही अमेरिकन लष्कराला न जुमानता, इराणनं त्यांच्या तळांवर एकापाठोपाठ एक अशी सहा क्षेपणास्त्रं डागली. दरम्यान, इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचं किती नुकसान झालं? कतारमधील हा लष्करी तळ किती मोठा आहे? तो इतका महत्त्वाचा का मानला जातो? त्याबाबत जाणून घेऊ…

अमेरिकेचे लष्करी तळ संपूर्ण पश्चिम आशियात पसरलेले आहेत. कतार, बहारीन, इराक, इस्रायल, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, सौदी अरेबिया, सीरिया व संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांमध्ये अमेरिकेने लष्करी तळे उभारलेली आहे. इराणने कतारमधील लष्करी तळाला लक्ष्य केल्यानंतर त्यांचे आणि अमेरिकेचे संबंध आणखीच तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या जगभरातील अनेक देशांचे लक्ष्य या युद्धजन्य परिस्थितीकडे केंद्रित झाले असून, आंतरराष्ट्रीय समुदाय आता पुढील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे.

कतारमधील अमेरिकेचा लष्करी तळ किती मोठा आहे?

  • कतारमधील अमेरिकेचा अल उदैद एअर बेस हा पश्चिम आशियामधील सर्वांत मोठा लष्करी तळ आहे.
  • कतारची राजधानी दोहापासून सुमारे ३० किमी दक्षिण पश्चिमेला वाळवंटी भागात हा लष्करी तळ उभारण्यात आला आहे.
  • २००३ पासून या तळाला अमेरिकेच्या संपूर्ण पश्चिम आशियातील हवाई मोहिमांचे प्रमुख केंद्र मानले जाते.
  • एक काळ असा होता की, या तळावर सुमारे १० हजार अमेरिकी सैनिक तैनात होते; परंतु, २०२२ पर्यंत हा आकडा आठ हजारवर आला आहे.
  • अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी कारवायांमध्ये हा तळ अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आला आहे.
  • अमेरिकेने ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबान आणि अल-कायदावर हवाई मोहिमा राबविण्यासाठी या तळाचा वापर सुरू केला.
  • इराक, अफगाणिस्तान, सीरिया आदी देशांमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांसाठी अमेरिकन लष्कराच्या विमानांनी या तळावरूनच उड्डाणं केली होती.
  • ड्रोन ऑपरेशन्स, रडार सिस्टीम्स आणि हवाई इंधन भरणारी विमानं यांसाठी अमेरिकेचा हा तळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
  • कतारमध्ये असलेला हा तळ उभारण्यासाठी अमेरिकेला सुमारे आठ अब्ज डॉलर्सचा खर्च आल्याचं सांगितलं जातं.

आणखी वाचा : इराणने जमिनीखाली नेमकं काय लपवलंय? अमेरिकेची धडपड नेमकी कशासाठी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती भेट

विशेष बाब म्हणजे मागील २० वर्षांत अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी अल उदैद तळाला भेट दिलेली नव्हती. मात्र, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात या तळाला भेट देऊन तेथे पाहणी केली. दरम्यान, इराणवरील संभाव्य अमेरिकन हल्ल्यांपूर्वी या तळावरील अनेक हवाई वाहने, ड्रोन्स व जेट विमाने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली होती. १८ जून रोजी घेतलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये या तळावर फारशी विमाने नसल्याचे दिसून येत होते. म्हणजेच इराण अल उदैद तळाला लक्ष्य करणार याची कुणकुण अमेरिकेला आधीच लागली होती.

Iran Attack on Qatar US Air Base (PTI Photo)
इराणनं कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर एकापाठोपाठ एक अशी सहा क्षेपणास्त्रे डागल्याचं समोर आलं आहे. (छायाचित्र पीटीआय)

कतार लष्करी तळावर अमेरिकेने काय ठेवले होते?

गेल्या अनेक वर्षांत अमेरिकन लष्करी कमांडरांनी इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धादरम्यान ‘अल उदैद’ तळावरून अनेक महत्त्वाच्या मोहिमा राबविल्या आहेत. याच तळावरून सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले करण्यात आले होते. ‘दी न्यू यॉर्क टाइम्स’च्या माहितीनुसार, अमेरिकन हवाई दलानं या तळावर लढाऊ विमानं, बॉम्बर्स, ड्रोन, मालवाहू विमानं आणि इंधन भरणारी टँकर्स विमानं ठेवलेली होती. २०२१ मध्ये अमेरिकन लष्करानं जेव्हा अफगाणिस्तानमधून माघार घेतली, तेव्हा अल उदैद तळ हा हजारो अफगाण नागरिक व अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे केंद्र ठरला होता.

इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचं किती नुकसान झालं?

दरम्यान, इराणनं कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर एकापाठोपाठ एक अशी सहा क्षेपणास्त्रे डागल्याचं समोर आलं आहे. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेच्या अल उदैद’ लष्करी तळाचं मोठे नुकसान झाल्याचा दावा इराणी लष्करानं केला आहे. इराणी सशस्त्र दलांनी एका निवेदनात म्हटलं की, पवित्र संहिता किंवा अब्दुल्लाह अल-हुसेन असलेल्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरनं कतारमधील हवाई तळावर विनाशकारी आणि शक्तिशाली क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला. हा तळ अमेरिकेच्या हवाई दलाचं मुख्यालय असून, ती पश्चिम आशियाई प्रदेशातील त्यांची सर्वांत मोठी सामरिक संपत्ती होती. दुसरीकडे अमेरिकेनं मात्र इराणी लष्कराचा हा दावा फेटाळून लावला आहे. आम्हाला या हल्ल्याची कल्पना होती आणि त्यामुळे धोक्याची सूचना मिळाल्यानंतर अल-उदैद तळावर हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली होती, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी; कोण आहेत ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’चे मास्टरमाइंड जनरल डॅन केन?

इस्रायल व इराण यांच्यात युद्धविराम झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी असा दावा केला की, इस्रायल आणि इराण यांच्यात तीन अटींवर युद्धविराम झाला असून, दोन्ही देशांनी सैन्य, लष्करी कारवाया थांबविण्यास सहमती दर्शवली आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्यानं रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलनं शस्त्रसंधीला होकार दिला आहे. मात्र अट अशी आहे की, इराणनं पुढील हल्ले करू नयेत. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणदरम्यान थेट चर्चा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. दुसरीकडे इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास यांनी असं म्हटलं की, सध्याच्या घडीला कोणत्याही युद्धविरामाचे किंवा लष्करी कारवाया थांबवण्याचे ‘करार’ झालेले नाहीत. परंतु, जर इस्रायलने तेहरानवरील हल्ले थांबविले, तर इराणसुद्धा प्रतिहल्ले करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युद्धात इस्रायल-इराणचे किती नुकसान?

तेहरान स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजल्यानंतर इस्रायली हवाई हल्ल्यांचे कोणतेही नवीन वृत्त आलेले नाही. त्याआधी मात्र, तेहरान आणि इतर शहरांवर जोरदार बॉम्बहल्ले झाले होते. अमेरिकेच्या ‘Human Rights Activists’ या संस्थेच्या माहितीनुसार, इराणनं केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून, एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर, इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील अंदाजे ९७४ नागरिक ठार झाले आहेत. त्याशिवाय तीन हजार ४५८ लोक जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.