Mohammad Saeed Izadi killed : गेल्या आठवडाभरापासून पश्चिम आशियाई देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आता विकोपाला गेला आहे. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इस्रायलकडून इराणवर सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. त्यांच्या या हल्ल्याला इराणकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. इस्रायलने १३ जून रोजी केलेल्या तेहरानवर केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसेन सलामी यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेहरानसाठी ही जखम ताजी असतानाच इस्रायलने पुन्हा हवाई हल्ला करून इराणी लष्करातील वरिष्ठ कमांडर मोहम्मद सईद इजादी यांना ठार केलं आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासला शस्त्रे देणाऱ्या इराणी कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे. दरम्यान, कोण होते सईद इजादी? त्यांनी हमासला कशी मदत केली होती? ते जाणून घेऊ…

इराणबरोबरच्या संघर्षाआधी इस्रायल आणि हमास यांच्यात लष्करी कारवाया झाल्या होत्या. गाझा पट्टीत झालेल्या हवाई हल्ल्याचा सूड म्हणून हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यात जवळपास १२०० लोकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलबरोबरच्या संघर्षात हमासला इराणी कमांडर मोहम्मद सईद इजादी यांनी शस्त्रांची मदत केली होती, असा दावा त्यावेळी इस्रायली लष्कराने केला. आता इराणबरोबरच्या संघर्षात या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने इराणी कमांडर सईद इजादी यांना लक्ष्य करून ठार मारलं आहे.

कोण होते इराणचे कमांडर सईद इजादी?

  • मोहम्मद सईद इजादी हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरचे (IRGC) वरिष्ठ कमांडर होते.
  • हमासमधील नेत्यांच्या आणि तेथील दहशतवादी संघटनांच्या ते नेहमीच संपर्कात असायचे.
  • ‘The Dispatch’च्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलविरोधातील अनेक भडकावणाऱ्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता.
  • इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत डॅनी डॅनॉन यांनी इजादी यांच्यावर हमास आणि हिजबुल यांच्यात मैत्री घडवून आणल्याचा आरोप केला होता.
  • इस्रायली गुप्तचर व दहशतवाद माहिती केंद्राच्या (ITIC) अहवालानुसार, इजादी यांनी इराणमधून लेबनॉनमार्गे हमासला शस्त्रे पुरवली होती.
  • सईद इजादी यांनी गाझा पट्टी व पॅलेस्टिनी संघटनांना आर्थिक मदत आणि लष्करी प्रशिक्षण दिले होते.
  • सीरियातील बशर अल-असद सरकार आणि हमास यांच्यातील संबंध सुधारण्यामागेही इजादी यांचा हात होता.
  • २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र आणि युनायटेड किंगडमने सईद इजादी यांच्यावर निर्बंध लादले होते.
  • ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलच्या ज्या शहरांवर हल्ला केला, त्यासाठी इजादी यांनीच शस्त्रे पुरवली होती.

आणखी वाचा : Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी एवढे आग्रही का?

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी काय सांगितलं?

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सईद इजादी यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, “मोहम्मद इजादी यांनी ७ ऑक्टोबरच्या नरसंहाराच्या आधी हमासला निधी व शस्त्रास्त्रे पुरवली होती. त्यांचा खात्मा झालेल्या त्यावेळी हमासच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इस्रायलमधील नागरिकांना आता खरा न्याय मिळाला आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणा आणि वायुदलासाठी ही एक मोठी कामगिरी आहे. इस्रायबरोबर शत्रूत्व घेणाऱ्यांना जमिनीत गाडल्याशिवाय आणि राहणार नाही.”

Israel killed Saeed Izadi (PTI Photo)
इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासला शस्त्रे देणाऱ्या इराणी कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे. (छायाचित्र पीटीआय)

इराणी अधिकाऱ्यांनी दिली चौघांच्या मृत्यूची कबुली

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने खोर्रमाबाद येथे झालेल्या हल्ल्यांत आपल्या पाच सदस्यांच्या मृत्यूची कबुली दिली आहे. मात्र सईद इजादी यांच्या मृत्यूचा उल्लेख त्यांनी केलेला नाही, अशी माहिती रॉयटर्सने इराणी माध्यमांच्या हवाल्याने दिली. दरम्यान, इराणच्या क्रूम प्रांतातील गव्हर्नर कार्यालयाने एका चार मजली अपार्टमेंटवर हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. दुसरीकडे स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरच्या शस्त्रविभागाचे प्रमुख बेहनाम शहरीयारी यांनाही ठार केल्याचा दावा केला आहे. बेहनाम हे एका गाडीतून प्रवास करीत असताना त्यांना आम्ही लक्ष्य करून ठार मारलं, असं इस्रायली सैन्याने म्हटलं आहे.

हेही वाचा : कोब्रासह विषारी सापांची होणार गणना? सरकारच्या या निर्णयामागचं कारण काय?

इराणचे लष्करप्रमुख हुसेन सलामी कोण होते?

याआधी इस्रायलने १३ जून रोजी तेहरानच्या आण्विक केंद्रांवर व लष्करी तळांवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसेन सलामी यांचा मृत्यू झाला होता. सलामी हे ‘इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोअर’चे प्रमुख म्हणून काम पाहत होते. इराण-इराक युद्ध (१९८०-८८) दरम्यान त्यांनी विविध लष्करी पदांवर काम केले होते. युद्धातील अनुभवामुळे त्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली होती. हुसेन सलामी यांनी आयआरजीसीच्या एअरोस्पेस विभागातही महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे त्यांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याचे नेतृत्व केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ मध्ये हुसेन सलामी यांची इस्लामिक रिवोल्युशनरी गार्ड कोअरचे प्रमुख (कमांडर-इन-चीफ) नियुक्ती करण्यात आली, त्यांनी मोहम्मद अली जाफरी यांची जागा घेतली होती. हुसेन सलामी हे इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि अपारंपरिक युद्धनीतीचे प्रमुख शिल्पकार मानले जात होते. त्यांनी हमास, इराकमधील शिया गट यांसारख्या छुप्या युद्धतंत्राला चालना दिली. अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबियाविरोधात अत्यंत कठोर भूमिकेसाठी सलामी हे प्रसिद्ध होते. त्यांनी अनेकदा इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे समर्थन केले, यामध्ये २०१९ मधील सौदी ऑईल फॅसिलिटीवरील हल्ला आणि जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याचे त्यांचे वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले.
हुसेन सलामी यांच्या मृत्यूने इराणच्या लष्करी दलात नेतृत्वाचा अभाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.