२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा निष्पाप बळी गेला होता. त्यानंतर ७ मे रोजी भारताने दहशवाद्यांचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्याअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ वेगवेगळ्या दहशतवादी तळांना लक्ष्य करीत, ते उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर भारतीय लष्कराने ज्या तळांवर हल्ले करण्यात आले, तेथे झालेले नुकसान आणि परिस्थितीबाबतच्या उपग्रह प्रतिमा प्रकाशित केल्या. उद्ध्वस्त केलेल्या तळांमध्ये बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळाचाही समावेश होता. असे असताना जवळपास दोन महिन्यांनंतर पुन्हा या ठिकाणी दहशतवादी तोंड वर काढताना दिसत आहेत. या ठिकाणी जामा-ए-मस्जिद सुभान अल्लाह मदरशाच्या काही लोकांनी मदरशातील स्विमिंग पूल पुन्हा सुरू केल्याचे काही फोटोंच्या माध्यमातून आढळले आहे. ऑपरेशन सिंदूनंतर जैशने त्यांच्या मदरशातील हा स्विमिंग पूल काही काळासाठी बंद केला होता. या स्विमिंग पूलमध्ये जैश-ए-मोहम्मदकडून मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात असे.
जैशने दहशतवादी तळ पुन्हा सुरू
द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, बहावलपूरमधील दहशतवादी तळावर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने तिथला मदरसा पुन्हा सुरू केला आहे. येथे सध्या सुमारे ६०० विद्यार्थी येत आहेत. स्विमिंग पूल पुन्हा सुरू केल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना एका वरिष्ठ भारतीय सरकारी अधिकाऱ्याने द प्रिंटला सांगितले, “स्विमिंग पूल पुन्हा सुरू होणं ही लहानशी बाब वाटत असली तरी बहावलपूर परिसरातील मुलांची जैश-ए-मोहम्मद भरती करू शकते. यावरून असा स्पष्ट संकेत मिळतो की दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती असतानाही इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स डायरेक्टोरेटचा दहशतवादी गटांचा कायमचा नायनाट करण्याचा कोणताही हेतू दिसत नाही.”
महत्त्वाची बाब म्हणजे हा तोच स्विमिंग पूल आहे, जो जैशच्या दहशतवाद्यांनी वापरला होता. २०१९ मध्ये पुलवामा येथे सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची योजना आखणारे मोहम्मद उमर फारूख, तल्हा रशीद अल्वी, मोहम्मद इस्माईल अल्वी व रशीद बिल्ला हे याच गटातले चार दहशतवादी होते. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान हुतात्मा झाले होते. काश्मीरला जाण्यापूर्वी या स्विमिंग पूलचा वापर करीत असताना या दहशतवाद्यांनी काही फोटो काढले होते. जैशचे दहशतवादी प्रशिक्षणासाठी या स्विमिंग पूलचा वापर करतात आणि दहशतवादी संघटनेत भरती होण्यापूर्वी त्यांना पोहण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते, अशीही माहिती आहे.
बहावलपूर येथील दहशतवादी तळ पुन्हा सुरू होण्यावरून हा संकेत मिळत आहे की, जैश-ए-मोहम्मद संघटना बंद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भारताविरुद्ध त्यांच्या दहशतवादी कारवाया सुरूच राहतील, अशी परिस्थिती समोर येते आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यानंतर भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढत असताना जैश-ए-मोहम्मदचे नेतृत्व भारताविरुद्ध आवाज उठवू लागले आणि हल्ल्याचा बदला घेण्याची मानसिकता असल्याचेही बोलले जात आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरने त्याच्या भाषणांची ऑडिओ रेकॉर्डिंग्स जारी केली आहेत. त्यामध्ये भारतातील अयोध्या राम मंदिर उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतल्याचे वृत्त आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंत्यसंस्कारासाठी याच संघटनेने निधी दिल्याचाही दावा केला जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरच्या काळात याच दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर जिहादाचा प्रचार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा गौरव करणे आणि व्हॉट्सअॅप तसेच टेलिग्रामद्वारे उघडपणे तरुणांची दहशतवादी म्हणून भरती करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय फेसबुक पेजवर त्यांचा प्रमुख मसूद अझहरची प्रक्षोभक भाषणे आणि बहावलपूरमध्ये रिमेम्बरन्स रॅलीची होर्डिंग्जही दिसू लागली आहेत.
ठळक मुद्दे :
- जैश-ए-मोहम्मदने बहावलपूरमध्ये त्यांचे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू केले.
- ऑपरेशन सिंदूरनंतर बहावलपूरमधील स्विमिंग पूल दहशतवाद्यांसाठी पुन्हा उघडण्यात आला.
- जैशच्या दहशतवाद्यांना आणि प्रशिक्षणार्थींना पोहण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी या स्विमिंग पूलमध्ये त्यांचे फोटो काढले होत.
भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवले तेव्हा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले. भारताने लक्ष्य केलेल्या मुख्य ठिकाणांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-५ (कराची-तोरखम महामार्ग)वर स्थित पाकिस्तानच्या बहावलपूरमधील मरकझ सुभान अल्लाह हा तळ होता.

भारताने हे ठिकाण निवडले होते. कारण- येथे असलेला मदरसा जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय म्हणून काम करतो. १५ एकर जमिनीवर असलेला हा तळ २०१५ पासून कार्यरत आहे. भरती, निधी संकलन व प्रशिक्षण यासाठी जैशचे केंद्र म्हणून हे ठिकाण वापरले जाते. इंटेलिजन्सने याबाबत खुलासा केला आहे की, येथे एक मध्यवर्ती मशीद, ६०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी एक मदरसा, एक व्यायामशाळा, एक स्विमिंग पूल आणि तबेले आहेत. याच मदरशात दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. असेही मानले जाते की, मसूद अझहर, मुफ्ती अब्दुल रौफ असगर व मलाना अम्मारसारखे इतर महत्त्वाचे जैश-ए-मोहम्मदचे कार्यकर्तेही येथे राहतात.
२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने जाहीर केले होते की, त्यांनी बहावलपूरमधील मदरशाचा ताबा घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांनी बहावलपूरचे उपायुक्त शोझेब सईद यांनी पत्रकारांना सांगितले की, हा फक्त एक साधारण मदरसा आहे. याचा जैश-ए-मोहम्मद गटाशी काहीही संबंध नाही. “सध्या येथे सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यापैकी कोणीही कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित नाही किंवा कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नाही”, असे द प्रिंटमधील वृत्तात म्हटले आहे. बहावलपूर येथे भारताने केलेल्या हल्ल्यात सर्वांत शक्तिशाली शस्त्रे वापरण्यात आली होती, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
फक्त जैशच नाही, इतरही तळ सक्रिय
बहावलपूरमधील तळ सक्रिय होणे ही काही वेगळी बाब नाही. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने दहशतवादी लाँच पॅड आणि प्रशिक्षण शिबिरे पुन्हा बांधण्यास सुरुवात केली आहे. या पुनर्बांधणीला पाकिस्तानी लष्कर, त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अंतरिम सरकारचा पाठिंबा असल्याचे म्हटले जाते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरील जंगली भागात भारतीय गस्त आणि भविष्यातील हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इस्लामाबादमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे