संपूर्ण देशाला हवाई संरक्षण कवच देण्यात अतिशय सक्षम म्हणून नावलौकीक प्राप्त केलेल्या इस्रायलच्या अत्याधुनिक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीला (आयर्न डोम) इराणच्या युद्ध कौशल्याने काहीसा धक्का बसला. इराणच्या रणनीतीने या प्रणालींना गोंधळात टाकले आणि त्या परस्परांना लक्ष्य करू लागल्याचे सांगितले जाते. यामुळे इस्रायलमधील शहरे इराणी क्षेपणास्त्रांची लक्ष्य ठरली. तरीदेखील या प्रणालीचे महत्त्व मात्र कमी होत नाही.
इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरचे दावे
इस्रायल-इराण संघर्षात इराणची भिस्त मुख्यत्वे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांवर आहे. रात्री इस्रायलचे आकाश इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या लाटेने उजळून निघते. सोमवारच्या शक्तिशाली क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने (आयआरजीसी) घेतली. नव्या रणनीतीने इस्रायली बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली विस्कळीत करण्यात आली. त्यांना युक्तीने चुकीच्या पद्धतीने काम करण्यास भाग पाडले गेले. ज्यामुळे त्या एकमेकांना लक्ष्य करीत होत्या, असा दावा आयआरजीसीकडून केला जातो. यामुळे इराणी क्षेपणास्त्रे इस्रायलच्या प्रणालींना मागे टाकून काही ठिकाणी परिणामकारक हल्ले चढवू शकली. उत्तरेकडील हैफा, तेल शुद्धीकरण कारखाना परिसर, पेटाह टीका, ब्नेई ब्राक या ठिकाणी जीवितहानी झाली. तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र पडल्याच्या चित्रफिती समोर आल्या. दाट लोकवस्तीच्या परिसरात इमारती उद्ध्वस्त झाल्या. जेरुसलेममध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. इराणी क्षेपणास्त्रांनी काही अंशी का होईना इस्रायलच्या हवाई संरक्षक प्रणालीला भगदाड पाडल्याचे अधोरेखीत झाले.
हवाई संरक्षण प्रणालीचे कार्य
इस्रायलची क्षेपणास्त्ररोधक बचाव प्रणाली बहुस्तरीय काम करते. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी ‘द ॲरो’, मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे ‘डेव्हिड्स स्लिंग’ तर, कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी ‘आयर्न डोम’ या यंत्रणांचा वापर केला जातो. इस्रायलच्या भूमीवर हल्ला करण्यासाठी येणाऱ्या क्षेपणास्त्रांची ओळख पटवून ते मार्गात नष्ट करणारी ही प्रणाली आहे. ती रडार, येणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट्सचे विश्लेषण करण्यासाठी संगणक आणि हल्ला रोखण्यासाठी क्षेपणास्त्रे (इंटरसेप्टर) अशा तीन स्तरांत विभागलेली आहे. क्षेपणास्त्र डागण्याच्या व्यवस्थेने (लाँचर) सुसज्ज असतात. अवकाशात रडारला काही धोका आढळल्यास माहिती त्वरित युद्ध व्यवस्थापन केंद्रात पाठविली जाते. तिथे विश्लेषण होऊन येणाऱ्या धोक्यांना रोखण्यासाठी फिरती पथके क्षेपणास्त्र डागण्यासाठी सज्ज असतात. ही सर्व प्रक्रिया अल्पावधीत पार पडते. अहोरात्र ही प्रणाली कार्यरत असते. यातील प्रसिद्ध आयर्न डोमची रचना रॉकेट्स, क्षेपणास्त्रांपासून ते ड्रोन व विमानांपर्यंत विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी झालेली आहे.
यशस्विता दर
संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने बहुतांशी धोके रोखल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सेसकडून (आयडीएफ) सांगितले जाते. या तीनही यंत्रणेतील क्षेपणास्त्र इंटरसेप्टर आहेत. म्हणजे त्यांची रचना हल्ले करण्यावर आधारित नाही. तर येणाऱ्या क्षेपणास्त्रांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी शोधून नष्ट करण्यावर आधारित आहे. याचा विचार करता येणाऱ्या प्रत्येक क्षेपणास्त्राला ते निष्क्रिय करण्यासाठी स्वत:चे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आवश्यक ठरते. उदाहरणार्थ जर इराणने १०० क्षेपणास्त्रे डागली तर, इस्रायलला ते थांबविण्यासाठी जवळजवळ १०० इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे डागावी लागतील. इस्रायलने आपल्या हवाई संरक्षण कवचाचा यशस्विता दर ८० ते ९० टक्के राखला असल्याचे सांगितले जाते. जगातील कोणतीही प्रणाली १०० टक्के प्रभावी नाही. त्यामुळे त्रिस्तरीय हवाई संरक्षण प्रणालीस न जुमानता इराणची काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये धडकली. ‘रायझिंग लायन’ मोहीम सुरू झाल्यापासून इस्रायली नौदलाने ३० इराणी ड्रोन पाडले. तर २०० हून अधिक वैमानिकरहित विमानांना (यूएव्ही) परतवून लावले. बहुस्तरीय प्रणालीच्या आधारे नौदलाने १०० टक्के इंटरसेपन्शन केल्याचा दावा इस्रायल सैन्य दलांकडून होत आहे.
महत्त्व अबाधित राहणार?
इराणमधून इस्रायलवर एक हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करू शकणारी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे हल्ला करू शकतात. या कारणास्तव तो पूर्णत: बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर अवलंबून आहे. या क्षेपणास्त्रांचा सावधानता काळ कमी असल्याने ती इस्रायलसाठी जास्त धोका तयार करतात. इस्रायलने आयर्न डोम प्रणालीत सातत्याने सुधारणा केलेल्या आहेत. ज्यामुळे काही बॅलिस्टिक धोक्यांविरुद्ध त्यांना लक्षणीय क्षमता मिळाल्याचे संरक्षण तज्ज्ञ मानतात. या संघर्षात प्रणालीच्या काही मर्यादा उघड झाल्या तरी आयर्न डोमच्या कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. इराणच्या शेकडो क्षेपणास्त्र हल्ल्यांनी या प्रणालींची कसोटी पाहिली. बहुतांश हवाई धोके त्यांनी निष्क्रिय केले. विशेष म्हणजे नवीन धोक्यांशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता, त्यांच्या रचनेतील कल्पकता अधोरेखीत झाली. कोणतीही एक प्रणाली परिपूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. मात्र, एकात्मिक दृष्टिकोन जोखीम कमी करू शकते, असे इस्रायलचा अनुभव सूचित करतो. आयर्न डोम, ॲरो आणि डेव्हिड्स स्लिंग यांचे एकत्रित कार्य परस्पर समन्वयाची क्षमताही सिद्ध करतात.