हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कठोर शिस्त आणि कार्यकर्ता आधारित आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी २०२१मध्ये सलग दुसऱ्यांदा राज्यात माकपच्या पुढाकाराने असलेल्या डाव्या आघाडीला मोठे यश मिळवून दिले. यात पक्षापेक्षा विजयन यांचाच नेतृत्वाचा मोलाचा वाटा आहे. केरळची धुरा ७७ वर्षीय विजयन हे २०१६पासून सांभाळत आहेत. आजच्या घडीला राज्यात किंवा पक्षात त्यांच्या लोकप्रियतेच्या तोडीचा एकही नेता नाही. ‘सबकुछ पिनराई’ अशीच स्थिती आहे. केरळमधील आघाडीच्या दैनिकाने एक सर्वेक्षण केले त्यात राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण असावा या प्रश्नावर २६.२१ टक्के लोकांनी राज्याचे पर्यटनमंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांच्या बाजूने कौल दिला. हे रियास विजयन यांचे जावई आहेत.

राज्यात निवडणुकांना बराच अवकाश आहे. मे महिन्यात विजयन सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. लगेचच नवा नेता येईल अशातला भाग नाही. मात्र राज्यातील नेतृत्त्वाचा लंबक कुणीकडे झुकत आहे हे त्याचे निदर्शक आहे. रियास यांच्यानंतर १७.७ टक्के नागरिकांनी काँग्रेस आमदार शफी परंबली यांच्यावर मोहोर उमटवली. विरोधी पक्षनेते काँग्रेसचे व्ही.डी. सतीशन ६.७३ टक्के तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांना ३.०४ टक्के कौल होता. ही आकडेवारी पाहता जर आणखी तीन वर्षांनी राज्यात सलग तिसऱ्यांदा डाव्या आघाडीला कौल मिळाला तर विजयन यांचे जावई असलेले मोहम्मद रियास मुख्यमंत्री होणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. विरोधकही घराणेशाहीच्या मुद्द्यावरून माकपला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. अर्थात रियास विद्यार्थी संघटनेतून काम करत पुढे आलेले आहेत.

विश्लेषण : दोन वर्षांच्या वरूण गांधींसह मनेका गांधींनी अर्ध्या रात्री का सोडलं होतं इंदिरा गांधींचं निवासस्थान?

उत्तम संवादक…

४७ वर्षीय मोहम्मद रियास यांनी असा अचानक राजकारणात प्रवेश केलेला नाही. माकपशी निगडित असलेल्या डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. उत्तम संवादक तसेच कुशल संघटक अशी त्यांची ओळख आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रियास यांचा दुसरा विवाह विजयन यांची कन्या वीणा हिच्याशी २०२० मध्ये झाला. रियास यांना पहिल्या विवाहापासून दोन अपत्ये आहेत. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रगल्भ प्रशासक, कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात.

पहिल्याच निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात…

पर्यटन तसेच सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती रियास सध्या भूषवत आहेत. केरळमध्ये पर्यटन व्यवसायाचे महत्त्व पाहता, हे खाते सरकारच्या धोरणात किती महत्त्वाचे हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे रियास यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. कोळीकोड लोकसभा मतदारसंघातील बेपोर या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात स्थान मिळालेले राज्यातील ते एकमेव मंत्री आहेत. पहिल्यांदाच विधानसभेवर विजयी झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. २०१८मध्ये त्यांना माकपच्या राज्य समितीत स्थान देण्यात आले. पुढे त्यांचा राजकीय आलेख चढताच राहिला आहे. अनेक आंदोलनातून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. विजयन यांचे जावई म्हणून त्यांना एक फायदा असला तरी, त्यामागे रियास यांचे पक्षसंघटनेतील कामदेखील आहे हे नाकारता येत नाही.

विश्लेषण: ९ वर्ष शाळा, फक्त १ परीक्षा! केजरीवाल विरुद्ध राज्यपाल वादाचे मूळ असणारा प्रस्ताव नेमका आहे काय?

शैलजा यांची लोकप्रियता कायम…

संभाव्य महिला मुख्यमंत्री म्हणून विचारणा केली असता, माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना ६७ टक्के पसंती मिळाली. शैलजा या माकपच्या आमदार असून, केरळच्या आरोग्यमंत्री म्हणून करोनाकाळात त्यांचे काम उल्लेखनीय ठरले होते. संयुक्त राष्ट्रांतही त्यांचा गौरव झाला होता. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यावरून विजयन यांच्यावर टीका झाली होती. शैलजा यांच्याऐवजी पत्रकार म्हणून कारकीर्द घडविलेल्या वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य खाते सोपविण्यात आले. या सर्वेक्षणात १३.३ टक्के जणांनी वीणा जॉर्ज यांच्या नावे कौल दिला.

व्यक्तिकेंद्रित राजकारणाला बळ?

केरळमध्ये माकपप्रणीत डावी आघाडी विरुद्ध काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी असा पारंपरिक संघर्षाचा इतिहास आहे. दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो. मात्र गेल्या म्हणजेच २०२१मध्ये डाव्या आघाडीने १४० पैकी ९९ जागा जिंकत सत्ता राखली. यात विजयन यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच निकालानंतर विजयन यांचे पूर्ण वर्चस्व मंत्रिमंडळ रचनेवर दिसले. जगभरात गौरवलेल्या आरोग्यमंत्री शैलजा यांनाही पुन्हा स्थान न दिल्याने वाद झाला होता. आताही विजयन यांचे जावई मोहम्मद रियास यांचे नेतृत्व पुढे येत आहे. यातून केरळमध्येही विचारसरणीपेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारण प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala politics cm pinarayi vijayan left parties in india print exp pmw
First published on: 19-01-2023 at 09:57 IST