KGF gold mining केजीएफ म्हणजेच कोलार गोल्ड फिल्ड्स हा कर्नाटक राज्याच्या दक्षिण-पूर्वेकडे स्थित कोलार जिल्ह्यातील खाणींचा परिसर आहे. २००१ मध्ये भारत गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीने येथील खाणकाम थांबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज तेथील वातावरण निर्मनुष्य आणि भयाण आहे. मात्र, आता भारतातील सर्वांत जुन्या सोन्याच्या खाणीमधील ढिगाऱ्याचा लिलाव होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाने कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड्स (केजीएफ) येथे नऊ टेलिंग डंपच्या लिलावाची सुरुवात केली आहे. तेथे पूर्वी प्रक्रिया केलेल्या उरलेल्या धातूमधून सोने आणि इतर प्लॅटिनम घटक काढले जातील, असे ‘द प्रिंट’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. २४ वर्षांनंतर अचानक खाणीतील ढिगाऱ्याचा लिलाव करण्यामागील कारण काय? त्यातून खरंच ३० हजार कोटींचे दुर्मीळ धातू मिळतील का? त्याविषयी जाणून घेऊयात.
खाणीतील ढिगाऱ्याचा लिलाव
- मिल टेलिंग डंप म्हणजे धातूचे उत्खनन आणि प्रक्रिया केल्यानंतर उरलेल्या अवशेषांचे ढीग असतात.
- कालांतराने सोने असलेले हे टेलिंग टेकड्यांच्या आकारात बदलले आहेत.
- केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाने लिलाव प्रक्रिया सुरू केली असून, याची जबाबदारी एसबीआय कॅप्सला देण्यात आली आहे आणि त्यांची व्यवहार सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द प्रिंट’ला सांगितले आहे.
- परंतु, लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून वेळ लागण्याची शक्यता आहे.

३६,००० कोटी रुपयांचे सोने आणि दुर्मीळ धातू?
मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संशोधन आणि विकास संस्था ‘नॉन-फेरस मटेरियल्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर’ (NFTDC) च्या २०२१ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्रतिटन कचऱ्यातून किमान दोन ग्रॅम सोने आणि पॅलेडियम सापडण्याची शक्यता आहे. ३० दशलक्ष टन ढिगाऱ्यातून सोने काढण्यात येणार आहे. त्यामुळे सोने आणि पॅलेडियमसाठी ६,००० रुपये प्रति ग्रॅम किंमत लक्षात घेता, तब्बल ३६,००० कोटी रुपयांचे सोने व पॅलेडियम या ढिगाऱ्यातून मिळण्याची शक्यता आहे. त्यातून रोडियमदेखील मिळू शकते, ज्याला बाजारभावही जास्त आहे. हा भाव एकदा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘द प्रिंट’च्या रिपोर्टमध्ये NFTDC च्या अहवालाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात हे धातू काढण्याची प्रक्रिया सायनाइडमुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज्याची मान्यता, केंद्राचा आग्रह आणि शतकानुशतके जुनी मागणी
वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक मंत्रिमंडळाने जून २०२४ मध्ये या ढिगाऱ्याच्या लिलावाला मान्यता दिली. हे ढिगारे भारत गोल्ड माइन्स लिमिटेड (BGML)च्या मालकीच्या जमिनीवर आहेत. परंतु, असे असले तरीही उत्खनन सुरू होण्यापूर्वी त्याला राज्य सरकारची मान्यता अनिवार्य होती. भारत गोल्ड माइन्स लिमिटेडचे माजी मुख्य अभियंता के. एम. दिवाकरन यांच्या नेतृत्वाखालील कामगार मंचाने खाणकामाच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, त्यांनी सविस्तर मास्टर प्लॅनदेखील सादर केला आहे.
दैनिक ‘भास्कर’च्या वृत्तानुसार, दिवाकरन म्हणाले की, केजीएफमधून दर वर्षी मिळणारे १०० टन सोन्याचे उत्पादन भारताला गमवावे लागत आहे. “सोन्याचे २७ साठे असूनही, फक्त दोन खाणींमध्ये उत्खनन करण्यात आले आहेत. ब्रिटिशांनी त्यातून ९०० टनांपेक्षा जास्त सोने काढले,” असे त्यांनी वृत्तपत्राला सांगितले. एका अधिकाऱ्याने म्हटले की, लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. खनिकर्म मंत्रालय आणि कर्नाटक सरकारमधील सूत्रांनी असेही सांगितले की, केजीएफकडे सुमारे ३३ दशलक्ष टन ढिगारे आहेत, ज्यामुळे १५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र व्यापले आहे आणि या डंपमधील खनिजांची अंदाजे किंमत २५,००० कोटी ते ३०,००० कोटी रुपयांच्या घरात आहे.
सोन्याव्यतिरिक्त टेलिंग डंपमध्ये रोडियम व पॅलेडियम यांसारखे प्लॅटिनम ग्रुप एलिमेंट्स (PGEs)देखील आहेत. ऑटोमोबाईल एक्झॉस्टमध्ये कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन व नायट्रस ऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यासाठी उत्प्रेरक कन्व्हर्टरसारख्या अनेक औद्योगिक प्रयोगांमध्ये PGEs वापरले जातात. मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या पूर्वीच्या अभ्यासात केवळ टेलिंग डंपमध्येच सोन्याचे अंश आढळले आहेत.
केजीएफला ‘मिनी इंग्लंड’ का म्हटले जायचे?
थंड हवामान, युरोपियन वास्तुकला व गर्दीने भरलेली अँग्लो-इंडियन लोकसंख्या यांमुळे एकेकाळी या परिसराला ‘मिनी इंग्लंड’ म्हणून ओळखले जाते. केजीएफ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत खोल असलेली सोन्याची खाण आहे. १९०२ मध्ये ब्रिटिशांनी केजीएफला वीज पुरवण्यासाठी २२० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसमुद्र येथे एक जलविद्युत प्रकल्प उभारला. त्यामुळे हे वीज वापरणारे जागतिक स्तरावरील खाणींचे पहिले शहर ठरले. हे इंग्रजांनी वसवलेले शहर होते. खाणकामामुळे या शहराची भरभराट झाली. त्या ठिकाणी बंगले, गोल्फ कोर्स, रुग्णालये व सामाजिक क्लबची टाउनशिप बांधली गेली.
भारतातील सर्वांत जुन्या निवासी लेआउटपैकी एक ‘रॉबर्टसनपेट’ १९०३ मध्ये कामगारांना राहण्यासाठी तयार करण्यात आले होते. १९३० पर्यंत ३०,००० हून अधिक लोक खाणींमध्ये काम करीत होते. २००१ मध्ये ही खाण बंद करण्यात आली. आता सायनाइडमुक्त तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे आणि सोन्याच्या किमती वाढत असल्याने केजीएफ पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भारताच्या खनिज उत्पादनाला चालना तर मिळेलच आणि रोजगारही निर्माण होतील. मात्र, ही खाण सुरू करण्याबाबत अजून कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.