What are sleeper cells and why is the US on high alert: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष युद्धपातळीवर पोहोचला. अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने अमेरिकेत गुप्तपणे सक्रिय असलेल्या ‘स्लीपर सेल्स’ला सक्रीय करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळेच अमेरिकेत ‘हाय अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यांमुळे अमेरिका थेट इस्रायलच्या इराणविरोधी युद्धात सहभागी झाली. शनिवारी रात्री झालेल्या या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या युरेनियम समृद्धीकरण कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाच्या फोर्डो, नातांझ आणि इस्फहान येथील केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. इस्रायलने या महिन्याच्या सुरुवातीM इराणविरोधात हल्ले सुरू केले होते.
इराणने यापूर्वीच इशारा दिला होता की, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, तर ते अमेरिकेत गुप्तपणे सक्रीय असलेल्या ‘स्लीपर सेल्स’ना (छुपी गनिमी हल्ला पथकं) सक्रिय करू शकतात. ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कॅनडामधील जी ७ शिखर संमेलनादरम्यान हा इशारा एका मध्यस्थामार्फत थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. त्यानंतर अमेरिकेतील एफबीआय (FBI) आणि होमलँड या प्रमुख सुरक्षा यंत्रणांनी इराणशी संबंधित हिसाबुल्लासारख्या संघटनांवर काटेकोर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे.
स्लीपर सेल म्हणजे काय? (छुपी गनिमी हल्ला पथक) (What are sleeper cells?)
स्लीपर सेल म्हणजेच छुपी गनिमी हल्ला पथकं हे एक गुप्त जाळं असतं. ही पथकं छुप्या कारवायांसाठी ओळखली जातात. या पथकात सहभागी असणारे दुसऱ्या देशात त्या देशातील नागरिकांप्रमाणे सामान्य जीवन व्यतीत करतात. सामान्य नागरिकांप्रमाणेच नोकऱ्या करतात, कोणतेही संशयास्पद वर्तन टाळतात. परंतु, संबंधित यंत्रणेकडून आदेश आल्यानंतर सक्रिय होतात. हल्ले, विध्वंसक कारवाया किंवा गुप्तहेरगिरीसारख्या धोकादायक कृत्यांमध्ये सहभागी होतात. अशा प्रकारची पथकं बाळगणाऱ्या देशांमध्ये इस्लामिक देशांचा मोठा वाटा आहे.
अमेरिकेचे माजी होमलँड सुरक्षा सल्लागार मायकेल बालबोनी यांनी ‘Fox News’ ला सांगितले की, इराणकडे असणारे स्लीपर्स सेल हे अत्यंत कार्यकुशल आहेत. परंतु, त्याही पेक्षा मोठी चिंता अशी की, अमेरिकेत किती स्लीपर्स सेल आहेत याची अजूनही कल्पना नाही.
Fox News ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसचे बॉर्डर प्रमुख टॉम होमन यांनी सांगितले की, माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात सुमारे १,२०० इराणी नागरिकांनी अमेरिकेत प्रवेश केल्याची नोंद आहे. यामुळे परदेशी दहशतवादी संघटनांशी संबंधित स्लीपर सेल्स अमेरिकेत सक्रिय होण्याची भीती अधिक आहे. होमन यांनी ही माहिती ‘संडे मॉर्निंग फ्युचर्स’ या कार्यक्रमात मारिया बार्टिरोमो यांच्याशी बोलताना दिली. त्यांनी परदेशी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आगमनामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या धोक्यांकडे लक्ष वेधले.
परंतु, अमेरिकन अधिकाऱ्यांना हिझबुल्लाशी संबंधित स्लीपर सेल्सबद्दल अधिक चिंता वाटत आहे. कारण या गटाला इराणकडून पाठिंबा मिळतो. एफबीआयने अलीकडील हल्ल्यांपूर्वीच हिझबुल्लाशी संबंधित संशयित एजंट्सवर लक्ष ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
सध्याचा धोका
इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर नॅशनल टेररिझम अॅडव्हायजरी सिस्टीमने धोकादायक घटना घडू शकतात, असे संकेत दिले आहे. किंबहुना इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. सध्या कोणतीही ठोस कटकारस्थानाची माहिती मिळालेली नसली तरी हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, असे अमेरिकन गुप्तचर संस्थांचा गोपनीय अहवाल सांगतो..
एफबीआयचे माजी सहसंचालक ख्रिस स्वेकर यांनी Fox News ला सांगितले की, गेल्या काही वर्षांतील सीमाव्यवस्थेतील त्रुटींमुळे ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. “ हजारो इराणी नागरिकांपैकी कोण कुठे आहे आणि कितीजण सीमारेषा पार करून आत आले असतील, याचा अंदाजही आपल्याला नाही,” असे ते म्हणाले.
स्वेकर यांचे मत आहे की, या व्यक्तींची नीट पारख न करता, अधिकाऱ्यांनी महत्त्वाची गुप्त माहिती मिळवण्याची संधी गमावली आहे. त्यांनी सांगितले की, “आपण त्यांची चौकशी करून आणि नीट पारख करून माहिती मिळवण्याची संधी गमावली. आपण त्यांना फक्त सोडून दिलं.” स्वेकर यांच्या मते, हे सर्व बायडन प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षामुळे घडले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ (Operation Rising Lion) मोहीम सुरू केल्यानंतर अमेरिकेत दहशतवादी संघटनांवर ठेवण्यात येणारी पाळत अधिक तीव्र करण्यात आली, असे अहवालात नमूद आहे. २०२० साली इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणकडून काहीतरी कारवाई करण्यात येईल या भीतीने अमेरिकेने तेव्हापासूनच सुरक्षा कडक केली होती.
ही वाढलेली सतर्कता इराणी गुप्त एजंट्सबद्दल दीर्घ काळापासून असलेल्या चिंतेतून उद्भवली आहे, विशेषतः २०२० मध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यूनंतर, चिंतेत वाढ झाली आहे. या घटनेनंतर एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी विभागाने संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी आपल्या संसाधनांमध्ये मोठी वाढ केली. त्याचप्रमाणे, अमेरिकेतून कार्यरत असलेल्या अनेक व्यक्तींवर डोनाल्ड ट्रम्प आणि माजी सल्लागार जॉन बोल्टन यांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत.
इराण, इस्रायल आणि अमेरिका
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार हवाई हल्ले हे इराणच्या फोर्डो, नातांझ आणि इस्फहान या अणुऊर्जा केंद्रांवर करण्यात आले होते. ही ठिकाणं इराणच्या युरेनियम समृद्धीकरण क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. इस्रायलने १३ जूनपासून इराणच्या लष्करी आणि अण्वस्त्र प्रकल्पांवर आक्रमण सुरू केले होते.
इराणने या हल्ल्यांचा उल्लेख ‘क्षमा करता येणार नाही असे हल्ले’ असा केला आहे आणि त्याचा प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञाही घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी Fox Business ला दिलेल्या मुलाखतीत इराणला इशारा दिला की, “अमेरिकेवर हल्ला करणे ही त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक ठरेल,”. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी सांगितले की, इस्रायल “इराणची अणू आणि क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.”
स्लीपर सेल्स: भूतकाळ आणि संभाव्य वापर
स्लीपर सेल्स ही अमेरिकन सुरक्षाव्यवस्थांसाठी दीर्घकाळापासून चिंता निर्माण करणारी बाब आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर, गुप्तपणे हिंसक कट रचणाऱ्या गटांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आपले प्रयत्न वाढवले. ९/११ चे अपहरणकर्ते दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्य करणारे स्लीपर एजंट नव्हते, तरी हा हल्ला गोपनीय कटाचा धोका अधोरेखित करतो. परदेशात स्लीपर सेल्सचा वापर करून हल्ले किंवा हत्या करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असल्याचा आरोप इराणवर याआधीही झाला आहे. मायकेल बालबोनी यांनी Fox News ला सांगितले की, स्लीपर सेल्स व्यक्तींना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य करु शकतात आणि म्हणूनच त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवणे, अतिशय महत्त्वाचे आहे.