– अन्वय सावंत

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतून अचानकच माघार घ्यावी लागली. गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या बुमरा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अखेरचा सामना खेळला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर त्याने सरावाला सुरुवात केली होती. त्याला ‘एनसीए’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषितही केले. त्यामुळे त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. परंतु पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी गोलंदाजीचा सराव करताना पाठीला त्रास जाणवल्याची बुमराने तक्रार केली आणि त्याला पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी आणखी थोडा वेळ देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन व ‘एनसीए’च्या वैद्यकीय पथकाने निर्णय घेतला. मात्र, मायदेशात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता बुमराला सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. ही दुखापत चुकीच्या पद्धतीने हाताळली गेली का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

बुमराने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेण्याचे काय कारण सांगण्यात आले?

“बुमरा श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी बुमरा गुवाहाटी येथे भारतीय संघात दाखल होणार होता. मात्र, गोलंदाजीच्या सरावासाठी त्याला आणखी थोडा वेळ आवश्यक आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला एकदिवसीय मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही बुमराच्या तंदुरुस्तीबाबत भाष्य केले. “बुमराने ‘एनसीए’मध्ये खूप मेहनत घेतली आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला होता आणि गोलंदाजीला त्याने सुरुवात केली होती. मात्र, सरावादरम्यान पुन्हा त्याच्या पाठीला त्रास जाणवला. त्याची दुखापत गंभीर नाही, पण त्याने तक्रार केल्यानंतर आम्ही धोका पत्करू शकत नाही,” असे रोहित पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी म्हणाला.

बुमराला कशामुळे दुखापतींचा धोका?

बुमराची गोलंदाजीची शैली ही इतरांपेक्षा वेगळी आहे. तो अगदी सरळ हाताने, फार वरच्या बाजूने चेंडू सोडतो, तसेच चेंडू टाकण्यापूर्वी तो फारसा धावत (रन-अप) नाही आणि चेंडूला गती देण्यासाठी पूर्ण शरीराचा वापर करतो. त्यामुळेच त्याच्या पाठीवर ताण येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ‘‘बुमराची शैली वेगळीच आहे. त्याच्यासारखे गोलंदाज पाठ आणि खांद्याच्या साहाय्याने वेग निर्माण करतात,’’ असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला होता.

बुमराचा दुखापतींचा इतिहास काय?

बुमराला सर्वप्रथम २०१८मध्ये अंगठ्याची दुखापत झाली. त्यानंतर २०१९मध्ये त्याने वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामन्यांत हॅटट्रिकसह १३ बळी मिळवले. मात्र, या दौऱ्यानंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याला मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्याने इंग्लंडमध्ये जाऊन दुखापतीवर उपचार घेतले. त्यानंतर तो बराच काळ तंदुरुस्त राहिला आणि त्याने भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीचे यशस्वीपणे नेतृत्व केले. मात्र, सातत्याने क्रिकेटचे तिन्ही प्रकार आणि ‘आयपीएल’मध्ये खेळल्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याची पाठ पुन्हा दुखावली. त्याला अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेला आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागले.

बुमराला तंदुरुस्त घोषित करण्याची पुन्हा घाई?

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बुमराची पाठ दुखावली. त्यानंतर ‘एनसीए’मध्ये उपचार घेतल्यानंतर बुमराला ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषित केले होते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. तो या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळला. परंतु त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपूर्वीच्या सराव सत्रादरम्यान बुमराची पाठ पुन्हा दुखावली. त्याला ही संपूर्ण मालिका, आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागले. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने त्याला तंदुरुस्त घोषित करण्याची घाई केली का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रश्न ‘एनसीए’च्या वैद्यकीय पथकाबाबत उपस्थित केला जातो आहे. बुमरा गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, तर ‘एनसीए’च्या वैद्यकीय पथकाने त्याच्याबाबत अधिक खबरदारी बाळगणे नक्कीच गरजेचे होते.

हेही वाचा : टीम इंडियाला मोठा धक्का! संघात असूनही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेला जसप्रीत बुमराह मुकणार, बीसीसीआयची चिंता वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमरा कोणत्या मालिकांना मुकण्याची शक्यता?

बुमरा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धच्या प्रत्येकी तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताने ही मालिका जिंकणे गरजेचे आहे. मात्र, बुमरा अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने भारतीय संघ त्याला थेट कसोटी सामन्यात खेळवण्याचा धोका पत्करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यानंतर ‘आयपीएल’साठी त्याच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे. या वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बुमराने पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे यासाठी ‘बीसीसीआय’, भारतीय संघ व्यवस्थापन आणि ‘एनसीए’ प्रयत्नशील असतील.