scorecardresearch

Premium

विश्लेषण: धर्मवीर २… जीवनपटातून ताकद वाढवण्याची एकनाथ शिंदेंची खेळी?

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शृंखलेतील ‘धर्मवीर २’चा मुहूर्त नुकताच ठाण्यातील कोलशेत भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला शिवसैनिकांनी वर्षभरापूर्वी भरभरून असा प्रतिसाद दिला.

Dharmaveer 2, Anand Dighe, Eknath Shinde, Dharmaveer 2 film announcement,
विश्लेषण: धर्मवीर २… जीवनपटातून ताकद वाढवण्याची एकनाथ शिंदेंची खेळी? ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

जयेश सामंत

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शृंखलेतील ‘धर्मवीर २’चा मुहूर्त नुकताच ठाण्यातील कोलशेत भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाला शिवसैनिकांनी वर्षभरापूर्वी भरभरून असा प्रतिसाद दिला. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा चित्तथरारक घटनाक्रम ‘दिघेसाहेब’ या नावात असलेल्या ताकदीची खरे तर साक्ष देणारा. त्यामुळे ठाणेच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी एक दंतकथा बनून राहिलेल्या ठाण्याच्या या ‘धर्मवीर’ची कथा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. त्यामुळे ‘धर्मवीर-२’ नेमका कसा असेल, याची पटकथा काय याविषयीची उत्सुकता मुहूर्तालाच ताणली गेली असली, तरी यानिमित्ताने दिघे यांचे शिष्योत्तम असलेले एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यानंतरचा घटनाक्रम आणि त्यांचे नेतृत्व रुजविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची चर्चाच अधिक रंगली आहे.

tejashwi yadav janvishvas yatra
दहा दिवस अन् ३३ जिल्हे! NDA ला रोखण्यासाठी RJD ची ‘जनविश्वास यात्रा’; तेजस्वी यादव यांना यश येणार का?
Shiv Sena statewide convention begins in Kolhapur in the presence of the Chief Minister
शिवसेनेच्या महाअधिवेशनात मोदी-शहांच्या अभिनंदनाचे ठराव; कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ
hoarding against bjp mla ganpat gaikwad in kalyan east
कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन
hemant soren
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार? सोरेन यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; रांचीमध्ये जमले झारखंडचे मंत्रिमंडळ

‘धर्मवीर’ची निर्मिती व्यापक राजकीय रणनीतीचा भाग होता?

राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग अस्तित्वात येत असताना अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी भलताच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूत्रे हाती घेत अजितदादांचे बंड मोडून काढले खरे, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आमदारांना स्वगृही आणताना एकनाथ शिंदे यांनी बजावलेल्या भूमिकेची त्या वेळी तितकीशी चर्चा झाली नाही. भाजपचा पहारा मोडून काढत मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील पंचतारांकित हॉटेलांमधून राष्ट्रवादीच्या आमदारांना थोरल्या पवारांच्या पायाशी आणण्यात शिंदे यांची ‘टीम ठाणे’ ही तितकीच कार्यरत होती. आपल्या साहेबांनी बजाविलेल्या या ‘कामगिरी’चे फळ त्यांना मिळेल आणि नव्या सरकारमध्ये त्यांना पहिल्या क्रमांकाचे पद मिळेल हे शिंदे समर्थकांचे स्वप्न मात्र काही दिवसांतच भंगले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चर्चेत असूनही उपमुख्यमंत्रीपदापासून आपण डावलले गेलो याचे शल्य शिंदे यांच्या मनात फार खोलवर होते असे त्यांचे समर्थक सांगतात. महाविकास आघाडी सरकारचा नवा प्रयोग होत असताना मेहनतीची तयारी असूनही केवळ दोन-चार माजी मुख्यमंत्र्यांना आपल्या हाताखाली काम करावे लागू नये म्हणून पुन्हा डावलले जाणे हे शिंदेंच्या फारसे पचनी पडले नव्हते असेही सांगितले जाते. त्यामुळे करोनाकाळ मागे पडताच शिंदे समर्थकांनी ज्या वेगाने आणि कुशलतेने आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटाची आखणी केली त्यावरून हा त्यांच्या भविष्यातील व्यापक राजकीय रणनीतीचा भाग होता का, अशी चर्चा होण्यास निश्चितच वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा- इराणच्या नौदलात आधुनिक डेलमन युद्धनौका, इस्रायलची चिंता वाढणार?

मुहूर्तालाच भविष्यातील राजकीय मांडणी?

‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त होत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केलेली पाहायला मिळाली. ‘धर्मवीर’चा पहिला भाग काही लोकांना खटकला. काही जण चित्रपट बघता बघता उठून गेले. काही दृश्ये त्यांना आवडली नसावीत. आता कुणालाही काही आवडो ना आवडो, आता आपल्याला खरे ते दाखविण्याचे सर्वाधिकार आहेत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. हे करत असताना ‘धर्मवीर २’च्या निमित्ताने आनंद दिघे यांचा ‘खराखुरा’ इतिहास आता सांगितला जाईल हे ठसविण्याचा प्रयत्नही त्यांनी अप्रत्यक्षपणे केला. मुख्यमंत्र्यांचे भाषण पूर्ण होत नाही तोच त्यांचे कडवे समर्थक माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना ‘उद्धव ठाकरे यांनी दिघेसाहेबांचा नेहमीच दुःस्वास केला’ असे वक्तव्य केले. तसेच दिघेसाहेबांना टाडा लागला तोच मुळी संजय राऊत यांच्यामुळे असेही ते म्हणाले. चित्रपटाच्या मुहूर्तालाच शिंदे गटाकडून केली गेलेली ही राजकीय मांडणी लक्षवेधी ठरली.

निवडणुकांच्या वर्षात ‘धर्मवीर २’ शिंदेंसाठी किती महत्त्वाचा?

पुढील वर्ष हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे सुरू असले तरी संघटनात्मक पातळीवर त्यांच्या पक्षाचा नेमका किती प्रभाव या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर उभा राहिला याविषयी अजूनही पुरेशी स्पष्टता नाही. भाजपच्या पाठिंब्यावर मिळालेल्या मुख्यमंत्रीपदावर शिंदे यांची मांड हळूहळू बसत आहे असे दिसत असतानाच मध्यंतरी अजित पवारांचे बंड झाले आणि राष्ट्रवादीतील एक मोठा गट मंत्रिमंडळात सहभागी झाला. यामुळे शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या एका मोठ्या गटाचे मंत्रीपद मिळविण्याचे स्वप्न काही पूर्ण झालेले नाही. शिवाय शिवसेनेचा परंपरागत आणि मातोश्रीशी अजूनही निष्ठा राखून असणारा मुंबई, ठाण्यातील मतदार नेमकी कोणती भूमिका घेतो हेही येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांसाठी आणि त्यातही ठाणे जिल्ह्यातील जुन्या-नव्या शिवसैनिकांसाठी नेहमीच आदरस्थानी राहिलेले आनंद दिघे यांचे आपणच शिष्योत्तम हे ठसविण्याचा आणखी एक प्रयत्न ‘धर्मवीर २’च्या निमित्ताने केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा- विश्लेषण: संत्री आयात शुल्काच्या प्रतिपूर्तीने काय साध्य होणार?

प्रखर हिंदुत्वाच्या आखणीचा प्रयत्न?

राज्यात १९९२ मध्ये ज्या जातीय दंगली झाल्या त्यानंतरच्या काळात आनंद दिघे यांचे प्रखर हिंदुत्ववादी असणे हा त्यांच्या समर्थकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला. तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असणे आणि सर्वसामान्य ठाणेकरांच्या प्रश्नावर धावून जाणारा एक नेता ते प्रखर हिंदुत्वासाठी आग्रही असणारे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून दिघे हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्येही लोकप्रिय राहिले. ‘धर्मवीर २’ची निर्मिती करत असताना शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ ही टॅगलाइन निश्चित केली आहे. दिघे यांचे मलंगगडावरील आंदोलन, दहिसर मोरी भागातील एका प्रार्थनास्थळाविरोधात त्यांनी दिलेला लढा, ठाण्यात असूनही राबोडी, भिवंडीसारख्या भागांवर त्यांचा असलेला ‘वचक’ हा हिंदुत्ववाद्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या त्यांनी केलेल्या ठाण्यातील प्रयोगांनाही अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला होता. नव्या चित्रपटात साहेबांची ही ‘गोष्ट’ अधोरेखित करताना एकनाथ शिंदे यांच्याही हिंदुत्वाची नव्याने उजळणी केली जाईल का याविषयी उत्सुकता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is dharmaveer 2 anand dighes shishyottam eknath shindes life story print exp mrj

First published on: 30-11-2023 at 08:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×