रिलायन्स जिओने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित जिओकॉइन सादर केले आहे. पण बऱ्याच लोकांमध्ये ते बिटकॉईनसारखे आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सी असल्याचा गैरसमज आहे. त्याबाबत जाणून घेऊया.

जिओकॉइन म्हणजे काय?

रिलायन्स जिओने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित जिओकॉइन सादर केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील मुख्यतः जिओशी संबंधित वस्तू-सेवांच्या खरेदीवर आधारित रिवॉर्ड अर्थात सवलती मिळवण्यासाठी तयार केलेली ही प्रणाली आहे. रिलायन्स जिओने अलीकडेच सादर केलेले जिओकॉइन ही एक नवी संकल्पना आहे, जी ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील आघाडीच्या पॉलीगॉन लॅब्सच्या भागीदारीतून विकसित करण्यात आली आहे. जरी ती रूढार्थाने क्रिप्टोकरन्सी नसली तरी, क्रिप्टो-आधारित बक्षिसे, सवलती देणारी (रिवॉर्ड सिस्टिम) प्रणाली आहे. मात्र मोफत जिओ कॉइन कसे मिळवायचे आणि वापरायचे कसे याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. जिओकॉइन हे इथेरियम लेयर २ तंत्रज्ञानावर तयार केलेले ब्लॉकचेन-आधारित डिजिटल रिवॉर्ड टोकन आहे.

जिओकॉइन क्रिप्टोकरन्सी आहे?

जिओकॉइन क्रिप्टोकरन्सी नाही. यामुळे त्याची खरेदी-विक्री होत नाही. ते व्यापार करण्यायोग्य नाहीत. जिओकॉइन हे देशात आणि परदेशात क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर खरेदी करता येत नाही. शिवाय त्याचे ट्रेडिंगदेखील शक्य नाही. मर्यादित पुरवठा असलेल्या बिटकॉइनच्या विपरीत, जिओकॉइन बॅकएंड तंत्रज्ञान असल्याने त्यांची संख्या अमर्याद असू शकते. जिओकॉइन हे जिओ अॅप वापरकर्त्यांसाठी बाजारपेठेत वापरता येणारी आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सी नाही तर रिवॉर्ड सिस्टिमसारखे काम करते. शिवाय, जिओकॉइन रिलायन्स जिओसाठी त्यांच्या सेवांमध्ये सहभागी होऊन वापरकर्त्यांना बक्षीस देण्याचा एक मार्ग आहे.

जिओकॉइन्स कसे मिळवता येतात?

जिओकॉइन्स मिळवणे सोपे आहे. जिओचे अॅप्स आणि सेवा वापरल्यास हे कॉइन्स मिळतात. हे जिओकॉइन मोफत मिळवता येतात. जिओस्फियर अॅप डाउनलोड कारावे लागते आणि जिओकॉइन्स प्रोग्रामसाठी साइनदेखील करावे लागते. जिओस्फियर हे अॅप अँड्रॉइड, आयओएस, मॅक, विंडोजवरून डाऊनलोड करता येते. आपला मोबाइल नंबर वापरून जिओकॉइन प्रोग्रामसाठी साइन अप करता येते. जिओस्फियर अॅप वापरून एकदा नोंदणी केल्यानंतर, जिओस्फियर अॅप वापरून जिओकॉइन्स मिळवता येतात. थोडक्यात फायरफॉक्स, क्रोम, सफारी या प्रमाणेच हे एक ब्राउझर आहे.

जिओकॉइनची खरेदी-विक्री शक्य आहे का?

जिओकॉईन कोणत्याही मंचावर सूचिबद्ध नाहीत, म्हणजेच पब्लिक एक्सचेंजवर ट्रेड होत नाही. यामुळे याची खरेदी-विक्री शक्य नाही. शिवाय रुपयासोबत त्याचे मूल्य जोडले जाऊ शकत नाही. एका उद्योगअहवालानुसार, एक जिओकॉइनचे मूल्य ४३ रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. पण हे मूल्य अधिकृत नाही. जिओकॉइन खरेदी-विक्रीचा दावा करणारे संकेतस्थळ हे फसवे आहे.

जिओकॉइन भविष्यात क्रिप्टोकरन्सी आणणार?

सध्या भारतात आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना अधिकृत मान्यता नाही. वर्ष २०२४ च्या अखेरीस भारतात सुमारे १.७ कोटी क्रिप्टो गुंतवणूकदार होते. त्याच्या तुलनेत, रिलायन्स जिओकडे ४७.७ कोटींहून अधिक ब्रॉडबँड ग्राहक आहेत. भविष्यात भारतात आभासी चलनाला अधिकृत मान्यता मिळाल्यास या प्रचंड वापरकर्त्यांच्या आधारावर, जिओकॉइनकडे लाखो नवीन वापरकर्त्यांना ब्लॉकचेनच्या जगात आणण्याची क्षमता आहे. यामुळे जिओच्या माध्यमातून रिलायन्स आभासी चलन सादर करण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. मात्र हे वाटते तितके सोपे नाही. कारण, केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने आभासी चलनांच्या वापरासाठी नियमन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भारतात अजूनही आभासी चलनांच्या वापरला परवानगी दिलेली नाहीये.

जिओस्फियर अॅपवरून काय- काय शक्य?

जिओस्फियर ब्राउझरवरून व्हिडिओ, लेख, गेम, संगीत खेळ, माहिती घेता येते. जिओ समूहातील इतर जिओ अॅप्स म्हणजेच मायजिओ, जिओ सिनेमा आणि जिओमार्ट सारख्या इतर लोकप्रिय अॅपमध्ये वापरण्याची योजना आखली आहे, जेणेकरून विविध क्रियाकलापांद्वारे नाणी मिळवणे सोपे होईल.

जिओकॉइन कसे वापरतात?

जिओने अद्याप हे जिओकॉइन कसे रिडीम करायचे हे उघड केलेले नाही. मात्र जिओ मोबाइल आणि ब्रॉडबँड प्लॅन रिचार्ज करण्यासाठी जिओकॉइन रिडीम करता येतात. जिओमार्टवर किराणा खरेदीसाठी, जिओ सेवांवर विशेष सवलती आणि ऑफर मिळवता येतात. शिवाय रिलायन्स जिओ-बीपी पेट्रोल पंपावर देखील जिओकॉईन रिडीम करणे शक्य आहे.

जिओकॉइनकचे वेगळेपण काय आहे?

ब्लॉकचेन-आधारित रिवॉर्ड्स असल्याने सुरक्षित आणि पारदर्शक रिवॉर्ड टोकन सिस्टिम आहे. फक्त जिओ अॅपसह सहभागी होऊन स्वयंचलितपणे जिओकॉइन मिळवता येतात. यामुळे भविष्यात जिओ परिसंस्थेत (इकोसिस्टिम) विविध सेवांसाठी जिओकॉइन्सचा वापर वाढण्याची शक्यता आहे.