scorecardresearch

Premium

विश्लेषण : जडेजा की अश्विन; की दोघेही? ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम लढतीत कोणाला मिळणार संधी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया…जागतिक क्रिकेटमधील या दोन बलाढ्य संघांमध्ये यंदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत रंगणार आहे.

Who will get a chance in the final fight of WTC?
कुणाला मिळणार संधी?

अन्वय सावंत

भारत आणि ऑस्ट्रेलिया…जागतिक क्रिकेटमधील या दोन बलाढ्य संघांमध्ये यंदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत रंगणार आहे. ही लढत ७ जूनपासून (बुधवार) इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्येच झालेल्या पहिल्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारताने संघनिवड करताना काही प्रश्नांकित निर्णय घेतले होते. यंदा यातून धडा घेत योग्य संघनिवड करण्याचे आणि दुसऱ्या प्रयत्नात ‘डब्ल्यूटीसी’चे जेतेपद मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. या आव्हानासाठी भारतीय संघ कितपत तयार आहे, याचा आढावा.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

भारतीय संघाने सामन्यासाठी कशी तयारी केली आहे?

‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात निवड झालेले खेळाडू (चेतेश्वर पुजारा वगळून) गेले दोन महिने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळण्यात व्यग्र होते. त्यामुळे त्यांना लाल चेंडूवर सराव करण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नाही. भारताने फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. मायदेशात झालेल्या या मालिकेत भारताने २-१ अशी सरशी साधली होती. या मालिकेतील अखेरचा सामना १३ मार्चला संपला होता. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यापूर्वी जवळपास तीन महिने भारताने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. हीच गोष्ट ऑस्ट्रेलियालाही लागू होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचे ठरावीक खेळाडूच ‘आयपीएल’मध्ये सहभागी झाले होते. उर्वरित मार्नस लबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांसारखे खेळाडू इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत होते, तर अन्य खेळाडू मायदेशातच सराव करत होते. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाची तयारी थोडी अधिक आहे.

कौंटी क्रिकेट खेळलेल्या पुजाराची कामगिरी किती महत्त्वाची?

फलंदाजी ही कायमच भारताची जमेची बाजू मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. यंदाच्या (२०२१-२३) ‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांनी १००० धावांचा टप्पा ओलांडला असतानाच भारताच्या एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. भारताकडून पुजाराने ३० डावांत सर्वाधिक ८८७ धावा केल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षीच पुजाराला भारतीय संघातून वगण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांनी त्याचे पुनरागमन झाले. त्यामुळे त्याच्या कामगिरीतही सातत्य नसल्याचे स्पष्ट होते. परंतु, पुजाराने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेच्या गेल्या दोन हंगामांत ससेक्सचे प्रतिनिधित्व करताना चमक दाखवली आहे. त्याने गेल्या हंगामात आठ सामन्यांत पाच शतकांसह १०९४ धावा, तर यंदा सहा सामन्यांत तीन शतके व एका अर्धशतकासह ५४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात त्याची कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरू शकेल.

रोहितची चिंता, तर गिलकडून अपेक्षा?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताच्या डावाची सुरुवात करतील. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये या दोन फलंदाजांची कामगिरी अगदी भिन्न होती. एकीकडे गिलने स्पर्धेत सर्वाधिक ८९० धावा (१७ सामन्यांत) केल्या, तर रोहितला ३३२ धावाच (१६ सामन्यांत) करता आल्या. अहमदाबाद येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यातही गिलने शतक झळकावले होते. त्यामुळे त्याच्याकडून दमदार कामगिरीची भारतीय संघाला अपेक्षा असेल. दुसरीकडे, रोहितच्या कामगिरीची भारताला चिंता असेल. रोहितला ‘आयपीएल’मध्ये धावांसाठी झगडावे लागलेच, शिवाय त्याला नवख्या गोलंदाजांनीही अडचणीत आणले. परंतु, रोहितसारख्या खेळाडूला कमी लेखण्याची चूक ऑस्ट्रेलिया करणार नाही. रोहितने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटीत आव्हानात्मक खेळपट्टीवर शतक साकारले होते. तसेच ओव्हलच्या मैदानावर भारताने २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता, त्यावेळीही रोहितने १२७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला पुन्हा लय सापडेल अशी भारताला आशा असेल.

पुनरागमनवीर रहाणेची कोहलीला साथ मिळणार?

अनुभवी अजिंक्य रहाणेने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आपल्या कामगिरीने आणि खेळण्याच्या शैलीने सर्वांना थक्क केले. संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रहाणेने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना १४ सामन्यांच्या ११ डावांत १७२.४८च्या धावगतीने (स्ट्राईक रेट) ३२६ धावा फटकावल्या. त्यातच श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने जवळपास दीड वर्षांनंतर रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. परदेशात वेगवान गोलंदाजांविरुद्ध यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक फलंदाजीचे तंत्र रहाणेला अवगत आहे. त्याने इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर शतकही झळकावले आहे. गेल्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात अन्य भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना रहाणेने ४९ धावांची खेळी केली होती. आता पुनरागमन करताना पुन्हा छाप पाडण्याचे रहाणेचे लक्ष्य असेल. त्याच्यासह मधल्या फळीत विराट कोहलीवर मोठी जबाबदारी असेल. कोहली पुन्हा सर्वोत्तम लयीत असून यंदा ‘आयपीएल’मध्ये त्याने १४ सामन्यांत दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहली नेहमीच चांगली कामगिरी करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ कसोटीत आठ शतके व पाच अर्धशतकांसह १९७९ धावा त्याच्या नावे आहेत.

पंतच्या अनुपस्थितीत पुन्हा भरतकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी?

गेल्या वर्षी कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यालाही मुकणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये बॉर्डर-गावस्कर करंडकाच्या कसोटी मालिकेत पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतकडे यष्टिरक्षणाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, त्याला चार सामन्यांत १०१ धावाच करता आल्या. त्याच्या फलंदाजी तंत्रातील मर्यादाही स्पष्ट झाल्या. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याला धावा करणे अवघड जाऊ शकेल. तसेच यष्टिरक्षणातही त्याच्याकडून चुका झाल्या. त्याने काही झेल सोडले. मात्र, त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती. त्यामुळे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ भरतवर विश्वास दाखवण्याची दाट शक्यता आहे. भारताकडे इशान किशनचा पर्याय आहे. मात्र, किशनला कसोटी क्रिकेटचा अनुभव नाही. त्यातच त्याच्या फलंदाजी आणि यष्टिरक्षणात काही त्रुटी आहेत. त्यामुळे त्याला संधी देण्यापूर्वीही भारतीय संघाला बराच विचार करावा लागेल.

जडेजा की अश्विन; की दोघेही?

भारताकडे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनच्या रूपात जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत, जे फलंदाजी करण्यातही सक्षम आहेत. मात्र, इंग्लंडमध्ये दोन फिरकीपटूंसह खेळणे धोक्याचे ठरू शकते आणि भारताला गेल्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात याचा अनुभव आला. साउदम्पटन येथे ढगाळ वातावरण (आणि पाऊसही) असतानाही भारताने जडेजा आणि अश्विन या दोघांनाही संघात स्थान दिले. मात्र, दोघांना दोन डावांत मिळून केवळ पाच गडी बाद करता आले. ओव्हलच्या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना अखेरच्या दोन दिवशी मदत मिळू शकेल. मात्र, इंग्लंडमधील हवामान कधीही बदलू शकते. त्यामुळे पाऊस झाल्यास भारतीय संघ अडचणीत सापडू शकेल. जडेजा फलंदाजीत अधिक सरस असल्याने त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. परंतु, दुसऱ्या अष्टपैलूच्या स्थानासाठी अश्विन व शार्दुल ठाकूर यांच्यात स्पर्धा आहे. भारतासाठी हा निर्णय नक्कीच अवघड ठरेल. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, सिराज आणि उमेश यादव सांभाळतील. या गोलंदाजांनी गेल्या पाच-सहा वर्षांत केलेली कामगिरी लक्षात घेता भारताला जेतेपदाची निश्चितच संधी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 12:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×