IDF Arabic language course इस्रायलच्या संरक्षण दलाच्या (आयडीएफ) गुप्तचर विभागाने सर्व गुप्तचर सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी अरबी भाषा आणि इस्लामिक अभ्यास करणे अनिवार्य केले आहे. इस्रायल – हमास या संघर्षात इस्रायलला आलेल्या गुप्तचरांबाबतच्या अपयशानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सैनिकांची विश्लेषणात्मक क्षमता वाढवणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. जेरुसलेम पोस्टनुसार, ऑक्टोबर २०२३ च्या सुमारास आलेल्या गुप्तचरांच्या अपयशानंतर आयडीएफने सैनिकांना अरबी भाषा शिकणे आणि इस्लामिक अभ्यास करणे बंधनकारक केले आहे. इस्रायलमधील ‘अमन’चे प्रमुख मेजर जनरल श्लोमी बाइंडर यांच्या नेतृत्वाखाली हे बदल करण्यात आले आहेत. ‘अमन’ इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव आहे. नेमके हे बदल का करण्यात आले? त्याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊयात.

नवीन आदेशात काय म्हटले आहे?

  • नवीन निर्देशानुसार सर्व गुप्तचर सैनिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी एक तर अरबी भाषा शिकणे किंवा इस्लामिक अभ्यास करणे व प्रशिक्षण घेणे आवश्यक असणार आहे.
  • या उपक्रमाचा उद्देश भविष्यातील सैनिकांना अरबी भाषेत पारंगत करणे आणि इस्लामिक संस्कृतीचे सखोल ज्ञान असावे, हे सुनिश्चित करणे आहे.
  • पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ‘अमन’च्या १०० टक्के सैनिकांना इस्लामिक अभ्यासात प्रशिक्षण मिळेल आणि ५० टक्के सैनिकांना अरबी भाषेचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
(छायाचित्र-रॉयटर्स)

इस्लामिक शिक्षणासाठी नवीन विभाग

आर्मी रेडिओचे लष्करी वार्ताहर डोरोन कादोश यांनी अरबी आणि इस्लामिक शिक्षणासाठी समर्पित नवीन विभाग स्थापन करण्याची योजना असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमात हौथी (Houthi) आणि इराकी बोलीभाषांमध्ये विशेष प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. या प्रदेशांमध्ये गुप्तचर विभागाच्या वाढत्या गरजांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ‘आयडीएफ’ने TELEM विभाग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली आहे. हा विभाग इस्रायली मध्यम आणि उच्च शाळांमध्ये अरबी आणि मध्य पूर्वेकडील अभ्यासाच्या प्रसारासाठी होता. आता त्याचा पुनर्आरंभ केला जाणार आहे. हा विभाग सहा वर्षांपूर्वी बजेट कपातीमुळे बंद करण्यात आला होता. परिणामी अरबी भाषा शिकणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली होती.

‘आयडीएफ’चा उद्देश काय?

‘आयडीएफ’चे ध्येय हे आहे की, प्रत्येक ब्रिगेड आणि विभागस्तरीय गुप्तचर अधिकारी अरबी भाषेत निपुण असावा आणि त्यांना इस्लामचे सखोल ज्ञान असावे. हे प्रशिक्षण ‘अमन’च्या प्राथमिक अभ्यासक्रमात समाविष्ट केले जात आहे. त्यात १०० टक्के गुप्तचर सैनिक, ८,२०० युनिटमधील सायबर तज्ज्ञ इस्लामिक अभ्यासात प्रशिक्षण घेतील. तसेच, ५० टक्के अधिकारी अरबी भाषा शिकतील. हा उपक्रम इस्रायली गुप्तचर शिक्षणातील मूलभूत सांस्कृतिक बदलाचा एक भाग असणार आहे.

इस्लामचा अभ्यास अनिवार्य करण्यामागील कारण काय?

गुप्तचर कर्मचाऱ्यांना भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या म्हणजे ‘हौथी’ संवाद समजून घेण्यात अडचण निर्माण होणे. त्यामागील एक कारण म्हणजे येमेन भागात सेवन केल्या जाणाऱ्या ‘खात’ या वनस्पतीचा प्रभाव. ‘खात’चे वारंवार सेवन केल्याने बोली अस्पष्ट होते आणि त्यामुळे संवाद समजणे कठीण होते. जूनमध्ये इस्रायलकडून एका हौथी लष्करप्रमुखाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु, संवाद समजण्यात आलेल्या अडचणीमुळे हा हल्ला अयशस्वी ठरला.

आयडीएफ या आव्हानांना कसे सामोरे जाईल?

या समस्येचे निराकरण करण्यासाठी अमन हौथी आणि इराकी-अरबी बोलींवर लक्ष केंद्रित करणारे नवीन अभ्यासक्रम सुरू करीत आहे. प्रशिक्षण देण्यासाठी संबंधित समुदायांमधील प्रशिक्षकांची भरती करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अमन अधिकाऱ्याने सांगितले, “आतापर्यंत आम्ही संस्कृती, भाषा व इस्लाम या क्षेत्रांत मजबूत नव्हतो आणि आम्हाला सुधारणा करणे आवश्यक आहे. आमचा उद्देश आमच्या गुप्तचर अधिकारी किंवा सैनिकांना अरब नागरिक करणे नाही, तर त्यांना भाषा आणि सांस्कृतिक अभ्यासाद्वारे त्यांच्या कामात आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये अधिक निपुण करणे हा आहे.”

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. हा हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे झाल्याची माहिती समोर आली. हल्ल्याची माहिती त्यांच्याकडे असूनदेखील, त्यांना ती डिकोड करता आली नाही आणि त्यामुळे हा हल्लाही टाळता आला नाही. त्यामुळे इस्रायलची गुप्तचर संस्थेला हे सुनिश्चित करायचे आहे की, त्यांचे सैनिक व अधिकारी अरबी भाषा शिकतील आणि इस्लामचा अभ्यास करतील, जेणेकरून भविष्यात या स्वरूपाच्या चुका टाळता येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हमासचा इस्रायलवर हल्ला

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलवर गेल्या अनेक दशकांतील सर्वांत भीषण हल्ला चढवला. नियोजित पद्धतीने आधी अडीच ते पाच हजार छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि त्यानंतर जमीन, समुद्रमार्गे हमासचे सैनिक इस्रायलमध्ये शिरले. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. २०२३ पासून हा संघर्ष पेटत गेला. त्यानंतर युद्धविराम कराराची घोषणाही झाली; मात्र अजूनही दोन्ही देशांतील संघर्ष संपलेला नाही.