ब्रिटनच्या राजघराण्याने क्रांतिकारी असा निर्णय घेतला आहे. जगाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी ब्रिटिश राजघराण्याशी निगडित आहेत. मध्ययुगीन काळात अनेक देशांमध्ये गुलामगिरीसारखी अमानवी प्रथा प्रचलित होती. गुलामांचा खुलेआम व्यापार करून त्यांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जायची. या कलंकित व्यापाराने ब्रिटिश राजघराण्याचेही हात बरबटलेले आहेत. याचा शोध घेण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसने स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला बकिंगहॅम पॅलेसमधील ऐतिहासिक दस्तऐवज हाताळण्याची परवानगी दिली आहे. १७ व्या आणि १८ व्या शतकांत चालणारा गुलामगिरीचा अमानुष व्यापार आणि ब्रिटिश राजेशाही यांच्यातील संबंध हा या संशोधनाचा विषय आहे, अशी माहिती बीबीसी या वृत्तसमूहाने दिली. गुलामगिरीच्या अमानुष प्रथेमुळे आफ्रिका खंडातून तीन शतकात एक कोटी २५ लाख गुलामांना अमेरिकेत नेण्यात आले. त्यापैकी १५ लाख गुलामांचा वाटेतच मृत्यू झाला. गुलामांच्या व्यापारातून कमावलेल्या पैशाने युरोपियन देशांमध्ये संपन्नता आली. पण आफ्रिका खंडातील देशांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

किंग चार्ल्स यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला असून त्यांनी राजघराण्याच्या अभिलेखागाराचे (Royal Archives) दरवाजे संशोधकांसाठी खुले केले आहेत. इतिहासकार कॅमिला दे कॉनिंग यांनी हा विषय पीएच.डी.साठी निवडला असून २०२६ पर्यंत त्या आपले संशोधन पूर्ण करतील, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
Japan moving closer to a future female empress_
जपानला महिला सम्राज्ञी मिळणार का? कायदा काय सांगतो?
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

किंग चार्ल्स यांनी मागच्या वर्षी मध्य आफ्रिकेत असलेल्या रंवाडा (Rwanda) देशाचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी गुलामांच्या व्यापारामुळे बाधित झालेल्यांच्या प्रति सहसंवेदना व्यक्त केल्या. आपल्याच पूर्वसुरींचे पाप असे उघड करण्याचे धाडस किंग चार्ल्स यांनी दाखविल्यामुळे ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.

गुलामगिरीचा इतिहास, चलन म्हणून गुलामांचा वापर

अटलांटिक महासागराच्या पलीकडे होणाऱ्या त्रिकोणी व्यापाराचा ‘ट्रान्स-अटलांटिक गुलाम व्यापार’ हा एक भाग होता. आफ्रिकेतील गुलामांच्या बदल्यात युरोपमध्ये उत्पादित झालेला पक्का माल विकला जायचा. आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांना महासागराच्या पलीकडे असलेल्या अमेरिकेत जहाजावर कोंडून नेले जायचे. अमेरिकेकडून साखर, कापूस, तंबाखू अशी नगदी पिके घेऊन त्या बदल्यात गुलाम हस्तांतरित केले जायचे आणि ही नगदी पिके युरोपात आयात केली जायची. याच नगदी पिकांच्या कच्च्या मालाच्या साहाय्याने युरोपात पक्क्या मालाचे उत्पादन केले जायचे आणि पुन्हा पक्क्या मालाचा व्यापार व्हायचा, असा हा त्रिकोणी व्यापार होता. ज्यात गुलामांचा चलनाच्या स्वरूपात वापर होत होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या काळात युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीची चाहूल लागली होती. ज्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठेची आवश्यकता होती.

हे वाचा >> बुकमार्क : ब्रिटिश राजघराण्यातली फूट रुंदावणारं पुस्तक!

१६ व्या शतकात सुरू झालेला गुलामांचा व्यापार तीन ते साडेतीन शतके सुरू होता. या काळात युरोपियन देशांनी जवळपास एक कोटी २५ गुलाम आफ्रिकेतून समुद्रमार्गे अमेरिकेच्या भूमीवर नेले. इतिहासातील दाखल्यावरून असेही लक्षात आले की, या प्रचंड मोठ्या प्रवासात १५ लाख गुलाम वाटेतच मरण पावलेले होते. तर अनेक गुलाम प्रवासामुळे गलितगात्र होऊन अमेरिकेत पोहोचल्यावर मृत्यू पावत असत.

पोर्तुगीज आणि स्पॅनिशांनी गुलामांच्या व्यापाराची सुरुवात केली. अमेरिकेत ऊस पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासत होती. सतराव्या शतकात उत्तर युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्क या शक्तिशाली राष्ट्रांना या गुलामांच्या व्यापारातील फायदा दिसू लागला. आपल्या वसाहती असलेल्या देशांतील गुलामांना उचलून अमेरिकेत नेणे आणि त्या बदल्यात वाढत्या उद्योगांना चालना देण्यासाठी कच्चा माल घेणे, अशा व्यापाराच्या चक्राची ही सुरुवात होती. ट्रान्स अटलांटिक व्यापारातून युरोपियन देशांनी प्रचंड नफा कमावला, ज्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले राष्ट्र म्हणून हे देश ओळखले जाऊ लागले.

या व्यापारात ब्रिटनची भूमिका

गुलामांच्या व्यापारात ब्रिटनचे मोठे वर्चस्व पाहायला मिळाले. एकट्या ब्रिटनने ३.४ दशलक्ष आफ्रिकन्सना त्यांची वसाहत असलेल्या कॅरेबियन देश, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये नेले. यांपैकी केवळ २.७ दशलक्ष गुलाम जिवंत पोहचू शकले. ब्रिटन या गुलामांना कापूस, ऊस यांसारख्या नगदी पिकांच्या शेतांवर कामाला जुंपायचे. काही गुलामांना सोन्याच्या खाणींत कामाला लावले जायचे.

या कलंकित व्यापारात ब्रिटनचा प्रवेश हा १५६० चा असल्याचे दिसते. सर जॉन हॉकिन्स यांनी पश्चिम आफ्रिकेच्या सिएरा लियोन (Sierra Leone) या समुद्र किनाऱ्यावरून गुलामांनी भरलेले पोर्तुगिजांचे जहाज पळविले. या जहाजावरील ३०० गुलामांना हॉकिन्स यांनी कॅरेबियन देशांमधील ऊस उत्पादकांना विकले. त्यानंतर हॉकिन्स यांनी कॅरेबियन देशांचा अनेकदा प्रवास करून पोर्तुगिजांच्या व्यापारासमोर आव्हान उभे केले. या बदल्यात हॉकिन्स यांना राणी एलिझाबेथ प्रथम यांच्याकडून मोठे इनाम मिळू लागले.

राजघराण्याच्या छुप्या पाठिंब्यावर हा खासगी व्यापार १६६० पर्यंत चालला. ट्रान्स अटलांटिक व्यापारात १६६० च्या दशकात ब्रिटनने अधिकृतपणे उडी घेतली आणि उघडपणे हा व्यापार सुरू केला.

हे वाचा >> विश्लेषण: ब्रिटनचे राजे म्हणून चार्ल्स तिसरे यांना नेमके कोणते अधिकार असतील? राज्यकारभारात काय असेल त्यांची भूमिका?

राजघराण्याचा व्यापारात सक्रिय सहभाग

किंग चार्ल्स द्वितीय (१६६० ते १६८५) यांच्या काळात ब्रिटिश सत्ता (Crown) आणि राजघराण्यातील सदस्यांनी ट्रान्स अटलांटिक व्यापारात अमाप पैसा गुंतवला. इतिहासकार व्हिल्यम पेटिग्रेव (William Pettigrew) यांच्या नोदींनुसार, १६६३ मध्ये ‘द कंपनी ऑफ रॉयल ॲडव्हेंचर्स इन टू आफ्रिका’ची स्थापना करण्यात आली. या कंपनीने ट्रान्स अटलांटिक व्यापाराच्या एकूण कार्यकाळात इतर स्पर्धकांपेक्षा अधिक पटीने आफ्रिकन महिला, पुरुष आणि मुलांची गुलाम म्हणून अमेरिकेत वाहतूक केली. राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे सुरुवातीच्या काळात या कंपनीला खूप मोठा लाभ झाला. राजघराण्यातील सदस्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. तसेच त्यांचा राजकीय पाठिंबा मिळाल्यामुळे कंपनीने प्रचंड नफा कमावला.

अखेरीस, १६८८-८९ या काळात झालेल्या विशाल क्रांतीमुळे कंपनीच्या तुलनेत राजेशाहीचे विशेषाधिकार (महत्त्व) कमी झाले. (टीप – किंग जेम्स द्वितीय हे क्रांतीनंतर जवळपास नामशेष झाले. त्यांनी स्वतःच्या सुटकेसाठी कंपनीमधील भागीदारी फ्रान्सला विकली) राजेशाहीचा प्रभाव कमी झाला असला, तरी गुलामांच्या व्यापारावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तसेच ब्रिटिश राजघराण्याला मिळणारा आर्थिक लाभही थांबला नाही.

गुलामगिरीच्या पायावर उभे राहिले साम्राज्य

अठराव्या शतकात अनेक लोक गुलामगिरीच्या व्यापारात उतरले. ज्यामुळे स्पर्धकांची संख्या झपाट्याने वाढली. इतिहासकार केजी डेव्हीस (KG Davies) यांच्या माहितीनुसार, ट्रान्स अटलांटिक व्यापारावर ब्रिटनच्या राजेशाहीचा आता थेट प्रभाव नव्हता. तरीही साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेत गुलामांचा व्यापार एक आवश्यक दुवा राहिला. इतिहासकारांच्या नोंदीनुसार, गुलामांच्या व्यापारामुळे महत्त्वाचे जिन्नस पिकवण्यासाठी फुकटातला मजूरवर्ग मिळत होता आणि या व्यापारातून मिळणारा नफा औद्योगिक क्रांतीसाठी लाभदायी ठरला. अनेक शतके चाललेल्या या व्यापारामुळे आफ्रिकन देशांत मोठ्या समस्या उत्पन्न झाल्या. (जसे की, लोकसंख्या रोडावली आणि सामाजिक-राजकीय ऱ्हास झाला.) इतिहासात झालेल्या या ऱ्हासाचे परिणाम आजही आफ्रिकन देशांना भोगावे लागत आहेत.

इतिहासकार डेविड रिचर्डसन (David Richardson) यांनी सांगितले की, गुलामगिरीमुळे आफ्रिकन देश आजतागायत अविकसित राहिले, तर त्याच बाजूला ज्यांनी गुलामांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला, त्या ब्रिटन आणि इतर युरोपियन देशांमध्ये उद्योगांची भरभराट झाली. राजघराण्याच्या थेट संबंधामुळे आणि राजाच्या नावाने गुलामांचा व्यापार बिनबोभाटपणे चालला, ज्यातून राजेशाहीच्या साम्राज्याला थेट फायदा मिळाला.

ब्रिटनमधील गुलामगिरी आणि तिचा वारसा नष्ट करणे

ब्रिटनमध्ये प्रगतीचे तथाकथित वारे वाहू लागल्यानंतर आजवर केलेल्या क्रूर गुलामगिरीच्या पद्धतीविरोधात जनमत तयार झाले. ज्यामुळे ब्रिटनने १८०७ साली गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली. तसेच वसाहती असलेल्या आपल्या देशांमध्ये १८३४ साली गुलामगिरीला पूर्णपणे नेस्तनाबूत केले. युनायटेड स्टेट्सच्या ३० वर्षांआधीच ब्रिटनने गुलामगिरीचा अंत करण्याचे पाऊल उचलले होते.

गुलामगिरीचे पतन करण्याचा निर्णय केवळ नैतिकतेच्या आधारावर घेण्यात आला नव्हता, तर या अनिष्ट प्रथेविरोधात आता गुलामही उभे ठाकले होते. त्यांच्याकडून प्रतिकार होऊ लागला होता. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आता आर्थिक व्यवहारही बदलले होते. त्या पार्श्वभूमीवर गुलामगिरीचा अंत होत गेला. गुलाम भरपाई कायदा, १८३७ (Slave Compensation Act of 1837) नुसार जवळपास २० दशलक्ष युरो एवढी रक्कम गुलामांना आणि गुलामांच्या मालकांना नुकसानभरपाईपोटी देण्यात आल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. गुलामी बंद झाल्यामुळे गुलामांच्या मालकांचे नुकसान झाले, असे मानून त्यांनाही भरपाई दिली गेली होती.

आणखी वाचा >> वसाहतवादाचे काय करायचे?

खुलेआम गुलामी आणि गुलामांच्या व्यापारावर बंदी आणली असली तरी ब्रिटिश अर्थव्यवस्थेने मजुरांचे शोषण सुरू ठेवले. शोषित मजूर हाच अर्थव्यवस्थेचा पाया होता. अमेरिकेतही कापूस उत्पादनासाठी गुलाम मजुरांचा वापर सुरू होता. तसेच कॅरेबियन देशांतही गुलामी तशीच होती.

आज, गुलामगिरीचा वारसा ब्रिटन आणि ब्रिटिश राजेशाहीमध्ये दिसून येतो. गुलामगिरीच्या व्यवसायामुळे गर्भश्रीमंत झालेले अनेक ब्रिटिश धनिक आणि गुलामांच्या व्यापारातून अर्थसंपन्न झालेल्या मोठ्या कंपन्या वैभवात जगत आहेत. ब्रिटिश संस्थांमध्ये आजही वंशवाद दिसून येतो. कृष्णवर्णीय ब्रिटिश नागरिकांचे सामाजिक-राजकीय स्थान कनिष्ठ स्वरूपाचे आहे. यांपैकी बरेच जण आफ्रिकन गुलामांचे वशंज आहेत.